डिंक्स ते डिस्क..

 डिंक्स ते डिस्क..

..एक दिवसीय प्रवासाची गोष्ट.

स्पॉइलर अलर्ट-ज्यांना शीर्षकातल्या या शब्दांचे अर्थ माहीत आहेत त्यांना गोष्टीचा शेवट कळूनच जाईल.पण एंड कळला तरी तिथपर्यंत कथेतली पात्रं पोहोचली कशी ते सागणंही रंजक असू शकतं असा आमचा तर्क आहे.बघूया बरोबर ठरतो का !!

विनिता ऑफिसला गेल्यावर प्रविणनं त्याला आवडणारा लाईटसा चहा केला.हा त्याचा पोस्ट ब्रेकफास्ट-वाचन-चहा.विनितानं केलेल्या छोट्याश्या टेरेसवरच्या छोट्याश्या बागेत बसून एन्जॉय करण्याचा.नवा जॉब घेतल्यावर आणि शहराबाहेरचा हा वन बीएचके फ्लॅट घेतल्यावर अशी शनिवारची निवांत सकाळ त्याची अगदी एकट्याची असे.आज फरक इतकाच की ताज्या पेपरच्या ऐवजी लहानपणी खूप आवडणाऱ्या अमरचित्रकथेचं कॉमिक नॉस्टॅल्जिकली वाचत होता तो आणि हाताशी निवांतपणाही फार नव्हता.विनिताच्या सूचनेप्रमाणे लंचसाठी चायनीज बनवायचं होतं.विनिता संध्याकाळी उशीरा येणार असल्यानं एकट्यानंच करायचं होतं सगळं.चहा संपल्यावर वाचनात न रेंगाळता तो उठलाच.कारण आजचा डी डे होता. गेले काही दिवस या जोडप्याचा फोकस होता "मुलं येण्याची तयारी". मुलं म्हणजे त्यांची नव्हेत बरं का. "आपल्या घरात किनई नवा पाहुणा येणाराय" असं फिल्म लाजत सांगतात तसलं काही घडलं नव्हतं त्यांच्या आयुष्यात. हल्ली असं घडतही नाही म्हणा.त्यामुळे विनिताला चायनीजचे डोहाळे लागलेत असा अंदाज करायचंही काही कारण नाही.शिवाय 'मुलं' असं बहुवचन वापरलंय ते लक्षात घ्या. त्यावर 'ट्विन्स पण असू शकतात' असलं काही विनोदानंही मनात आणू नका. या "डिंक्स" जोडप्याला एकच 'किड' झेपायची पंचाईत, दोनाची बातच सोडा. Double Income No Kids हा सध्या करियरिस्टांमधे आणि खूप सारे छंद असलेल्या इंटलेक्च्युअलांमधे परवलीचा शब्द आहे.तर या कथेतली मुलं म्हणजे श्रेयान् आणि अभिश्री अशी भक्कम नावं असलेली भाचरं. प्रविणच्या सख्ख्या चुलत स्नेहाताईची सात आणि बारा वर्षांची ही मुलं.स्नेहा आणि तिचा नवरा अधीश यांना कुठेतरी जायचं होतं म्हणून मुलांना शनीवार सकाळ ते रविवार सकाळ सांभाळायची जबाबदारी त्यांनी घेतली होती. दोन्ही जोडप्यांच्या व्यस्त दिनक्रमामुळे कधीतरी चार सहा महिन्यातून एकदा एकमेकांकडे जाणंयेणं व्हायचं. व्हॉट्सञॅप, ईमेल वरून जोक्सची फोटोची थोडी देवाणघेवाणही व्हायची.एकत्र राहण्याचा हा प्रयोग पहिलाच. त्याचं थोडं टेन्शनच होतं प्रविण-विनिताला. पण तयारी अगदी जय्यद होती.प्रवीणनं जपून ठेवलेल्या जुन्या मराठी आणि इंग्रजी अमरचित्रकथांचा गठ्ठा वरच्या कपाटातून काढून ठेवला होता. कारण त्याला त्याचा लहानपणाची आईनं सांगितलेली वय वर्षे सहातल्या पाहुणेपणाची कथा चांगलीच आठवत होती.आई बाबांनी पाठवलं म्हणून एकदा तो आत्याकडे रहायला गेला असताना त्यांच्याकडे वाचायला पुस्तकं किंवा कॉमिक नाहीत म्हणून रडून गोंधळ घातला होता म्हणे त्यानं.मुलांची सवय नसलेल्या आतोबांनी कंटाळून लगोलग परत घरी पोहोचवला होता त्याला.आताच्या या टेक् सॅव्ही मुलांच्यात कागदी पुस्तकांचं, खाण्याच्या आवडीचं आणि रडून गोंधळ घालण्याचं कसं काय असतं कुणास ठाऊक? असं कन्फ्यूजन झाल्यानं सेफर साईड म्हणून त्यानं स्वतःच्या लहानपणची ५० आणि १०० तुकड्यांची जिगसॉ पझल्सही काढून ठेवली होती.घरात टीव्ही नसल्यानं विनितानं पीसीवर काही फ्री गेम्स, पिक्सार आणि डिस्नीच्या काही कार्टून फिल्म्स डाऊनलोड करून ठेवल्या होत्या.जेवणाचं म्हणाल तर चायनीजचा प्लॅन आखला होताच.

तो प्लॅन असला तरीही विनितानं पोळ्या सुध्दा करून ठेवल्या होत्या "तुझ्या हातचं चायनीज नाही आवडलं तर मुलांना तूपसाखर पोळी तरी खाता येईल. शिवाय वाटलं तर संध्याकाळी बाहेर जाता येईल त्यांच्या आवडीच्या ठिकाणी" असं म्हणत तिनं बटाट्याची भाजीही लगे हात करून टाकली होती.कढईतली भाजी काढून ठेवताना सुबक कापलेल्या बटाट्याच्या फोडींकडे पाहून कौतुक वाटलं प्रविणला. त्याला जो आधीच येत होता तो 'गृहकृत्यदक्ष' रोल विनितानं जरा उशीराच शिकून नव्यानंच एन्जॉय करायला सुरवात केली होती.म्हणजे साधारण लग्नानंतर एक-दीड वर्षानी म्हणजे अंदाजे दोन वर्षांपूर्वी पासून. (गृहकृत्यदक्ष हा शब्द जेंडर न्यूट्रल पद्धतीनं वापरलाय हे लक्षात आलंच असेल.)पोळ्या गार झाल्या आहेत याची खात्री करून,डब्याचं किलकिलं ठेवलेलं झाकण लावताना त्याला परफेक्ट गोल आणि मऊसूत पोळ्या दिसल्या.त्या पाहून मनात आलं "आता भविष्यातल्या 'फॅमिली'चा विषय विनिताकडे काढलाय, ती विचार करते म्हणालीय तर आपल्यालाही पोळ्या शिकून घ्यायला हव्यात.आई येउन राहील पण काही दिवसच.बाई ठेवणं परवडेल का नाही माहीत नाही.आपल्या आसपास पोळ्या विकतही मिळत नाहीत आणि आपल्यालाच रोज लागतात." गेलं वर्षभर 'फॅमिली' वाढविण्या बद्दलच्या सिनिअरांशी झालेल्या निष्फळ चर्चा,रोटी मेकरचे चिवट रिझल्ट आणि स्ट्रे डॉग्जनीही नाकारलेल्या आपल्या पोळी प्रयोगाचे मागचे दोन दुःखद अनुभव आठवता आठवता तो जरासा खिन्न झाला पण..... ट्रॅंग ट्रॅंग ट्रॅंग ट्रॅंग अशी तब्बल चार वेळा बेल कर्कशली.त्यानं दार उघडायचा अवकाश श्रेयान् आणि अभिश्री एकमेकांना ढकलत घरात घुसली.आपापल्या पाठीवरची सॅक सापडेल त्या जागी फेकून कॉम्प्युटर टेबलकडे धावली. "मी आधी कॉम्प्यूटर घेणार." "ए मी कालच सांगून ठेवलंय विनीमामीला.मी आले की प्रोजेक्ट पूर्ण करणाराय." "कसला फुसका विषय आहे.प्रोजेक्ट म्हणे प्रोजेक्ट" "तूच फुसका आहेस.नुसता खेळत असतोस." "ए मी क्विझ कॉन्टेस्टची तयारी पण करतोय हां" घरात प्रवेशताच सुरू झालेल्या या चकमकीचं युध्दात रुपांतर तर होणार नाही ना याची भिती प्रविणला वाटायला लागली.मुलांमागून आईवडील का आले नाहीत म्हणून कावरा बावरा होत तो दरवाज्याबाहेर डोकावला.एकमेकांशी झटापट करतच दोघं म्हणाले "उशीर झालाय म्हणून आई बाबा वर नाही येत म्हणाले." दार लावून घेऊन प्रविण मागे वळेपर्यंत..... झटापटीतून अचानक माघार घेत श्रेयान् टीपॉयकडे झुकला आणि म्हणाला "वॉव मामा स्क्रॅबल? असा खरा पण असतो? तुझ्या लहानपणी कॉंप्यूटर नव्हते तेव्हाचा आहे का? मला बाबानी डाउनलोड करून दिलाय.खाली ग्राउंडवर खेळायला कॉलनीतले मित्र नसले म्हणजे मला एकट्याला खेळता येतो. दुसऱ्या लेव्हलला पोचलोय मी.पण हा खरावाला खेळताना दोन माणसं लागणार ना?तुमच्याकडे तर मुलं नाहीत.मग तू आणि मामी खेळता?" प्रश्नांच्या धबधब्याचं काय करायचं ते कळेना प्रवीणला.

आपण दोघं लहानपणातला खरा स्क्रॅबल खेळतोच म्हणजे ओल्ड फॅशन्ड ठरणार.पण हो म्हणायला पाहिजेच म्हणून तो अंधुकसं 'हो' म्हणाला.त्याकडे जराही लक्ष न देता श्रेयान् बोर्ड काढून खेळायची तयारीच करू लागला. "चल मामा तुला हरवतोच." आत्मविश्वासाची ती उच्च पातळी बघून मामा चकितला. "अरे मला लंचसाठी नुडल्स,फ्राईड राईस करायचंय.आवडतं ना तुम्हाला? तू आणि अभिश्री खेळा." असं म्हणून काढता पाय घ्यायचा त्याचा बेत होता. त्याचा बेत हाणून पाडत एकीकडे संगणकाची बटणं टकटकताना बहिणाबाई खिंकाळत बोलायला लागल्या "श्रेssssयान्न रास्कला! अरे त्याच्या नावाचा अर्थ मी त्याला नेटवर दाखवला तेव्हा पासून आपण नावाप्रमाणे 'एक्सलंट' आहोत असं जामच वाटतंय त्याला.तुला हरवतो म्हणे! हां हां हां.अरे तो केवढा त्याची व्होकॅब्युलरी केवढी ! मला तर बोअर होईल.तो खेळतो तो स्क्रॅबल लहान मुलांच्या लेव्हलचा दिलाय रे बाबानी.पण मामा तू खेळच त्याच्याशी,हरव चांगला दणदणीत." प्रविणला आठवलं.हिचं नाव ठेवलेलं कळलं तेव्हा "असली अवघड नावं का ठेवतात हे आईबाप?" असं म्हणत आपणही नेटवर अर्थ शोधला होता . "अभिश्री म्हणजे फीअरलेस ब्यूटी." हे वाचलेलं तंतोतंत पटलंच त्याला. मगाचचा धबधबाच झेलायला जड गेलेला मग हा तर नायगाराच.काय करायचं ते न कळल्यानं अमरचित्रकथांचा गठ्ठा आणि जिगसॉ पझल्स श्रेयान् पुढे टाकून तो गुपचुप स्वयपाघराकडे गेला. आपल्याला भावंडं नाही याचं पूर्वी त्याला कधी कधी वाईट वाटायचं पण आत्ता इन रिट्रोस्पेक्शन आनंद झाला. बाहेरच्या खोलीकडे कान ठेवून त्यानं स्वयपाकाला सुरवात केली.भाज्या कापून होईतो त्या फ्रंटवर शांतता होती.त्यानं डोकावून पाहिलं.तर अभिश्री पीसीवरच आणि श्रेयान् सोफ्यावर पालथा पडलेला.पुढ्यात कॉमिक्सचा गठ्ठा.दोन्ही पंजामधे हनुवटी ठेवून,तल्लीन होऊन कॉमिक मधली चित्रं वाचत होता.नूड्ल्स आणि तांदूळ बॉईल करून होईपर्यंतही बाहेर शांतता होती. 'आपलीही वाचताना अशीच तंद्री लागत असे आणि "प्रवीण अरे प्रवीण" अशा साध्या हाका मारून कंटाळल्यावर आई "पव्या लेका कान आहेत का भोकं" अशी आजीसारख्या ठेवणीतल्या आवाजात ओरडत असे.' हे आठवून हसू आलं त्याला.पाण्यातनं नूडल्स निथळून काढताना बाहेरून धप्प असा आवाज आला.दचकल्यानं हातातला झारा ओट्यावर पडला आणि त्यावरच्या नूडल्सचा एक धागा जमिनीकडे झेपावला.आवाजाचं कारण शोधायला तो गडबडीत बाहेर गेला.

आवाज कॉमिक्सचा गठ्ठा जमिनीवर फेकण्यानं आला होता.अमरचित्रकथेतलं एकेक कॉमिक हे आता टार्गेट झालं होतं आणि श्रेयान् त्यावर नेम धरून बॉल मारत होता.ठीकाय,फ्रजाईल शोपीसेस विनितानं आवरूनच ठेवले होते.तो परत स्वयपाकाकडे वळला.पदार्थ तयार झाल्यावर चव घेऊन त्यानं काचेच्या भांड्यांमधे ते काढून ठेवायला सुरवात केली आणि मोठ्ठी आरोळी आली. "तायडेsssssआता माझी टर्न" हातातलं भांडं पडता पडता राहिलं.तो धडपडत बाहेर आला. विखुरलेल्या कॉमिक्समधे उभा राहून श्रेयान् मोठ्ठ्यानं बोलत होता,कुठल्याही क्षणी अभिश्रीवर झडप घालेल अशा पोझ मधे. "एssssssतू हज्जार तास कॉम्प घेतला आहेस.आता माझी टर्न आहे." असं म्हणत अभिश्रीला ढकलून खुर्चीवर बसायचा प्रयत्न करायला लागला. ही फीअरलेस ब्यूटी तर तायक्वांदो प्लेअर,आता कुठली तरी किक किंवा ठोसा मारेल या भितीनं प्रविण मधे पडला. "अभिश्री नो." असं म्हणत त्यानं एका हातानं तिचा एक हात आणि पायानं एक पाय दाबून धरला.ती शांतपणे म्हणाली "मामा डोंट वरी.आय नो.आमचं स्किल फक्त सेल्फ डिफेन्सला वापरायचं असतं. असल्या चिल्ल्यापिल्ल्यांसाठी नाही." आता या मुलाचं काय करायचं हे न कळल्यानं प्रवीण तसाच उभा राहिला.विनिता मदतीला आली तर बरं असं मनात म्हणत.पण आपलं केलेलं काम पेन ड्राईव्हवर सेव्ह करून अभिश्री शांतपणे उठली.श्रेयान् तत्परतेनं तिची जागा घेता झाला. तिनं सगळी कॉमिक्स उचलली गठ्ठा केला आणि एकेक करून चाळू लागली. तिचा इंटरेस्ट पाहून प्रविणला आनंद झाला. "ए तू मराठी आणि इंग्रजी दोन्ही वाचतेस ना म्हणून तुझ्यासाठी मामीनं एनिड ब्लायटन आणि फास्टरफेणेची पुस्तकं आणली आहेत जुन्या पुस्तकांच्या दुकानातून." तो उत्साहानं म्हणाला आणि पुस्तकं तिच्या हातात ठेवली. "सॉरी मामा पण मला आता ती नाही आवडत.मला आईबाबा बजेट सांगतात आणि मी नेटवरून माझी माझी निवडून विकत घेते पुस्तकं.आणि विनीमामीसारखा माझाही एक ओल्डबुकवाला अंकल आहे." चकित होऊन काय बोलायचं सुचेना त्याला. मग जनरलच विचारलं "काय वाचलंस इतक्यात?" "गेल्या वर्षी रस्किन बॉंडचं चिल्ड्रन्स ऑम्निबस घेतलं.मग हार्पर लीचं टु किल द मॉकिंग बर्ड आणि नुकतंच त्या अंकल कडून मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन घेतलंय.वाचून बघणार आहे.जेम्स हॅरियटचं ऑल क्रीचर्स ग्रेट ञॅंड स्मॉल घेतलंय.आता ती सबंध सीरीज वाचणार आहे.मला व्हेट व्हायचंय." ही मुलगी कुठल्या काळातली आहे असा प्रश्न पडला त्याला. त्यामुळे 'हॅरी पॉटर' वाचलंस का असं विचारायचं धाडसंच केलं नाही.त्याची खात्रीच होती ती नक्कीच नाक मुरडून म्हणणार की ती 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' वाचते.

अलीकडचं काही वाचलंय का असं विचारणार तेवढ्यात तिनं विचारलं "मामा 'काईट रनर' आहे तुझ्याकडे? असलं तर दे.इथेच संपवीन वाचून" हा धक्का पचवतानाच पुन्हा आरोळी, पुन्हा दचकणं. "श्या ssssssमामा तुझ्याकडे फायटिंगचे सिनेमे नाहियेत? हे सगळे लहान मुलांचे आहेत." विनिताची मेहनत वाया गेल्याचं दुःख आणि "स्नेहाताई आणि अधीश पालक म्हणून करतात तरी काय?" असं आश्चर्य प्रविणला वाटलं.त्याला बावळटासारखं बघत राहिलेलं पाहून अभिश्री म्हणाली "आमचा बाबा म्हणतो.हवं ते बघा,वाचा आणि ठरवा चांगलं काय आणि वाईट काय ते.मग कधीतरी त्यावरून आई बाबाचं भांडण होतं." भांडणाचा निर्णय काय लागतो हे विचारायची गरजच वाटली नाही तो 'लहान मूल' नसलेला चिमुरडा म्हणाला "आम्ही मागच्या वीकएंडला होमथिएटरवर बघायला माझ्यासाठी दबंग,म्हणजे बाबा पण बसला होता आणि या सगळ्यांसाठी गॅंग्ज ऑफ वस्सेपूर आणला होता." असं म्हणून ती दोघं ओssssवुमनिया,आं हा वुमनिया असं चक्क एका सुरात गायला लागले.एवढे हार्मलेस शब्दच येत होते त्यांना म्हणून बरं.पुढचं काही येत नव्हतं.तरीही प्रविणला धक्का बसायचा तो बसलाच. अश्या तऱ्हेनं अख्खा दिवस काढायच्या कल्पनेनं त्याच्या पोटात गोळा आला.मुलांच्या ट्यून आणि बीट मधले शब्द बदललेले ऐकून मात्र त्याला हुश्श्य झालं. "आम्हाsssला भूक,लागsssली भूक" असं चालू झालं म्हटल्याबरोबर तो बश्या घ्यायला आत गेला. जेवणाचा अंक काही विशेष न घडता पार पडला.मुलं मनापासून आणि निवांतपणे त्याच्या हातचं चायनीज जेवण जेवली.शाळेतल्या,कॉलनीतल्या, मित्रमैत्रिणींच्या हकीकती,मधून मधून जोक्स असा चांगला दीडेक तास गेला जेवताना.मग अभिश्री 'काईट रनर' वाचत सोफ्यावर पहुडली.धाकटा वीर घरातल्या सर्व फर्निचरचा वॉर झोन करून त्याच्या खालून वरून चढाई करत लुटुपुटीची लढाई खेळत राहिला आणि मग एक कॉमिक हातात घेऊन चक्क कार्पेटवर झोपी गेला.

उठल्यावर दूध पिणं, टेकडीवर जाणं,कॉलनीतल्या मुलांशी ओळख करून घेऊन त्यांच्या सायकली शेअर करणं यात हार्मलेसली वेळ गेला.तोवर अभिश्रीचं 'काईट रनर' पळत होतं.संध्याकाळी विनिता ऑफिस मधून आली.मग थोड्या गप्पाटप्पा झाल्या आणि बाहेर जेवायला जायचा प्लॅनही पार पडला. आता दोन्ही मुलांच्या बॅटऱ्या डिसचार्ज होत आल्या होत्या तसा प्रविणचाही पेशन्स संपत आला होता. अभिश्रीनं मोठ्ठ्या ताईचा रोल घेऊन श्रेयान् चा नाईटसूट आणि त्याला झोपताना लागायची ती शाल सॅक मधून काढून दिली. विनितानं सोफा सरकवून त्या दोघांच्या गाद्या घातल्या.नाईट लॅंप लावून ठेवला आणि ती बेडरूममधे गेली.झोप येत असूनही प्रविणला दिवसभरातलं काय सांगू काय नाही असं झालं होतं.आता आपण मुलाचा विचार केला पाहिजे असं म्हणणारा प्रविण, मुलं सांभाळणं किती अवघड आहे असा सूर लावू लागला ते ऐकून विनिता म्हणाली "मी म्हणतेच तुला.इट्स नॉट ईझी नाउ अ डेज.आपण अजूनही विचार करूया." तेवढ्यात दारावर टक टक झाली.प्रविण दचकून उठलाच.दारात श्रेयान् उभा.आपल्या शालीचा बोळा नाकाशी धरून विचारत होता "मामा मी तुझ्याजवळ झोपू?" पुढच्या मिनिटाला मामाच्या हातावर एक हात टाकून तो झोपूनही गेला.विनिता कुशीला वळून त्याच्याकडे बराचवेळ बघत राहिली.

रविवारची सकाळ प्रसन्न उजाडली.मुलं झोपलेलीच होती.आश्चर्य म्हणजे ती उठल्यावर ताई त्यांना न्यायला येई पर्यंत काय करायचं याची चिंता प्रवीणला वाटत नव्हती. दोघांनी न बोलताच चहा घेतला.प्रविणनं मारी बिस्किट चहात भिजवून खायला सुरवात केली.विनिताच्या दिशेनं "श्शी काय हा बालीशपणा प्रवीण" असं काही न आल्यानं त्यानं दुसरं बिस्किट तोंडात घालता घालता तिच्याकडे पाहिलं.ती चक्क त्याच्याकडे कौतुकानं बघत होती.त्यानं नजरेनंच विचारलं "व्हॉट?" तिनं नाकाला चुण्या पाडून किंचित हसत एक बोट दाखवलं.हातातलं भिजलेलं बिस्किट चहात पडलं तरी ते काढायचा प्रयत्न न करता प्रविण म्हणाला "म्हणजे आपण Double Income Single Kid couple होणार?" ती नुसतीच खुदकन् हसली.त्यानं तिसरं बिस्किट चहात चांगलं आरपार बुडवलं आणि खुशीत चहाचा भुरका मारला.

About the Author

सुषमा दातार's picture
सुषमा दातार

Pune India
Education- Msc(Botony-Uni Pune),PG Dip.communication and journalism.PG Dip.Communication media for children.
Work experience.-teaching Mass Com.as a faculty at S.N.D.T. Pune(5 years)now as visiting faculty Uni.Pune.
Edited and designed Trimonthly 'Palak-Shikshak' for 10 years.member of editorial group for 'Nirmal Ranwara' (children's magazine) and 'Palaneeti'. Conduct training programs communication,relationship skills,film appreciation etc.Chairperson of 'Saath Saath Vivah Abhyas Mandal'.Founder member of 'Samwad' group of women puppeteers.freelance writer.
Publications-'Samwad Vishva' comprehensiveness book on Mass communication in Marathi. translation- ' Chitrapatache Saundarya Shastr' booklets on puppetry and parenting skills. translation published in series -'Vedi' by Ved Mehta. for children- ' Maza Tarangta Ghar' (sea farer's stories in form of travelogue )
email sushamadatar@gmail.com