मी कमल सोहनी!

(कमल सोहनी. भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ. १९१२ हे त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष. कमल सोहनी यांच्या चरित्राचा रंजक व सोप्या पद्धतीनं आढावा घेणारं एक पुस्तक वसुमती धुरू यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलं होतं आणि ‘विज्ञान विशारदा’ या नावाने ते ग्रंथाली वाचक चळवळीने प्रसिद्धही केलं होतं. कमल सोहनी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं याच पुस्तकाच्या आधारे कमल सोहनींच्या आयुष्याविषयी आत्मकथनपर पद्धतीने केलेली ही संक्षिप्त मांडणी, कमल सोहनींच्या कर्तृत्वाविषयी जाणून घ्यायला आपल्याला नव्याने उत्सुक बनवेल असे वाटते.)

दुर्गूताई म्हणजे दुर्गाताई भागवत. आज ती हयात असती तर बरोबर एकशे दोन वर्षांची असती. -आणि मी? शंभर वर्षांची! - दोघींमध्ये अंतर दोन वर्षांचं. आम्ही बहिणी आणि बालपणापासून मैत्रिणीही. दुर्गूताई मला लहानपणी ‘बोदलेबुवा’ म्हणून हाक मारायची. ती पहिल्यापासून अंगानं सडसडीत, निमगोरी आणि मी गोरीपान, किंचित स्थूल. मला सेंट झेविअर्स कॉलेजमध्येसुद्धा ‘बेबी जंबो’ असं नाव पडलं होतं. दुर्गूताई शाळेत हुशार आणि तुलनेत मी सुमार. दोघींनाही व्यायामाची खूप आवड. मी तर वयाची ८० वर्षे ओलांडल्यानंतरदेखील टेनिस खेळत असे. रोज पहाटे साडेचारला उठून तासभर व्यायाम करीत असे. आयुष्यात काहीही करायचे असले तरी तब्येत उत्तम नको का? आज का कोणास ठाऊक, पण सगळ्या जुन्या घटना मनात फेर धरत आहेत. आज देशाचं राष्ट्रपतीपद एका स्त्रीकडं आहे, पण मला केवळ स्त्री म्हणून बंगलोरच्या विज्ञान संस्थेत प्रवेशसुद्धा नाकारण्यात आला होता. २ जुलै १९३३. दोन महायुद्धांमधला मंदीचा काळ. अशा काळात बाबांसोबत मी बंगलोर रेल्वे स्थानकावर उतरले. केसांची घट्ट वेणी आणि नऊवारी साडी चापून चोपून नेसलेली. माझे बाबा म्हणजे नारायणराव भागवत. बंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स १९११ साली सुरू झाली आणि पहिल्याच तुकडीत माझ्या बाबांनी प्रवेश मिळविला.

ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर संशोधन केले. माझ्या काकांनी माधवरावांनी तर याच विज्ञान संस्थेत संशोधन करून लिहिलेला प्रबंध इतका उत्कृष्ट ठरला की, मुंबई विद्यापीठानं त्यांना एम.एस.सी. डिग्रीबरोबरच ‘मूस गोल्ड मेडल’सुद्धा दिले. बाबांनी आणि काकांनी ज्या विज्ञान संस्थेत संशोधन केलं त्याच संशोधन संस्थेत आपणही संशोधनाचं काम करावं असं मला वाटलं तर ते चुकीचं होतं? ...हो! मी बी.एस्सी. ही मुंबई विद्यापीठाची परीक्षा केवळ प्रथमश्रेणीत नव्हे तर प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले होते. नऊवारी नेसणार्‍या बायका विज्ञानाचं शिक्षण घेऊ शकत नाहीत, संशोधन करू शकत नाहीत असं थोडंच आहे? तर बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेशासाठी मी अर्ज केला. इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर कोण होते माहिती आहे? -जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण म्हणजे सी. व्ही. रामन! मुंबई विद्यापीठात मी पहिली आलेली असल्याने इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळणं हा माझा हक्क होता. गुणवत्तेत मी कुठेच कमी नव्हते. -पण तरीही संस्थेचं उत्तर आलं, ‘अर्ज नामंजूर, प्रवेश मिळणार नाही!’ - याचं कारण काय म्हणून चौकशी केली तर समजलं, इन्स्टिट्यूटच्या दोन तपांच्या इतिहासात तिथे एकाही विद्यार्थिनीने प्रवेश घेतला नव्हता. थोडक्यात स्त्रियांना प्रवेश देण्याची इन्स्टिट्यूटमध्ये प्रथाच नव्हती! -खरं तर ऐकून मनाचा संताप झाला, पण बाबा म्हणाले, ‘आपण सर सी. व्ही. रामनना प्रत्यक्ष भेटू. त्यांचासारखा नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ कोणा लायक व्यक्तीला शास्त्र शिकण्याची संधी नाकारेल असं मला वाटत नाही.’ -विवाहासाठी मुलीला दाखवायला नेण्याच्या वयात मी बाबांबरोबर सर सी. व्ही. रामन यांना भेटायला म्हणून बंगलोरच्या रेल्वेस्थानकावर उतरले होते. त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही पोहोचलो तर डोक्याला फेटा, ग्रे रंगाचा सूट आणि टाय अशा भारदस्त पोषाखात रामन बसलेले होते. चेहर्‍यावर बुद्धिमत्तेचं तेज, पण त्यामागून किंचित अहंभाव आणि आढ्यताही डोकावत होती. हस्तांदोलन झाल्यानंतर रामन यांनी बाबांना विचारलं, ‘व्हॉट कॅन आय डू फॉर यू मि. भागवत?’ बाबांनी माझी मुलगी मुंबई विद्यापीठात पहिली आली आहे आणि तिने प्रवेशासाठी अर्ज केला आहे, पण कदाचित काही गैरसमजुतीने तिला इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश नाकारला गेला आहे वगैरे सांगितले. तर रामन म्हणाले, ‘मि. भागवत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गोंधळ, गैरसमजूत अशा गोष्टींना अजिबात थारा नाही. ती मुलगी आहे म्हणूनच तिला प्रवेश नाकारला आहे. शास्त्रीय संशोधन हा स्त्रियांचा प्रांतच नव्हे. तिथे काही भोंडल्याचे उखाणे ओळखायचे नाहीत. आधीच मला मुली आवडत नाहीत. मुली म्हणजे कटकट, नसता जंजाळ! -आणि इन्स्टिट्यूटमध्ये मुलींना प्रवेश म्हणजे बिचार्‍या विद्यार्थ्यांच लक्ष अभ्यासातून विचलित होऊ देणं!’ नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाकडून असं सगळं ऐकताना संतापानं मी थरथरत होते. आमच्या घरात मुलगा-मुलगी असा भेद कुठल्याच बाबतीत नव्हता. मी म्हटलं, ‘सर, गुणवत्तेत मी कुठेच कमी नाही आणि तरीही मला पुढील शिक्षण आणि संशोधनाची संधी नाकारून तुम्ही माझ्यावर आणि माझ्यानंतर येथे शिकू इच्छिणार्‍या मुलींवर अन्याय करीत आहात, पण माझी गांधीजींच्या तत्वांवर निष्ठा आहे, सत्याग्रहावर विश्‍वास आहे. तुम्ही प्रवेश देणार नसाल तर मी मुंबईला परत जाणार नाही, इथेच थांबून तुमच्या दारासमोर सत्याग्रह करीत राहीन!’

रामन माझ्या या बोलण्यानं काहीसे अस्वस्थ झाले. अखेर मला पळवून लावायचे अशा हेतूने की आणखी कशामुळे माहिती नाही, पण त्यांनी सांगितलं, ‘तुझा एवढा हट्टच असेल तर मी प्रवेश देईन तुला, पण एक अट आहे. एक वर्ष तुला इथं प्रोबेशनवर काम करावं लागेल. त्यानंतर आम्हाला तुझं काम आणि काम करण्याची पद्धत पसंत पडली तर सर्वांसारखा रितसर प्रवेश मिळेल!’ अट विचित्र आणि अन्यायकारक होती, पण स्त्रियांना फक्त भोंडल्याचे उखाणेच ओळखता येतात असं नाही हे मला रामन यांना दाखवून द्यायचं होतं म्हणून मी त्यांची अट मान्य केली. त्यांनी मला जीव, रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. सुब्रह्मण्यम यांना जाऊन भेटायला सांगितले. विचित्र अटीवर प्रवेश दिलेल्या या मुलीला काम काय द्यायचं आणि कुणाच्या हाताखाली? असा डॉ. सुब्रह्मण्यम यांच्यासमोरचा प्रश्‍न होता. अखेर श्रीनिवासय्या या अतिशय शिस्तबद्ध शास्त्रज्ञानं मला त्यांच्या हाताखाली काम करायची संधी दिली. चेहरा उग्र, रंग काळाकुट्ट, केस लांब वाढवून त्यांची गाठ मारलेली, लांब दाढी, कपाळावर गंधाचा टिळा, डोक्यावर गांधी टोपी, कर्नाटकी पद्धतीने काचा मारून नेसलेलं धोतर आणि वर सदरा असं श्रीनिवासय्या यांचं रूप आणि वेशभूषा. लोक त्यांना इन्स्टिट्यूटमध्ये दुर्वासमुनी म्हणत. त्यांनी कामाची संधी दिली खरी पण त्याबरोबर कठोर वेळापत्रकही दिलं. म्हणाले, ‘रोज पहाटे पाचच्या ठोक्याला प्रयोगशाळेत हजर व्हायचं आणि रात्री दहा वाजेपर्यंत मन लावून काम करायचं. देईन त्या प्रश्‍नांवर काम करायचं. याखेरीज रात्री लायब्ररीत वाचन केलंच पाहिजे. दुपारचं जेवण माझ्या डब्यातून आणि रात्रीचं जेवण इन्स्टिट्यूटच्या मेसमध्ये घ्यायचं. असं केलंस म्हणजे बिनमहत्त्वाच्या गोष्टीत वेळ वाया जाणार नाही.’ मला बाकी सगळं मान्य होतं, पण फक्त सायंकाळी ४ ते ६ हा वेळ माझ्यासाठी हवा होता. मी तसं सांगितलं, तर त्यांनी विचारलंच, ‘हे दोन तास तुला कशासाठी हवेत?’ माझं उत्तर स्पष्ट होतं, ‘टेनिस खेळायला!’ रोज दोन तास मोकळ्या हवेत मी टेनिस खेळले तर माझे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम टिकेल आणि तुम्ही दिलेला कठीण कार्यक्रम मला पार पाडता येईल. इन्स्टिट्यूटमधील प्रोबेशनचा कालावधी सुरू झाला. सकाळी ५ वाजण्याच्या आधीच मी प्रयोग शाळेत पोहोचलेली असायची. दिवसाचे १७-१८ तास कामात जायचे. या कालावधीत मी काय काय शिकले माहिती आहे? पहिल्या तीन-चार महिन्यात काच प्रचंड उष्णतेने वितळवून आणि तिच्यात हवा भरून प्रयोगशाळेतील उपकरणं तयार कशी करायची हे मी शिकले. पाण्याच्या सहाय्याने पृथःकरण करताना लागणारे फिल्टर्स म्हणजेच मेम्ब्रान्स् विशिष्ट प्रकारच्या सेंद्रीय चोथ्यापासून कसे तयार करायचे हेही शिकले.

एक दिवस श्रीनिवासय्या यांनी विचारले, ‘तू संशोधन सुरू करणार का?’ माझा आनंद गगनात मावेना. त्यांनी मला प्रथिनांचा अभ्यास करण्याविषयी सुचवलं. मी प्रथिनांचे पृथःकरण करायला शिकले. मी आईच्या, गाईच्या, म्हशीच्या, शेळीच्या आणि गाढविणीच्या दुधाचंसुद्धा पृथःकरण केलं. निष्कर्ष गंमतीचे निघाले. पचायला सगळ्यात सोपं दूध आईचं आणि त्यानंतर गाईचं अशी सर्वसाधारण समजूत, पण माझ्या संशोधनातून स्पष्ट झालं की, आईच्या दुधापाठोपाठ पचायला सगळ्यात सोपं दूध हे गाढविणीचं असतं आणि त्यानंतर गाईचं. म्हशीचं दूध पचायला सगळ्यात कठीण. मग मी आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. सर्व दुधांच्या प्रथिनांपासून नॉन प्रोटिन्स म्हणजे न-प्रथिन बाजूला काढली आणि मला वेगळाच शोध लागला. गाढविणीच्या दुधातला न-प्रथिन घटक जर म्हशीच्या दुधात घातला तर म्हशीचं दूध पचायला हलकं होतं. मला वाटलं, मानवी दुधाच्या तुलनेत म्हशीच्या दुधात सायीचं प्रमाणही बरंच जास्त असतं. ते प्रमाणही कमी करता आलं तर म्हशीचं दूध लहान अर्भकाला पचू शकेल असं वाटल्याने मग मी ह्यूमनायझेशन ऑफ बफेलो मिल्क असा प्रयोग हाती घेतला आणि प्रोबेशन सुरू असतानाच तो यशस्वीही केला. या प्रयोगाला फार प्रसिद्धी मिळाली नाही आणि त्याचा पाठपुरावाही पुढे झाला नाही त्यामुळे त्याचा वापर सार्वत्रिक स्वरूपात झाला नाही हा भाग वेगळा! दुधावरचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर माझे कडधान्यांवरचे प्रयोग सुरू झाले. विशेष म्हणजे भारतात कडधान्यांवर असे प्रयोग प्रथमच केले जात होते. या प्रयोगातून असं स्पष्ट झालं की, मटकीतील प्रथिनं ही मूगापेक्षाही पचायला अधिक सोपी असतात. आजही छोट्या मुलांना वरचा आहार देणे सुरू होते तेव्हा मूग द्यावे असं सुचवलं जातं, पण प्रत्यक्षात मटकी अधिक लाभदायक ठरू शकते. कडधान्यांना मोड आणले की ती पचायला अधिक सोपी होतात. मोड येण्याच्या प्रक्रियेत त्यांच्यामध्ये ‘क’ जीवनसत्व तयार होतं. ‘ब’ जीवनसत्व आणि फॉलिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. आता संशोधनाविषयीची माझी ओढ वाढतच चालली होती, पण वडिलांवर आर्थिक बोजा टाकून शिकणं, संशोधन करणं पटत नव्हतं. मग शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले. मला शासनाची दोन वर्षांची टेक्निकल रिसर्च स्कॉलरशिप मिळाली. देशात ही शिष्यवृत्ती मिळविणारी मी पहिलीच महिला. तर पैशांचा प्रश्‍न असा सुटला. ज्या वयात तरुण-तरुणी प्रेमकथा आणि कादंबर्‍या वाचतात त्या वयात मी जगविख्यात शास्त्रज्ञांचे प्रबंध वाचत होते. प्रोबेशनचे एक वर्ष संपलं. मी सर रामनना भेटायला गेले. विचारलं, ‘मी इथं राहायचं की जायचं? मला प्रवेश देणार आहात का?’ तर रामन कौतुकानं म्हणाले, ‘व्हॉट अ सिली क्वश्‍चन? तू इथंच राहून संशोधन करायचंयस! यापुढे इन्स्टिट्यूटचे दरवाजे लायक विद्यार्थिनींना नेहमीच खुले राहतील.

 

यावर्षीच मी आणखी दोन विद्यार्थिनींना इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश देऊन माझी मागची चूक सुधारणार आहे!’ -मला आनंद तर झालाच, पण सर रामन यांच्या मोकळेपणानी चूक कबूल करण्यातून त्यांचं मोठेपणही जाणवलं. १९३६ साली मी माझा प्रबंध पूर्ण केला आणि मुंबई विद्यापीठाला सादर केला. एम.एस्सी. झाले. आता पीएच.डी., मला तीदेखील श्रीनिवासय्या यांच्या मार्गदर्शनाखालीच करायची होती, पण इन्स्टिट्यूटच्या अधिकार्‍यांनी श्रीनिवासय्या यांनी उच्च शिक्षणासाठी स्वीडनला जाण्याची सूचना केली आणि त्यांनी ती मान्य केली. नाईलाजाने मी मुंबईला परतले. मधली एक गंमत सांगायचीच राहिली. बंगलोरमध्ये मी रोजच्याप्रमाणे एकटीच टेनिस कोर्टवर प्रॅक्टिस करीत होते. इतक्यात इन्स्टिट्यूटचे अधिकारी एम. डी. भट आणि कोल्हापूरचे शिरगावकर अशा दोन मान्यवरांना घेऊन आले. आलेल्या मान्यवरांनी चौकशी केली, ‘एकटीच टेनिस खेळणारी ही मुलगी कोण?’ माझं नाव सांगितलं तर त्यांना माझे वडील आणि काका यांची माहिती होती. शिरगावकर तर म्हणाले, ‘एन. व्ही. भागवत वेस्टर्न इंडियाचे टेनिस चॅम्पियन आहेत आणि ते आमच्या कोल्हापूरच्या महाराजांबरोबर टेनिस खेळायला येतात!’ माझी माहिती समजल्यानंतर भट यांनी तर आपण स्वतःच बंगलोरमध्ये आहोत तोपर्यंत रोज माझ्याबरोबर टेनिस खेळायला यायची तयारी दर्शविली. ते माझे टेनिसमधले गुरूच झाले. यानंतर वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत मी टेनिसच्या अनेक स्पर्धा खेळले आणि अनेक बक्षिसेही जिंकली. मुंबईला परतल्यावर मी हाफकिन इन्स्टिट्यूटच्या फार्माकॉलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये प्रवेश घेतला. तिथे तयार होणार्‍या वेगवेगळ्या औषधांचे कुत्री, मांजरे, ससे यांच्यावर काय परिणाम होतात हे तपासण्याचे काम प्रयोगातून करावे लागले. हे काम करीत असतानाच माझ्या प्रयत्नांना फळ आले. स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप व सर मंगलदास नथुभाई फॉरिन स्कॉलरशिप या दोन शिष्यवृत्ती मला मिळाल्या.

वाईट इतकंच होतं की,यापैकी सर मंगलदास नथुभाई शिष्यवृत्ती ही फक्त इंग्लंडमध्ये काम करण्यासाठी होती आणि मला तर युरोपमध्ये काम करण्याची ओढ होती. त्यातच एक दिवस दुर्गूताईबरोबर मी चर्चगेट स्टेशनबाहेर पडत असताना एक धिप्पाड पठाण गडबडीनं येता येता अडखळून नेमका आमच्या पायांवर पडला. त्याच्या वजनानं दोघींचेही पाय चांगलेच दुखावले. दुर्गूताई तर टिटॅनसचा झटका येऊन आजारी पडली. अखेर एक महिना उशिरा का होईना मी इंग्लंडला जाण्यासाठी बोटीनं निघाले. कोणत्या कॉलेजमध्ये जायचे, कुठे राहायचे काहीच निश्‍चित नव्हते. मी त्यावेळी कोपनहेगनमध्ये असणार्‍या श्रीनिवासय्या यांना भेटून त्यांचा सल्ला घ्यायचा असं ठरवलं. १९३७ च्या डिसेंबर महिन्यात मी केंब्रिजला गेले. तेथे सर विल्यम डन इन्स्टिट्यूट ऑफ बायो-केमिस्ट्रीमध्ये ख्यातनाम नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ सर एफ्. गॉलंड हॉपकिन्स यांना भेटले. जीव-रसायनशास्त्राचे जनक म्हणून सर्वज्ञात असणार्‍या या शास्त्रज्ञाची भेट म्हणजे भाग्यच, पण या इन्स्टिट्यूटमध्ये जागाच शिल्लक नव्हती. मला निराशेनं ग्रासलं. अखेर डॉ. डेरिक रिक्टर या जीव-रसायनाच्या संशोधकानं मला मदतनीस म्हणून घ्यायचं मान्य केलं. अट एकच, मला डॉ. रिक्टर यांच्या जागी प्रयोगशाळेत फक्त दिवसा काम करता येईल आणि रात्री डॉ. रिक्टर स्वतः काम करतील. प्रयोगशाळेतील फर्निचरच्या तुलनेत मी लहानखुरी होते. माझ्यासाठी मग एक नऊ इंच उंचीचा पाट तयार करून घेण्यात आला. या पाटावर उभी राहून मी प्रयोगशाळेत काम करू शकत असे. सुरुवातीला त्या इन्स्टिट्यूटमधील काही जीव-रसायन तज्ज्ञांनी माझी टिंगल केली, पण नंतर माझी कसून मेहनत कामी आली. डॉ. रिक्टर यांनी केंब्रिजच्या पीएच.डी.साठी मला मार्गदर्शन करणंही मान्य केलं. खरं तर मी गांधीजींच्या नेतृत्वाखालील जशी स्वातंत्र्यासाठीच्या सत्याग्रहात सामील झाले होते आणि माझ्या मनात ब्रिटिशांविरुद्ध चीड होती, पण डॉ. हॉपकिन्स, डॉ. रिक्टर यांनी मी भारतातील मुलगी असूनही मला ज्या पद्धतीने सहकार्य केले त्यामुळे ब्रिटिशांबद्दलचे माझ्या मनातील किल्मिष नाहिसे झाले.

इंग्लंडमध्ये केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळाल्याने मी अमेरिकेी स्कॉलरशिप नाकारली, पण अमेरिकेतील आय.एफ.यु.डब्ल्यू.कडून मग मला प्रवासी शिष्यवृत्ती मिळाली. विशेष म्हणजे १९३८ साली युरोपात लीग ऑफ नेशन्सची बैठक होती. तेथे विद्यार्थी परिषदेमध्ये भारत, इंग्लंड आणि अमेरिका अशा तीनही देशांचे प्रतिनिधित्व करण्याची अपूर्व संधी मला मिळाली. केंब्रिजमध्ये मी सुरुवाती डॉ. रिक्टर यांच्याबरोबर निरनिराळ्या प्राण्यांच्या पेशींमध्ये शारीरिक क्रियांमध्ये प्राणवायू व ॲड्रीनलिन या संप्रेरकाच्या संयोगाने काय परिणाम होतात, याचे संशोधन केले, तर रॉबिन हिल यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतींमधील संप्रेरकांवरही काम केले. प्राण्यांच्या पेशींप्रमाणेच वनस्पतींमध्येही सायटोक्रोम सी आढळत असल्याचा शोध अचानकच मला लागला आणि त्याबाबतचा माझा लेख ‘नेचर’ या जगप्रसिद्ध मासिकात प्रसिद्धही झाला. केंब्रिजमध्ये दाखल झाल्यापासून अवघ्या १४ महिन्यात मी पीएच.डी.साठीचा प्रबंध सादर केला. त्यात बटाट्यावरचे संशोधन आणि वनस्पतींच्या पेशींमधील सायटोक्रोम सी चा आढळ नोंदविला. गंमत म्हणजे इतरांचे संशोधन प्रबंध हजार-दोन हजार पानांचे, तर माझा केवळ ४० पानांचा. तरीही व्हायवामध्ये ८५ प्रश्‍न विचारले गेले आणि ४ जून १९३९ ला मला याच संशोधनासाठी केंब्रिज विद्यापीठाची पीएच.डी. मंजूरही झाली. केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. करणारी मी पहिली भारतीय महिला आणि अवघ्या १४ महिन्यात प्रबंध सादर करणे हाही एक विक्रमच. डॉ. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांनी तर थेट शिकागोमधून केंब्रिजला येऊन माझे अभिनंदन केले आणि अमेरिकेत येऊन पुढची कारकीर्द घडविण्याचे आवाहन केले. मी मात्र ठामपणाने आता भारतातच परत जाणार आणि येथे मिळविलेले ज्ञान इतरांना देणार असं सांगितलं. असं करण्यानं मी माझं ज्ञान फुकट घालवेन असं डॉ. चंद्रशेखर यांचं म्हणणं होतं, पण मला ते पटणं शक्य नव्हतं. ज्ञान मिळवायचं ते देशासाठी आणि ज्ञानाचा उपयोग करायचा तोही आपल्या देशासाठीच, हा माझा निश्‍चय होता. माझ्या आयुष्याचा पुढचा अध्याय दिल्लीमध्ये लिहिला गेला. भारतात परतताना युद्धबंदी म्हणून काही काळ घालवावा लागण्यासारख्या गोष्टी घडल्या होत्या, त्यामुळे दिल्लीत लेडी हार्डिज कॉलेजमध्ये रूजू व्हायला थोडा वेळ झाला. जीव-रसायन शास्त्राची व्याख्याती म्हणून काम सुरू झाले. पहिल्या, दुसर्‍या आणि चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनींना जैवरसायन शास्त्रावरची व्याख्याने द्यायची, दुसर्‍या वर्षीच्या मुलींची प्रात्यक्षिकं घ्यायची आणि लेडी हार्डिज हॉस्पिटलमधून आलेल्या रक्तांच्या नमुन्यांचे पृथःकरण करायचे, हे काम माझ्यासारख्या संशोधनात रस असलेल्या मुलीला कंटाळवाणं वाटलं यात नवल नाही. दिल्लीमध्ये एक-दोन गोष्टी चांगल्या झाल्या, तर काही अनुभव वाईटही आले.

महात्मा गांधींचे सचिव प्यारेलाल यांची बहिण डॉ. सुशीला नायर हिला रक्तातील कोलेस्टेरॉल आणि निरनिराळ्या दुखण्यात त्यांचा होणारा प्रभाव या विषयात एम. डी. होण्यासाठी संशोधन करायचं होतं. या संशोधनासाठी तिची मार्गदर्शक म्हणून मला काम करता आलं. दिल्लीमध्ये संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे, भास्करराव आडारकर, महात्मा गांधींचे सुपुत्र देवीदास गांधी अशा सर्वांशी छान मैत्री झाली, मात्र दिल्लीतील वेगवेगळ्या क्लबमध्ये निमंत्रणावरून मी टेनिस खेळायला जात असताना ज्यांच्याशी ओळख झाली अशापैकी काही उच्चभ्रू लोकांनी एक तरुण स्त्री म्हणून माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करून खूप मनस्तापही दिला. हा मनस्ताप इतका असतो की, एखादी तरुणी रूपवती, बुद्धिमान आणि थोडी मोकळेपणाने वावरणारी असली तर ईश्‍वरच तिचे रक्षण करो असे म्हणण्याची वेळ येते! ...सुशिक्षित, सुसंस्कृत, कर्तबगार स्त्रीकडे पाहण्याचा काही पुरुषांचा दृष्टिकोन असा विकृतच का असतो? १९४२ मध्ये मी कुन्नूर या छोट्याशा गावात दाखल झाले.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कुन्नूरमध्ये आहार शास्त्रावर संशोधनासाठी पाश्‍चर इन्स्टिट्यूट व न्यूट्रिशन रिसर्च लॅबची स्थापना केली होती आणि या लॅबमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून माझी निवड झाली होती. कुन्नूरला जाण्यापूर्वी दिल्लीच्या हिंदू-मुस्लिम संमिश्र वस्ती असलेल्या एका भागात फक्त मुसलमान माणसांमध्ये ‘गॉयटर’चे प्रमाण का जास्त आहे याचा अभ्यास करायला मला सांगण्यात आले होते. अभ्यास केला तेव्हा मुस्लिम लोकांच्या आहारात मटणाबरोबर सलगमचे प्रमाण खूप असल्याने त्यांना ‘गॉयटर’चा त्रास होत होता, हे माझ्या लक्षात आले. तसा अहवालही मी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला दिला, पण त्याचं पुढं काय झालं कुणास ठाऊक! कुन्नूरमधल्या प्रयोगशाळेतही मी एकटी स्त्री होते आणि एका बाईने लॅबची असिस्टंट डायरेक्टर म्हणून आपल्या डोक्यावर येऊन बसावं हे बर्‍याच पुरुषांना अजिबात आवडत नव्हतं. याचाच भाग म्हणून जेव्हा जेव्हा लॅबचे डायरेक्टर डॉ. ऍक्रॉईड परगावी जात तेव्हा डायरेक्टरपदाचे अधिकार मला दिले जात नसत, तर पाश्‍चर इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टरना दिले जात असत. कुन्नूरमध्ये ब जीवनसत्वाचे परिणाम पाहण्यासाठी मी प्रथमच पांढरे उंदीर आणि कबुतरे वापरली, तर क जीवनसत्वाचे परिणाम पाहण्यासाठी गिनीपिग्जचा वापर केला. प्राण्यांवर प्रयोग करायला ज्या त्या प्राण्याच्या आयुर्मानानुसार वेळ लागतो तसेच त्यांना द्यावा लागणारा आहार, त्यांचे पिंजरे यासाठीही बराच खर्च होतो. श्रीनिवासय्या यांच्या सल्ल्यानुसार मी हा खर्च व प्रयोगांचा वेळ कमी करण्यासाठी वेगळाच उपाय शोधला.

ब जीवनसत्वाच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी मी तांदळातील किडे वापरले. तांदळातील किड्यांचे आयुर्मान कमी असल्यामुळे प्रयोग चार-पाच दिवसात संपायचा आणि त्यांना द्यावा लागणारा आहारही खूप कमी लागायचा. ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे माणसात ‘बेरीबेरी’ हा रोग उद्भवतो तसाच तो प्राण्यांमध्येही आढळतो. रक्तामध्ये पायरुविक आम्लाचे प्रमाण या रोगात वाढलेले असते. कबुतरे, उंदीर यांच्याप्रमाणेच तांदळातील किड्यांमध्येही ब जीवनसत्वाच्या अभावाने पायरुविक आम्लाचे प्रमाण वाढते हे माझ्या प्रयोगातून स्पष्ट झाले. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही नावाचा रोग होतो. मी गिनीपिग्जना क जीवनसत्व विरहित आहार दिला तर त्यांच्यामध्येही माणसांप्रमाणेच सर्व लक्षणे आढळून आली. या सुमारास मला एक गोष्ट आठवली. कोल्हापुरात कुस्तीगिर मल्ल रोज मूठभर भिजवलेले हरभरे आणि गूळ खातात आणि त्यामुळे त्यांना शक्ती येण्याबरोबरच कुस्ती खेळताना कमी जास्त लागले तरी फारसा रक्तस्त्राव होत नाही. मी यामागचे कारण शोधायचे ठरवले. निरनिराळी द्रावके वापरून हरभर्‍यापासून द्राव तयार केले आणि त्यांचा गिनीपिग्जवर वापर केला. क जीवनसत्व विरहित आहारावर ठेवलेल्या गिनीपिग्जना त्वचेखाली रक्तस्त्राव होत होता तो हरभर्‍याच्या द्रावाने कमी झाला. समतोल आहार दिलेल्या गिनीपिग्जच्या पाठीवर पंपाने मोठा दाब दिला तेव्हाही रक्तस्त्राव झाला, पण याच गिनीपिग्जना हरभर्‍याचा द्राव देऊन मग प्रयोग केला तर रक्तस्त्राव झाला नाही. म्हणजेच हरभर्‍याच्या द्रावामध्ये रक्तवाहिन्यांना मजबूत करणारी काही शक्ती आहे हे निश्‍चित, असे मला जाणवले. दुसर्‍या महायुद्धाचा तो काळ असल्याने लॅबमध्ये जवानांना दिल्या जाणार्‍या अन्नाची पौष्टिकता कशी वाढवता येईल, यावरही प्रयोग सुरू होते. या जोडीलाच मी शाळकरी मुलांच्या आहारावर एक प्रयोग केला. भुईमुगातून तेल काढून घेतल्यावर तेल कारखान्यात जी पेंड शिल्लक राहते त्यामध्ये ब जीवनसत्वाचे प्रमाण मोठे असते.

आपल्याकडे ही पेंड गुरांनाच खाऊ घालण्याचा प्रघात होता, पण मी ही पेंड काही संस्करण करून शाळकरी मुलांच्या आहारात वापरायला सुुरुवात केली आणि त्यामुळे मुलांचा आहार जास्त सकस बनला. लॅबच्या जवळच असलेल्या सीम्स पार्कमध्ये असलेल्या तलावात कार्प म्हणजे मरळ जातीचे मासे होते. लोक हे मासे आवडीने खात, पण हे मासे खाण्याने माणसांच्या शरीरातील ब जीवनसत्वाचा नाश होऊन त्याचा तुटवडा जाणवायला लागतो हे मला प्रयोगातून लक्षात आले. याचवेळी डॉ. बीरराघवन यांना ‘राबीज’ची लस तयार करण्यासाठी बायोटिन या ब समूहातील जीवनसत्वाची गरज होती आणि ते बाजारात उपलब्ध होत नव्हते. मी बदकांच्या अंड्यांपासून बायोटिनची निर्मिती केली आणि डॉ. बीरराघवन यांचा प्रश्‍न सोडविला. कुन्नूरमधील दिवस असे जात होते. उन्हाळ्यात थंड हवेेचे ठिकाण म्हणून कुन्नूरला अनेक बडे लोक येत. माझा त्यांच्याशी परिचय झाला. हैदराबाद संस्थानचे मुख्यमंत्री पिंगल रेड्डी यांची मुलगी राणी कुमुदिनी देवी, तिचे पती राजा रामदेव राव, डॉ. चेरियन आणि सौ. तारा चेरियन, डॉ. अनंतन, डॉ. बलसारा दाम्पत्य, डॉ. सुशीला सुरी अशी परिचय झालेल्या मान्यवरांची अनेक नावे. १९४४ मध्ये लष्करातील एक अधिकारी पाश्‍चर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर बनले. ते अतिशय उद्दाम वर्तन करणारे होते. विशेषतः डॉ. अॅक्राईड कुन्नूरबाहेर असले की ते लॅबच्या लोकांना आणि मलाही वेळोवेळी बोलावून घेऊन आर्मी ग्राऊंडवर परेड घेत असल्याप्रमाणे गुरकावून तोंडाला येईल ते बोलत सुटायचे

या जाचाला कंटाळून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे त्यांच्याविरुद्ध तक्रार करावी लागली. कर्नल कॉटर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली गेली. या कॉटरसाहेबांनी चौकशीनंतर लॅबच्या लोकांना अकारण त्रास दिल्याबद्दल पाश्‍चर इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टरांना तंबी तर दिलीच, पण त्याचबरोबर न्यूट्रिशन लॅबसाठी स्वतंत्र डायरेक्टर नेमण्याची शिफारसही केली. कारण डॉ. ऍक्राईड यांची बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाची चौकशी करण्यासाठीच्या कमिशनवर नियुक्ती झाली होती. वास्तविक न्यूट्रिशन लॅबच्या डायरेक्टर पदावर माझा हक्क होता, पण एक स्त्री म्हणून माझ्या नावाचा विचारच न करता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने माझ्यापेक्षा कमी अर्हता असलेल्या डॉ. पासमूर या आर्मीत डॉक्टर असलेल्या ब्रिटिश शास्त्रज्ञाची डायरेक्टर म्हणून नेमणूक केली. हा अधिकारीही उद्दाम होता. त्याचा मनमानी कारभार सुरू झाला. लॅबच्या अॅनिमल्स हाऊसमध्ये संशोधनासाठी ठेवाव्या लागणार्‍या प्राण्यांवर होणार्‍या खर्चाच्या नावावर खूप पैसे खाल्ले जातात असं कोणी तरी या अधिकार्‍याच्या मनात भरवलं आणि त्या वेड्यानं एक हजार उंदीर एका पिपात घालून जाळून टाकले.

पासमूर यांची उचलबांगडी झाल्यानंतरही माझ्यावर डायरेक्टरपदाची जबाबदारी सोपवावी असं कोणाला वाटलं नाही उलट पुन्हा एकदा माझ्यापेक्षा गुणवत्ता आणि अर्हता कमी असलेल्या डॉ. व्ही. एन. पटवर्धन यांना डायरेक्टर बनवण्यात आले. अशा माणसाची अरेरावी आणि त्याच्या हाताखाली काम करणे माझ्या स्वभावाला मानवेना. राजीनाम्याचा विचार मनात घोळायला लागला. नेमक्या याचवेळी माधवराव सोहनी माझ्या आयुष्यात आले. कुन्नूरमध्ये येऊन त्यांनी मला मागणी घातली. लग्नाला मी होकार दिला, पण माझी अटही सांगितली. मी म्हटलं, ‘लग्न केले तरी निव्वळ गृहिणी बनून राहणं मला नाही जमणार. माझ्या आवडीचं संशोधनाचं काम मी करीतच राहीन.’ माधवरावांनीही ही गोष्ट मान्य केली. त्यांचं म्हणणं फक्त इतकं होतं की, आपण लग्नानंतर एका गावामध्येच राहू. बाकी तुला हवं ते तू करू शकतेस. अचानक एका आठ वर्षे वयाच्या मुलासाठी काही करण्याची संधी मला मिळाली. सरकारी रुग्णालयात तो मुलगा दाखल होता आणि त्याच्या त्वचेखाली ठिकठिकाणी रक्तस्त्राव होत होता. क जीवनसत्वाच्या आत्यंतिक कमतरतेमुळे असे घडते म्हणून त्याला क जीवनसत्वाचे मोठे डोस दिले गेले, पण काही फरक पडेना. मुलाला दिलेले संपूर्ण क जीवनसत्व त्याच्या लघवीवाटे बाहेर पडत होते. मी त्यावेळी हरभर्‍यातील प जीवनसत्वाचा अभ्यास करीत होते. रक्तवाहिन्यांचं आवरण या जीवनसत्वामुळे मजबूत होते हे माझ्या लक्षात आले होते. या मुलाला चणे खायला दिले तर? माझ्या मनात आलं आणि मी प्रयोग सुरू केला. हरभर्‍याला मोड आणून ते प्रेशर कुकरमध्ये शिजवायचे आणि त्यात मीठ व लिंबू घालून दिवसातून दोनदा अर्धी-अर्धी वाटी ते हरभरे मुलाला खायला द्यायचे. चार-पाच दिवसातच या मुलाला होणारा रक्तस्त्राव थांबला. प आणि क या जीवनसत्वाच्या जोडीने ही किमया घडविली. गंमत सांगू? मी हा जो प्रयोग केला तसा प्रयोग रशियामध्ये पुढे १९७७ मध्ये झाला आणि चर्चेचा विषय बनला, पण मी केलेला हा प्रयोग होता १९४३-४४ मधला. मी कुन्नूरला असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू शरदचंद्र बोस व लाला भरतराम यांना कुन्नूरमध्ये स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते. राष्ट्रभक्त असणार्‍या मला एक दिवस शरदचंद्र बोस यांचे एक गोपनीय पत्र मद्रासला पोहोचविण्याचे काम करता आले. राष्ट्रकार्यात मी उचललेला हा एक खारीचा वाटा होता. १९४७ मध्ये लग्न झाल्यानंतर मी मुंबईत आले. मुंबईत महाराष्ट्र सरकारने इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जीव-रसायनशास्त्र विभाग नुकताच सुरू केला होता. तेथे मी १९४९ मध्ये प्रोफेसर म्हणून रूजू झाले. इथं मी एखादा पदार्थ अतिथंड करून गोठविण्याची आणि त्याचे निर्जलीकरण करण्याची यंत्रसामुग्री स्वतः बनविली. तसेच शीतगृह पण तयार करून घेतले. या विभागात आम्ही नीरा या नैसर्गिक पेयाच्या पौष्टिकतेबाबत आणि कडधान्यावरही संशोधन केले. कडधान्यांमधील ट्रिप्सीनविरोधक घटक शोधून काढायचा आमचा प्रयत्न होता. ट्रिप्सीन म्हणजे यकृतातून स्त्रवणारा एक महत्त्वाचा द्रव, पण काही कडधान्यांमध्ये असणार्‍या ट्रिप्सीनविरोधक घटकांमुळे कडधान्ये नीट पचत नाहीत. यावर मात करण्याचा उपाय आम्ही शोधला. आयुष्यात अशा खूप गोष्टी केल्या. हापकिन इन्स्टिट्यूटची पुनर्रचना, बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठातील जैव-रसायन विभाग सुरू करणे, पब्लिक सर्व्हिस कमिशनवर काम करणे अशा जबाबदार्‍याही पार पाडल्या.

माझ्या आयुष्यातील काही सुवर्णक्षणांपैकी एक क्षण म्हणजे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी डॉ. होमीभाभा यांच्यासमवेत मुंबईत इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये माझ्या विभागाला दिलेली भेट. नीरा या पेयाबाबत संशोधन करण्याची सूचना डॉ. राजेंद्रप्रसादांनीच मला केली होती आणि याचसंदर्भातील संशोधनासाठी मला १९६० साली राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट संशोधनासाठीचं पदक बहाल करण्यात आलं. तत्पूर्वी आरे मिल्क कॉलनीतील पाश्‍चराईज्ड दुधाच्या बाटलीत किडे का होतात यासारख्या समस्येवर मला काम करावे लागले. प्रयोगात लक्षात आलं की, दुधात होणार्‍या किड्यांचं जीवनचक्र १३ दिवसांचं असतं. पाश्‍चरायझेशनच्या वेळी तीव्र उष्णतेने किडे मरतात, पण त्यांची अंडी मरत नाहीत. ती सुप्तावस्थेत राहतात. अतिथंड तापमानातही ती सुप्तावस्थेत असतात, पण बाटलीतलं दूध ग्राहकापर्यंत पोहोचायला वेळ लागला की आपल्याकडच्या उष्ण हवामानामुळे दुधातील किडे अंडी फोडून बाहेर येतात. आरे मिल्क कॉलनीत बाटली धुतली जातेच म्हणून अनेक ग्राहक बाटली नीट धुवत नसत आणि अशावेळी या दुधाच्या बाटल्यांमध्ये राहिलेल्या दुधाच्या अंशाकडे आकृष्ट होऊन माशा व किटक बाटल्यात शिरतात आणि तेथेच अंडी घालतात. ही अंडी तशीच राहून गेल्याने पाश्‍चराईज्ड दुधात किडे आढळण्याचा प्रकार घडला होता. हे निदर्शनास आणल्यानंतर आरेमध्ये मला आणखीही काही प्रयोग करण्याची संधी मिळाली. १९६९ साली मी रीतसर निवृत्ती पत्करली. आयुष्यभर संशोधन केलं आणि गृहिणी म्हणून जबाबदार्‍याही सांभाळल्या, तरी काही प्रश्‍नांची उत्तरे मला मिळाली नाहीत. कर्तृत्व सिद्ध केलं तरी स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही पुरेशा प्रमाणात का बदलत नाही? लग्न केल्यानंतर स्त्रिया आपलं व्यक्तिमत्त्व आणि आपल्या गुणांचा विकास याकडे दुर्लक्ष का करतात? मला वाटतं आपण ज्या ज्या गोष्टीत आपल्याला आनंद वाटतो त्या करण्याचा आपला हक्क बजावायला हवा! आयुष्याच्या संध्याकाळी दुर्गूताई आणि मी एकमेकांना सातत्याने भेटायचो. अनेक सुहृदांचे मृत्यू झालेले त्यामुळे बोलण्यात मरणाच्या अनुषंगानेही चर्चा व्हायचीच.

दुर्गूताई इच्छामृत्यूचं हिरीरीनं समर्थन करत राहायची. दुर्गूताई आणि मी दोघींचंही मरणोत्रर नेत्रदान करण्याबाबत एकमत, पण देहदानाला मात्र माझा विरोध! -मेल्यानंतर मूत्रपिंडासारखा आपला एखादा महत्त्वाचा अवयव जरी कोणाच्या उपयोगी पडला तर किती छान हा विचार उदात्त नक्की आहे, पण प्रत्यक्षात जराजर्जर अवयव कोणाच्या किती उपयोगात येऊ शकतात? -आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपला देह उपयोगी पडायचा तर आपल्याकडे अतिशीत तापमानाची किती शवागारे उपलब्ध आहेत? जर शव योग्य पद्धतीने ठेवण्यासाठी शवागारेच नसतील तर देहदान केल्याने कदाचित प्रदूषणात भर पडायची, तेव्हा याबाबतीत जे करायचं ते विचारपूर्वकच करायला हवं! चला...न राहून आज खूप काही बोलत राहिले. जगणं सांगत गेले. माझ्या या आठवणींच्या मोहोळातून तुम्हाला योग्य पद्धतीनं जगण्यासाठी काही वैचारिक बळ मिळालं तर मला मनापासून बरं वाटेल!

About the Author

सोनाली नवांगुळ