
कोसळणाऱ्या सरी, झाकोळलेले आकाश पाहून मन प्रसन्न होते आणि नकळतच मल्हाराचे सूर मनात डोकावून जातात. पावसाशी एकरूप होणारा राग म्हणजे मल्हार. अर्थात नुसतं मल्हार म्हणून चालणार नाही. त्याचे अनेक प्रकार आहेत; काही प्रचलित आणि काही अनवट, दुर्मिळ, जास्ती न गायले जाणारे. मल्हाराची इतकी रूपे आहेत की त्यांचं विभाजन प्राचीन, मध्यकालीन, आणि अर्वाचीन मल्हारांमध्ये होतं. हा राग हिंदी गाण्यांमध्येही बराच वापरला गेला आहे. खूपश्या रागांची नावे, ते कुठल्या जागी निर्माण झाले (उदाहरणार्थ: सौराष्ट्र-भैरव, गुजरी तोडी, मुलतानी), किंव्हा देव-देवतांच्या नावावर (उदाहरणार्थ: भैरव, दुर्गा, सरस्वती), किंव्हा व्यक्तींच्या नावावर, किंव्हा ज्याने अमुक एक राग बांधला (उदाहरणार्थ: सूर-मल्हार, रामदासी-मल्हार) त्यांच्या नावावर ठेवलेले असते. मल्हाराचे नाव, वर्षा ऋतूत “मल-हरण” करणारा “मल-हार”, ह्यावरून पडलेलं आहे. प्राचीन मल्हारांमध्ये शुद्ध-मल्हार, गौड-मल्हार, आणि मेघ-मल्हार ह्या रागांचा समावेश आहे. हे राग साधारण पंधराव्या शतकात बांधले गेले.
शुद्ध-मल्हार शुद्ध-मल्हार हा राग, राग दुर्गा आणि राग जलधर-केदार ह्यांच्या अगदी जवळचा आहे किंव्हा ह्या दोन रागांवरच आधारलेला आहे. ह्या तिन्ही रागांच्या सुरावटी आणि स्वर बघता लक्षात येईल की सगळे स्वर सारखेच आहेत, फक्त स्वर लगाव आणि अलंकार वेगवेगळे आहेत. तरी पण राग दुर्गा आणि जलधर केदार हे बिलावल थाटातले राग आहेत तर शुद्ध-मल्हार रागाला काही दिगज्जांनी काफी थाटात घातले आहे तर काहींनी खमाज थाटात! अर्थात हा राग आता कोणी विशेष गातही नाही पण खरंतर हा राग बिलावल थाटातच पाहिजे. पंडित कुमार गंधर्वांनी ह्या रागात एक सुंदर बंदिश बांधली आहे जी तुम्ही पुढील लिंकवर टिचकी मारून ऐकू शकता. पंडित कुमार गंधर्व - राग शुद्ध-मल्हार ह्या लिंकवरून तुमच्या लक्षात येईल की शुद्ध-मल्हार हा राग किती दुर्गा आणि जलधर-केदार ह्या रागांच्या जवळ आहे. “सारेम, मरे, म रेप, धपम, मरे मरेप, मरेम, मपसोधसो, सो धपम, मरे मरेपरेम मरेसा ध़सारेसा.” हे ह्या शुद्ध-मल्हाराचे मूळ-स्वरूप आहे. हा शुद्ध-मल्हार एक रागांग राग आहे; अर्थात ह्याच्या अंगाने इतर बरचसे मल्हार राग गायले जातात.
मेघ-मल्हार मेघ मल्हार हा ही एक प्राचीन मल्हाराचा प्रकार आहे. ह्याचे रागाचे स्वरूप, “सा रे म प नि सो| सा नि प म रे सा|” अर्थात हा खूप प्राचीन राग असल्यामुळे काही गायक ह्यात दोन्ही निषाद घेतात, काही कोमल गंधार घेतात तर काहीजण कोमल गंधार आणि धैवत घेतात. पण आजकाल जास्तीकरून सगळे हा राग वर दिलेल्या स्वरूपानुसार गातात. मेघमल्हार म्हंटलं की नेहमी एक प्रश्न मनात येतो; तुमच्याही येत असेल की मेघ आणि मेघ-मल्हार म्हणजे एकच राग का? दिग्ज्जांनी लिहून ठेवले आहे की हे दोन्ही राग पृथक आहेत. अर्थात, जवळचे आहेत पण भिन्न आहेत. मेघ रागात षड्ज (सा) हा वादी स्वर आहे आणि पंचम (प) संवादी. तसच मेघ-मल्हार रागात मध्यम (म) स्वर वादी आहे आणि षड्ज संवादी. मेघ रागात रिषभ (रे) स्वर आंदोलित आहे, दीर्घ रित्या लावलेला आहे तरीपण त्याच्यावर न्यास नाही आहे. रिषभ-पंचमाची संगती आहे आणि मध्यम न्यासपूर्णही नाही आहे आणि दीर्घही नाही आहे. मेघ-मल्हार रागात रिषभ व निषाद स्वरावर आंदोलन आहे जे मेघ रागाचे स्वरूप आहे. त्यात रिषभ-पंचम स्वर संगती आहे आणि मध्यम-रिषभाची मींडयुक्त स्वर संगती आहे जी मल्हार रागाची पूरक आहे. ह्याचा अर्थ असा होतो की भारतीय अभिजात संगीतातील आपल्या गुणीजनांनी मेघ रागात, “मरे मरे प, मरे म” ही मल्हाराची स्वर-संगती घालून राग मेघ-मल्हार बांधला. ह्यात अजून एक सूक्ष्म फरक म्हणजे असा की जर मेघ रागात रिषभ स्वरावर न्यास लावला तर तो राग मदमाद सारंग व्हायची भिती असते. त्यामुळे ह्या जवळ-जवळच्या रागांवर प्रभुत्व मिळवणं हे कठोर रीयाझाचे काम आहे. पुढील लिंकवर तुम्ही विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे ह्यांनी गायलेला राग मेघ-मल्हार ऐकू शकता. द्रुत एकतालातील बंदिश आहे, “मेघश्याम घनश्याम श्याम रंग तन छायो.” मेघश्याम घनश्याम श्याम रंग तन छायो. मेघ-मल्हार हा राग अनेक हिंदी गाण्यांमध्येही वापरला गेला आहे. उदाहरणार्थ, “लेकिन” चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणं “यारा सिलीसिली” ज्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्याचं संगीत लाभलेलं आहे, किंव्हा “बूट-पॅालिश” हया चित्रपटातील मन्ना डे ह्यांनी गायलेलं आणि शंकर-जयकिशन ह्यांनी स्वरबद्ध केलेलं, “लपक झपक तू आ रे बदरवा”. खालील लिंक्सवर तुम्ही ही दोन्ही गाणी ऐकू शकता: लता मंगेशकर - यारा सिलीसिली मन्ना डे - लपक झपक तू आ रे बदरवा
गौड-मल्हार तिसरा प्राचीन मल्हार म्हणजे गौड-मल्हार. हा राग म्हणजे राग गौड आणि शुद्ध-मल्हाराचा संगम आहे. हया रागाचे स्वरूप आहे: “सा, रेग, रेगम, मग, रेगरेमगरेसा, मरे मरेप, धपम, मपधनिप, मपधनिसो| सोधनिप, धपम, रेगरेमगरेसा|” ह्यात “रेग, रेगम, रेगरेमग” हे गौड रागाचे अंग आहे आणि “मरेप, मपधसोधप म” हे राग शुद्ध-मल्हाराचे अंग आहे. दोन्ही मूळ राग बिलावल थाटाचे असल्यामुळे गौड-मल्हारमध्येही बिलावलच्या छटा दिसणं स्वाभाविक आहे. जसं “पमगमरेसा”, किंव्हा “पनिधनिसो”. काही गायक ह्यात “पधगपम, ग” ह्या स्वरूपाचा बिलावलसारखा स्वरसमुह वापरतात. ह्या रागातील सुप्रसिद्ध नाट्यगीत म्हणजे “संगीत सौभद्र” ह्यातील “नभ मेघांनी आक्रमिले”. ऐकूयात पुढील लिंकवर:पंडित प्रभाकर कारेकर - नभ मेघांनी आक्रमिले हा गायकांचा आवडता राग आहे आणि ह्यात बंदिशी आणि गाणीही बरीच आहेत. “बरसात की रात” ह्या चित्रपटातील “गरजत बरसत सावन आयो रे” हे गाणंदेखील राग गौड-मल्हारवरच आधारित आहे. ह्याचे संगीतकार आहेत रोशन आणि गीतकार आहेत साहिर लुधियानवी. हे गाणं सुमन कल्याणपूर आणि कमल बारोत ह्या दोघींनी गायले आहे. ऐकूयात पुढील लिंकवर: गरजत बरसत सावन "गरजत बरसत सावन आयो रे"हे गाणं तर खूपच लोकप्रिय आहे पण त्याची मूळ बंदिश संगीतकार रोशन ह्यांनी “मल्हार” ह्या १९५१च्या चित्रपटात लता मंगेशकर ह्यांचाकडून गाऊन घेतली आहे. ऐकूयात पुढील लिंकवर: लता मंगेशकर - गरजत बरसत भिजत आईलो पुढील लिंकवर पंडित रामश्रेय झा ह्यांचे राग गौड-मल्हारवरचे भाष्य आणि गायन आहे ते जरूर ऐका. त्यातून तुम्हाला गौड-मल्हार रागाचे स्वरूप अजून स्पष्टपणे कळेल. पंडित रामश्रेय झा- राग गौड मल्हार १६व्या शतकात बादशाह अकबरच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक म्हणजे मिया तानसेन ह्यांनी राग मिया की मल्हार बांधला असे म्हणतात. १६व्या ते १८व्या शतकातले मल्हार मध्यकालीन मल्हार मानले जातात. त्यात मिया मल्हार हया रागावर बरेचसे मध्यकालीन आणि अर्वाचिन आधारित आहेत. हया लेखाच्या पुढील भागात आपण मध्यकालीन आणि अर्वाचिन मल्हारच्या प्रकारांना अजून बारकाईने न्याहाळणार आहोत. तोपर्यंत ह्याच सरीचा आनंद लुटूयात!