बेदंगो बापपणा

ही एका नवजात बापाची गोष्ट.सीन पहिला.... उच्चभ्रू इमारतींनी वेढलेल्या आखीव कातरलेल्या आवारात मुलं खेळत होती. आजूबाजूला आया,दाया,आजी,आजोबा असे बरेच जण मुलांचा खेळ सुरक्षिततेच्या नावाखाली रिमोटली कन्ट्रोल करत होते.कामावरून परतलेला तो आपल्या मुलाला नजरेनं शोधत होता. त्यानंच अमेरिकेहून आणलेल्या नव्या पण मळलेल्या कपड्यांमुळे त्याला आपला मुलगा पटकन ओळखता आला. तीन फूट तीन वर्षांचा तो गुबरा, तीनचाकी सायकलीला उलटं पाडून कचरागाडी म्हणून ढकलत होता. सायकलीतून नवाच, स्वतःचा खेळ शोधून काढणाऱ्याकडे इतर मुलं आदरानं बघत होती. 'च्यायला असला खेळ कुठून शिकला असेल हा माझा मुलगा!!' असं मनात म्ह्णत,लॅपटॉपची बॅग सावरत त्याच्या दिशेनं जाऊ लागला....आणि थबकलाच. संवाद कानावर पडल्यानं. बाकावर बसलेले एक क्युरिअस आजोबा त्याच्या क्युरिअस मुलाला विचारत होते "परवा मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन कोण आलं रे तुमच्याकडे ?" सायकलीच्या कसरतीतलं लक्ष न काढता बोलण्याचं स्पेशल कौशल्य वापरत मुलगा खणखणीत आवाजात म्हणाला " बाबा पाहुणे आलेत." सगळ्यांना ऐकू जाणारी एक सणसणीत थप्पड खाल्यासारखा तो सटपटला. कॉल रिसीव्ह करायच्या तयारीत धरलेला सेलफोन पडता पडता राहिला.त्या थपडेची प्रतिक्षिप्त क्रिया..... त्याचा अंगठा फोन बंद करता झाला. मुलाकडे किंवा घराकडे जायच्या ऐवजी तो क्रीडांगणापासून जरा लांब असलेल्या कट्ट्यावर टेकला. सेल स्विचऑफ करून ..

..आपल्या या नव्यानं कळलेल्या पाहुणेपणाचं डीकोडिंग करायला त्यानं थेट स्वतःच्याच 'हाउ टु बी अ गुड फादर' सर्व्हिसचा FAQ उघडून विचारलं. "माझ्या मुलाला मी पाहुणा का वाटतो?" संगणकीय मॅटर ऑफ फॅक्ट पद्धतीनं उत्तर आलं "ISS- इट्स सिंपल स्टुपिड." मग मेंदूतून एक्सेल शीट उघडलं.त्यातला डाटा दिसत असताना ऑफ-स्क्रीन व्हॉईस सांगू लागला- "त्याच्या जन्मापासून तू टोटल दीड वर्षे घरी होतास.(त्यातच कामावर जाण्याचे आणि संडे ट्रेक्सचे तास धरले आहेत.)त्यातले सलग सहा महिने पॅटर्निटी लीव्ह + बिन पगारी लीव्ह.बायकोला प्रॉमिस केल्या प्रमाणे.पहिला एक महिना नॅपी बदलणे,आंघोळ घालणे,फीड करणे हे शिकण्याचा. इनॉक्युलेशनचं वेळापत्रक लक्षात ठेवणे. नंतरचे चार महिने बाळगप्पा शिकण्याचे,प्रगती मॉनिटर करण्याचे.शेवटचा महिना सवय व्हावी म्हणून दोन तास पाळणाघरात नेण्या आणण्याचा.या सगळ्यात साईड बाय साईड बायको,आई आणि सासू यांना पाळीपाळीनं आपल्या बापपणानं इंम्प्रेस करणे. अर्थातच हा मुलाला थेट न आठवणारा पिरियड .म्हणजे उरलं एक वर्ष.यात तू एकदाही सलग पंधरा दिवस घरी नव्हतास. घरी होतास तेव्हा दहा तास ऑफिसात आणि आल्यावर कॉल घेणे. या सगळ्यातून मोकळ्या फटी सापडल्या तर त्याच्या बरोबर बेडवरची दंगामस्ती. नंतर गोष्टीची पुस्तकं वाचणं.".....या मजेदार सेंटी आठवणीनं त्याच्या बाबापाहुणेपणाचा हिशेब संपवला. आता त्याचा मेंदू संगणकीय सवय सोडून पुरता मानवी झाला. तो मोनोलॉग मोडमधे जाता झाला आणि चुकारपणे येणारा विचार आला.....बायकोच्या सुजाण धमकीमुळे एकही इलेक्ट्रॉनिक खेळणं किंवा गेम्स त्याच्या साठी आपण आणू शकलेलो नाही . इतर बापलोक वापरतात ही ब्राईब पण आपल्या घरातून बाद केलेली.....एकदा मी अतिशय बावळट चेहरा करून,लहान मुलानं आईला विचारावा तसा बायकोला प्रश्न विचारला होता. " तुझं पटतं मला पण समजा,म्हणजे समजाsssss सोसायटीतल्या सगळ्या मुलांकडे असली खेळणी असतील आणि माझ्याकडे नाहीत असं सांगावं लागलं आणि आपल्या मुलाला कमीपणा वाटला तssssर ?" तेव्हा तिनंही आपली आई आपल्याकडे लहानपणी बघायची तसं बघून विचारलं होतं "आपण असली खेळणी आणत नाही यात तुला वाटतो कमीपणा ? नाही ना. मग संपलं. आपल्या पैशानं गरजेपलीकडचं आपण काय आणायचं ते आपण ठरवणार." खरं म्हणजे कमीपणा वाटत होताच मला पण तरीही तिचं ठाम बोलणं ऐकून खजील व्हायच्या ऐवजी किंवा चिडायच्या ऐवजी मला एकदम प्राऊडच वाटायला लागलं होतं तेव्हा. अशी स्मार्ट आणि ठामपणे बोलणारी बायको निवडल्या बद्दल. " My kid... Oh sorry our kid is in right hands." असंही मनातल्या मनात आलं होतं आणि मी बेडवरच्या दंग्याकडे वळलो होतो. इथे याच्या गोष्टीतल्या या मोनोलॉग बरोबर या एपिसोडचा ब्रेक. मी सीन सेन्सॉर करत नाहिये. तुमच्या मनात भलता विचार आला असणार. पण त्याला मुलाबरोबरचा दंगा आठवला होता. आपल्या ' बाबापाहुणे ' पणाचा हिशेब त्यानं पूर्ण केल्यावर पुढे काय होणार म्हणून हा ब्रेक लॉजिकल ठरतो.

सीन २. लोकेशन - त्याचा अडीच बेडरूमचा फ्लॅट.

आता ही अर्धी बेडरूम म्हणजे काय? माहीत असेलच तुम्हाला बिल्डरांची व्हॅल्यू ॲडिशन करायची पद्धत. या घरात ते नवरा बायकोचं वर्कस्टेशन होतं.बायकोचा एक जुना ढब्बा पीसी आणि याचा लॅपटॉप आणि पुस्तकांची भिंतीभर कपाटं....स्वतःच्या किल्लीनं लॅच उघडून घरात आल्यावर त्यानं तिथे लॅपटॉप चार्जिंगला लावला.आपल्याकडे आयपॅड,आयफोन नाही. आपण अजूनही बावळटासारखा ऑफिसला जाताना जड लॅपटॉप नेतोय याबद्दल खंत वाटली.पण त्यामुळे बायको तिच्या पर्यावरणी मित्रमैत्रिणींत आपलं कौतुक करते हा बोनस मिळतो याचंही त्याला बरं वाटलं.आपली एनव्हा्यरॉनमेंट फ्रेंडली बायको आपल्याला कार वापरू देते हेच नशीब. नाहीतर 'शेअर अँड केअर' या स्लोगनसाठी लोकलनं नाहीतर बसनं जायला लावलं असतं असंही मनात आलं......बायको अजून घरी आलेली नव्हती. उशीर होईल अशी चिठ्ठी ठेवली होती.लेक खेळून वर आला नव्हता हेही बरंच होतं. मगाशी तो 'बाबापाहुणे'चा हिशेब पूर्ण झालाय. आता फक्त 'बाबा' होण्यासाठी पुढची स्ट्रॅटेजी काय ठरवायची त्याचा विचार करता येईल असं मनात म्हणाला. मेल चेक करायच्या ऐवजी मनातला मेल आयडेंटिटीचा फादरली प्रश्न कॉफी बरोबर त्यानं हातात घेतला. काही सुचेना म्हणून त्यानं आईबाबांच्या घरी फोन लावला. आपल्या समस्येचं काही कारण आपल्या बालपणात सापडतंय का हे बघायचा हा त्याचा फ्रॉइडियन प्रयत्न. बाबा बाहेर गेलेले होते. आईशी पंधरा वीस मिनिटं जरा नॉस्टॅल्जिक गप्पा मारल्यावर काही थोडं हाती लागल्या सारखं वाटलं.... म्हणजे हा नॉस्टॅल्जिक आणि आई मॅटर ऑफ फॅक्ट.अगदी बायको सारखी.त्याला दोन गोष्टींचं कोडं पडलं. आपली बायको इतकी आपल्या आई सारखी कशी आणि आपण बाप म्हणून आपल्या बापापेक्षा इतके वेगळे कसे याचं. आपला बाप सॉरी आपले बाबा तर आपल्या लहानपणी नऊ नऊ महिने सलग बोटीवर असायचे आणि तीन महिने घरी.मग आपल्याला ते कधी पाहुणे का नाही वाटले? या प्रश्नाबरोबर एकदम पार बाळपणातला सीन त्याच्या डोळ्यासमोर आला.आई-आजीनं सांगितलेला,जणू स्वतःच पाहिल्या सारखा.तो त्यानं स्वतः पाहून आठवलेला नसल्यानं त्याला फ्लॅशबॅक नाही म्हणता येणार.अनेक वेळा आई-आजी कडून ऐकलेला,व्हिविड पण व्हर्च्युअल. तो अकरा महिन्यांचा .नुकती चालण्यावर मास्टरी आलेली.त्याच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी बोटीवर गेलेले बाबा नऊ महिन्यांनी आलेले.हा त्यांच्याकडे पाहून किंचित हसला,पटकन नाही पण हळू हळू चालत त्यांच्याकडे गेला.मग हळूच मांडीवर बसला.आपला मऊ गाल बाबांच्या खरखरीत गालाला लावून बघितला.बाबांनी एकदम मजेशीर आवाज काढून जीभ बाहेर काढली.लग्गेच हयाला खळाळून हसू आलं. आणि तो बाबांचा पिल्या होऊन गेला.अगदी आईला जेलसी वाटेल इतका.मग पुढचे तीन महिने आणि त्या पुढचे प्रत्येक तीन महिने म्हणजे धमाल. या पुढच्या आठवणी मात्र अगदी त्याच्या स्वतःच्या. आई-आजीच्या थ्रू सेकंडहॅंड नाहीत. अधूनमधून बाबा चिकनच्या रेसिपी करून खायला घालणार. शिवाय प्रत्येक रात्री बाबांच्या स्वप्नात ऑली स्टॅनली म्हणजे जाड्यारड्या येणार आणि गोष्ट सांगून जाणार. मग तो एपिसोड दुसऱ्या रात्री झोपायच्या आधी रंगणार. अशी गोष्ट सांगायची सीरियल चालणार बरेच दिवस. जाड्याचा दाढीच्या साबणात काहीतरी गडबड झालेली आणि फेस निघायचा थांबणारच नाही.मग रड्या तो प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवायचा प्रयत्न करणार आणि जी धमाल उडणार......हे मला आत्ता इतकं स्पष्ट आठवतंय तर माझ्या पिल्लूसाठी का नाही कोणी माझ्या स्वप्नात येत ? सोळाव्या वर्षापासून घराबाहेर राहिलेल्या आपल्या शिपी बाबांकडे हे कौशल्य कुठून आलं असेल ? त्याला शिपवरचे आणखी बाबा आठवले.तो शिपवर गेला असताना कॅप्टन टेकसिंगानी अंकल आणि आंटी सुध्दा होते त्यांच्या मॉन्टी बरोबर.हा मॉन्टी सारखा याच्या बाबांच्या केबीनमधेच असायचा बराचसा वेळ. अंकलला त्यानं कधीच मॉन्टीशी खेळताना पाहिलं नव्हतं.फक्त काम करायचे आणि दारू प्यायचे.मग रेडिओ-गणेश अंकल आठवले. बायकोचा मुलाचा फोटो पाहून,याला जवळ घेऊन डोळ्यात पाणी आणणारे.त्यावेळी कसं विचित्र वाटायचं तेही आठवलं आणि त्याला वाटलं आपण या दोघांच्या मधले बाप असणार, आपला बाप यात कुठे बसतो ते मात्र त्याला कळेना. त्याला आठवलं एकदा बाबा नसताना ठॉंई आवाज करून त्यांचा टीव्ही पार मेला. तेव्हा आधी घाबरलेली आई मोठ्यानं हसत पटकन म्हणाली होती "आत्ता बाबा असते तर काय म्हणाले असते?" मग हा आणि याचा धाकटा भाऊ जवळजवळ कोरस मधे म्हणाले होते "गन्स ऑफ नॅव्हेरॉन.ठ्ठो ठ्ठो. टीव्हीनं काल भरपूर छोले खाल्ले असणार. " मग तिघेही खूप हसले होते पोट धरधरून. बाबांच्या पुढच्या शिप टु शोअर फोनवर याचा पूर्ण रिपोर्ट प्रत्येकानं आपापल्या व्हर्जनमधे सांगितला होता.टेलिफोन बिलाची काळजी न करता बाबांनी तीनही व्हर्जन्स ऐकून घेतली होती. बाबांच्या ञॅबसेन्समधेही त्यांना अनेक प्रसंगात हजर ठेवण्याचं आईचं स्किल कसलं भन्नाट असं म्हणून त्यानं आईला मनातल्या मनात शाबासकी देऊन टाकली.आता ही शाबासकी त्याला प्रत्यक्षात का देता येत नाही हेही कायमचं कोडंच याच्यासाठी. हे असं त्या दिवशी त्याला आठवायला लागलं आणि जाणवलं अशी सगळी फक्त धमाल नव्हती लहानपणी. छोट्याचं टॉन्सिल्सचं ऑपरेशन होतं तेव्हा काही कारणानं याच्या सोबतीला कोणीच अॅव्हलेबल नव्हतं.पहिल्यांदाच पूर्ण दिवस हा एकटा घरात राहिला होता.सकाळी लवकर सगळं आवरून याला सगळ्या इन्सट्रक्शन्स देऊन आई छोट्याला घेऊन हॉस्पिटलमधे गेली. संध्याकाळी परत येताना आईच्या कडेवर छोट्या आणि हातातल्या पिशवीत खूप आईस्क्रीम कप आणि गोष्टीची पुस्तकं. हा काहीतरी सांगायला गेल्यावर आई आधी चिडचिडली होती.हा हिरमुसला होता.पण मग छान ब्रेव्हली एकटं राहिल्या बद्दल शाबासकी देऊन आई म्हणाली होती " मी हे बाबांना लिहिणार आहे पत्रातून.मग तुला स्पेशल पत्र येईल त्यांचं." आईस्कीम खात छोट्याला नवीन पुस्तकं वाचून दाखवताना तो आदल्या दिवशी फोनवरून बाबा आणि प्रत्यक्षात आई दोघंही कशावरून तरी जाम रागावले होते ते विसरून गेला होता. या आठवणीबरोबर त्याला बाबांच्या स्पेशल पत्रांचीही आठवण झाली.बाबा त्या दोघांना स्वतंत्र पत्र लिहायचे तर कधी एकत्र.आईचं पत्र नेहमीच वेगळं आसायचं.शाळेतनं आल्यावर आलेली पत्रं नेहमीच्या जागी ठेवलेली दिसली म्हणजे आपापलीच पत्रं उघडून ते वाचायचे.आई त्यांची पत्रं उघडणार नाही आणि या दोघांनी आईचं उघडायचं नाही हा बाबांनी घातलेला नियम कसा कुणास ठाऊक सगळे पाळायचे.अर्थात नंतर त्यातल्या मजकुराची देवाणघेवाण व्हायचीच.मुलांसाठीच्या पत्रात बहुतेक वेळा एक रुपयाचं कोडं असायचं. दोन्ही मुलांसाठी.एका कोड्याची आठवण त्याला अजून येते. कारण त्यानंतर त्याचं आणि छोट्याचं खूप मोठ्ठं भांडण झालं होतं. बाबांनी विचारलं होतं "आमचं शिप लॉसएंजिलिसहून न्यूऑर्लिन्सला जाणार आहे.सगळ्यात जवळचा मार्ग शोधून काढेल त्याला १ रुपया बक्षीस." मग यानं जगाचा नकाशा आधी बळकावला आणि पटकन शोधलं आणि सांगूनही टाकलं 'पनामा कॅनालमधून जायचं.' मग छोट्या खूप भांडला यानं उत्तर फोडलं म्हणून.दोघंही आरडा ओरडा करायला लागले.ते भांडण सोडवताना आई अगदी रडकुंडीला आली होती. आईनं शिक्षा म्हणून पुढच्या कोड्यांसाठी कुणालाच बक्षिसाचा रुपया द्यायचा नाही असं सांगून टाकलं.पण आईचीच पों पों झाली.पुढचं कोडं बेस्टच होतं ' ढेकर आणि पादणे यात फरक काय?' त्या दोघांनी तोच तोच प्रश्न एकमेकांना विचारून नुसता हास्यगोंधळ घातला होता.आई अगदी घाबरली होती तेव्हा....ही मुलं लोकांच्या समोर 'हा प्रश्न बाबांनी विचारलाय' असं म्हणतील या कल्पनेनं.पण असली मज्जा कुणासमोर करायची आणि कुणासमोर नाही हेही बाबांकडूनच वारशानं आलं होतं त्या दोघांकडे बहुधा.

तेवढ्यात धडाम आवाज झाला. विचारसाखळी तुटली. त्याचा गुबऱ्या वारस खेळणं संपवून घरात आला होता.आपल्या धडाधडीत डोळ्याच्या कोपऱ्यातून याच्याकडे पहात, सांभाळणाऱ्या मावशींना म्हणाला "टाटा मावशी.तुम्ही गेलात तरी चालेल.बाबा आलाय.ए बब्बड चल तुला मी बनवलेली नवी ठोकळ्यांची गाडी दाखवतो." आश्चर्यच वाटलं याला. मनात म्हणाला 'आं!! हाच का मगाशी सार्वजनिकरित्या मला पाहुणा ठरवणारा माझा मुलगा !!' लेकाबरोबर जेवताना,त्याची निरर्थक बडबड ऐकताना आपल्या बाबांच्या खास बापपणाचा आणखी एक प्रसंग आठवला त्याला. मोबाईल, ईमेल नसतानाची गोष्ट.एकदा बाबांच्या शिपवर काहीतरी खून मारामारी झाल्याची बातमी मुंबईच्या पेपरात आली होती ती वाचून याच्या काकूनं काही कळलं का विचारायला फोन केला.आईला अर्थातच काही कळलेलं नव्हतं. तेव्हा यानं पहिल्यांदा आईला रडताना पाहिलं. दोघा भावांना कळेना काय झालं.कावरेबावरे झाले.आई सारखा कुणाला तरी फोन लावत होती. लागला नाही की पुन्हा करत होती.शेवटी फोन लागला.मग ती रडू आवरत कुणाशीतरी बोलली.हं हं म्हणत राहिली आणि शेवटी किंचित हसून फोन ठेवला.मुलांना जवळ बोलावलं आणि शिपवर झालेली,तिला कळलेली हकीकत दोघांना समजेल अशी सांगितली.एका कुकला म्हणे डोक्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यानं दोन ऑफिसर्सना सुरीनं भोसकलं. डायनिंग एरियात बसलेल्या कॅप्टन बाबा आणि चीफ इंजिनिअरना मारायला येत असताना दोघा तिघांनी त्याला ताब्यात घेतलं. एका खोलीत बंद केलं होतं. असल्या घटना टीव्हीवरच्या सिनेमांतच पाहिलेल्या,तशी घटना आपल्या बाबांच्या शिपवर कशी झाली याचं दोघा भावांना कोडं पडलं.नंतर या दोघांच्या असंख्य प्रश्नांना आईनं शक्य तेवढी शांतपणे उत्तरं दिली. उरलेले प्रश्न बाबांना विचारायचे असं ठरलं आणि त्या रात्री तिघंही हॉलमधे गाद्याघालून झोपून गेले होते.. या प्रकारानंतर बाबाला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा फोनवरून शांतपणे दोघांच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. नेहमी मजेमजेचंच बोलणारे बाबा त्यांच्याशी मोठ्ठ्या माणसांशी बोलतात तसं बोलले होते. छोट्या सारखा विचारत होता "म्हणजे तो कुक खूप खूप बॅड बॉय आहे ना?" पण बाबा मात्र सांगत राहिले त्या खून करणाऱ्या माणसाला काही तरी आजार असणार नाहीतर एरवी चांगला कुक होता तो बॅड बॉय नव्हता. बाबांनी एकही बॅड वर्ड वापरला नाही. हे त्याला चांगलं आठवलं.नंतर मात्र एकदा म्हणाले होते " आई तुला रागावली ते बरोबरच आहे.तू वापरलास त्याला सगळे बॅड वर्ड म्हणतात.पण खूप राग आल्यावर कधी कधी बॅड वर्ड म्हणजे शिवी वापरली म्हणजे राग पळून जातो.तू मोठा झाल्यावर तुला मी रशियन,जर्मन,फ्रेंच,जपानी भाषेतल्या शिव्या सांगीन.ही आपली दोघांचीच मज्जा." मग नंतर खूप वेळ बाबांनी वेगवेगळ्या भाषेत बोलल्या सारख्या नकला करून त्या दोघांना आणि आईला खूप हसवलं होतं. "हे असं मला बापपणात इनव्हॉल्व्ह का नाही होता येत" हा विचार पुन्हा पुन्हा 'बाबापाहुणे' या शब्दाला चिकटून त्याच्या मनात येत राहिला.इतका की त्यानं मोबाईल किंवा लॅपटॉपला हातही लावला नाही.

बायको घरी आली तेव्हा हा चक्क टीव्हीवर 'गांजता सौख्यभरे' किंवा 'यू थिंक यू हॅव चान्स' वगैरे काहीबाही डोळ्यानं चघळत होता. ती म्हणालीच लगेच हसत. " एssss बरा आहेस ना?" टीव्ही बंद करत तो म्हणाला " नाही. तसा बरा आहे पण विचार करत होतो." "वॉव! टीव्ही बघत विचार ? दॅट्स ग्रेट.काय झालं आज बापलेकात?" ती गिरकी घेत म्हणाली. तो म्हणाला, "हसू नकोस. आज हा आपला दिवटा लेक त्या भोचक आजोबांनी विचारल्यावर म्हणाला आमच्याकडे बाबापाहुणे आलेत." "वॉव, 'दिवटा आणि भोचक'. काही नाही तरी तुझं मराठी सुधारायला या मालिकांचा नक्की उपयोग होतोय बरं का. ओके आय अॅम सिरीयस. सांग काय झालं." मग त्यानं मधला सगळा विचारांचा एपिसोड तिच्यासाठी रिपीट केला. त्याला जवळ घेत ती म्हणाली " डोंट बी सिली. तू काय आज बाबायन मोडमधे आहेस का? रामायणातल्या रामात सुद्धा आम्ही बायका फॉल्ट काढतो. कालच आईंशी फोनवर बोलताना त्या म्हणत होत्या ' यांनी मुलांना कधीही क्लासिक्स नाही वाचून दाखवली.मायथॉलॉजी तर अमरचित्रकथांमधूनच वाचली मुलांनी.यांना शिपवरून घरी आलं की कुठ्ठे जायचं नसायचं. आणि आम्हाला तर वाटायचं इकडे ट्रिप काढावी तिकडे ट्रिप काढावी. पण हे ऐकलं न ऐकल्या सारखं करून दुसराच विषय काढून हसवायचे. मुलं खूश व्हायची पण मला ती खंत राहिलीच.मुलांना भारतातलं काही दाखवलं नाही म्हणून.' Accept it. तुझे बाबा मस्त राजा माणूस आहेत पण you are you. तुझ्याबरोबर बेडवरचा दंगा आणि गोष्टी वाचणं त्याला आवडतंच ना. Be thankful, तो नुसतंच पाहुणे आलेत असं नाही म्हणाला बाबापाहुणे तरी म्हणाला." ती खळाळून हसली. तिच्या त्या खळाळणाऱ्या हसण्यात त्याला आपल्यातला एक खास 'बेदंगो' बापपणा दिसल्यासारखा वाटला.

About the Author

सुषमा दातार's picture
सुषमा दातार

Pune India
Education- Msc(Botony-Uni Pune),PG Dip.communication and journalism.PG Dip.Communication media for children.
Work experience.-teaching Mass Com.as a faculty at S.N.D.T. Pune(5 years)now as visiting faculty Uni.Pune.
Edited and designed Trimonthly 'Palak-Shikshak' for 10 years.member of editorial group for 'Nirmal Ranwara' (children's magazine) and 'Palaneeti'. Conduct training programs communication,relationship skills,film appreciation etc.Chairperson of 'Saath Saath Vivah Abhyas Mandal'.Founder member of 'Samwad' group of women puppeteers.freelance writer.
Publications-'Samwad Vishva' comprehensiveness book on Mass communication in Marathi. translation- ' Chitrapatache Saundarya Shastr' booklets on puppetry and parenting skills. translation published in series -'Vedi' by Ved Mehta. for children- ' Maza Tarangta Ghar' (sea farer's stories in form of travelogue )
email sushamadatar@gmail.com