पुरावा

पुरावा
मूळ लेखक - जिरो अकागावा
अनुवाद - निसीम बेडेकर

सरकारी वकिलांनी सिगरेट शिलगावली आणि धुराची वलयं सावकाश हवेत सोडली .त्यांच्या समोरच्या टेबलावर एक पांढरा कागद पसरला होता. त्यावर ठेवलं होतं सिगरेटचं एक जळकं थोटूक. अगदीच लहानसं थोटूक होतं ते - जवळजवळ फिल्टरपर्यंत राख झालेलं. एक तासाहूनही जास्त वेळ सरकारी वकील त्याच्याकडे बघत होते. असं बघत राहण्यानं त्या थोटकाचं पुन्हा एकदा सिगरेटमध्ये रूपांतर अर्थातच होणार नव्हतं.

निर्णय घेण्याची वेळ आली होती.

त्याला दोषी ठरवून खटला भरायचा, की नाही?

पुरावा केवळ एकच होता- ते सिगरेटचं थोटूक. आजच्याआज काय करायचं याचा निर्णय त्यांना सांगावा लागणार होता. त्यांच्यावर खरच कठीण वेळ आली होती. तो दोषी असण्याची त्यांना जवळजवळ नव्याण्णव टक्के खात्री होती, पण शंकेला एक टक्का जागा नव्हती असंही नाही. त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभवच त्यांना इशारा देत होता- थांब. घाई करू नकोस.

गुन्हा अन्वेषण विभागानं केलेल्या तपासाच्या निष्कर्षानुसार संशयिताचाच  रक्तगट असलेला कुणीतरी, सिगरेटचं एक थोटूक फेकून देऊन निघून गेला होता. तो संशयित नेहमी ओढत असलेल्या, एका प्रसिद्ध ब्रँडच्या सिगारेटचं थोटूक. आता हा केवळ योगायोग समजायचा, की...
 
टेबलावरचा टेलिफोन खणखणला. त्यांच्या पत्नीचा फोन होता. का कुणास ठाऊक, तिचा आवाज चांगलाच भेदरलेला होता.

"काय झालं गं?"
"अयाकोला पळवलंय कुणीतरी..."
अयाको. त्यांची पाच वर्षांची मुलगी.
"काय?"
"पळवलं हो  तिला..आत्ताच त्या माणसाचा फोन आला होता".
सरकारी वकिलांचा रिसिव्हर धरलेला हात थरथरला.
"मग हवंय तरी काय त्याला?"
"ते नाही कळलं. तुम्हालाच फोन करेल म्हणाला. तो सांगेल तसं करा हो, हात जोडते मी".
"ठीक आहे. तू  आधी शांत हो बघू . मी परत फोन करतो तुला. ओके?"
त्यांनी रिसिव्हर ठेवला. आताचा फोन हे एक स्वप्न असतं तर किती बरं झालं असतं, त्यांना वाटलं.
जवळजवळ त्याच क्षणी पुन्हा एकदा टेलिफोन वाजला.
"कोण सरकारी वकील का? आला होता का बायकोचा फोन?" जाडजूड, खर्जातला पुरुषी आवाज.
"काय हवंय तुला ? पैसे?"
"नाही. तू आता घेतलेली त्या पिसाट खुन्याची केस..."
नकळत सरकारी वकिलांची नजर त्यांच्या पुढ्यातल्या त्या थोटकावर गेली. हाच पुरावा होता, त्या केसचा.
 
"मी काय करावं असं म्हणणं आहे तुझं?"
"काय ठरवलंयस तू ? खटला भरणार आहेस की नाही?"
"ते ऐकून काय करणार आहेस तू ?"
"मुकाट्यानं  खटला भर त्याच्यावर!"
"काय?"
"नक्की खटला भरायचाय तुला, काय समजलं ? अट्टल बदमाश आहे तो. त्याला गजाआड केलं नाही तर पुन्हा कुणाचातरी मुडदा पाडेल तो."
"तू आहेस तरी कोण?"
"ते सांगण्याची गरज नाही. एक न्यायप्रिय नागरिक असं म्हणूयात का?"
"आधी माझ्या मुलीला पळवतोस आणि वर म्हणतोस न्यायप्रिय नागरिक ?"
"तिच्या केसालाही धक्का लागणार नाही तू खटला भरून त्याला दोषी ठरवलंस तर. अन्वेषण विभागाच्या तपासणीतही तेच निदान झालंय ना? वाचलंय मी वर्तमानपत्रात!"
"हो, तसं आहे खरं. पण एकाच ब्रँडची सिगरेट ओढणारे कितीतरी लोक असतात. तसंच एकाच रक्तगटाचे लोकही असंख्य असतात."
"अच्छा! म्हणजे खटला न भरण्याचा विचार दिसतो तुझा!"

क्षणभर सरकारी वकिलांना काय बोलावं सुचेना. या असल्या दबावाला बळी पडून चालणार नाही. अर्थातच. पण लग्नानंतर उण्यापुर्‍या दहा वर्षांनी जन्मलेली त्यांची एकुलती एक मुलगी - ती तर त्यांना प्राणांहूनही प्रिय होती. आणि दुसरी गोष्ट आहेच - केवळ खटला भरला म्हणून तो दोषी ठरेलच असंही नाही. पुरावा आहे काय? तर सिगरेटचं एक जळकं थोटूक!
 
"बरं. खटला भरला की होईल ना तुझं समाधान?" थोड्या वेळानं सरकारी वकील म्हणाले.
"हो,हो, अगदी तसंच. गोष्टी फार लवकर समजतात की तुला! त्याच्यावर खटला भरल्याचं कळलं, की मुलीला परत पाठवतो मी. फसवलंस तर याद राख."

फोन बंद झाला. घामानं थबथबलेल्या हातांनी सरकारी वकिलांनी रिसीव्हर ठेवला.

त्यानंतर बराच वेळ ते विचार करत बसले होते. खटला तर भरायलाच हवा-आपल्या लाडक्या मुलीसाठी. पण खटला भरला तर तो कदाचित गुन्हेगार ठरेलही. जर त्यानं गुन्हा केलेला नसला तर? आणि समजा... आता ज्यानं फोन केला तोच खरा खुनी असला तर?

सरकारी वकिलांनी आपले दोन्ही हात घट्ट आवळले. थरथरतील इतके. त्या सिगरेटच्या थोटकाकडे ते टक लावून बघत होते. अखेर त्यांनी टेलिफोनच्या दिशेने हात लांबवला.

"---हो, तसंच आहे. काय करू? एवढा एकच पुरावा आहे म्हटल्यावर पुन्हा एकदा खात्री करून घेतलेली बरी. तुम्ही परत एकदा तपासून बघाल का प्लीज? मी घेऊन येतो ते तुमच्याकडे."

ते खुर्चीवरून उठले आणि टेबलावरचं ते सिगरेटचं थोटूक त्यांनी हलकेच अॅश-ट्रेमध्ये टाकून दिलं. अॅश-ट्रेमधलं स्वतःच्याच सिगरेटचं एक थोटूक कागदावर ठेवलं आणि तो कागद एका पारदर्शक लिफाफ्यात घालून शांतपणे लिफाफा बंद केला. 
 
"छे! भलतीच गोची झाली बुवा!" अन्वेषण विभागाच्या प्रमुखांनी डोकं खाजवलं. 
"अशी चूक पहिल्यांदा घडली माझ्याकडून. जर खटला भरायच्या आधी पुनर्तपासणीचा निष्कर्ष मिळाला असता, तर तुमच्यावरही अशी लाजिरवाणी गोष्ट ओढवली नसती."
"ठीक आहे हो, मनावर घेऊ नका इतकं. होतात चुका सगळ्यांच्या हातून". असं म्हणून सरकारी वकिलांनी हात हलवून त्यांचा निरोप घेतला. 

चला, खटला भरल्यामुळे अयाकोही सुखरूप घरी परतली. तो फोन करणाराच जर खरा खुनी असेल ना, तर त्याला कचाट्यात पकडल्याशिवाय राहणार नाही मी! त्यांनी मनात दृढनिश्चय केला.
 
"हुश्श!" अन्वेषण विभागाचे प्रमुख चालत होते. त्यांना कशानं तरी हायसं वाटल्यासारखं दिसत होतं.
'एकंदरीत व्यवस्थित जमलं सगळं! तो सरकारी वकील चांगलाच माहिती आहे मला. खटला भरू नका म्हटलं तर तो खटला भरणारच! तेव्हा एकच मार्ग होता. खटला भर असं म्हणायचं आणि त्याच्या डोक्यात संभ्रम निर्माण करायचा. पण काय सुरेख चाल खेळलीन बेट्यानं. पुनर्तपासणीसाठी चक्क दुसरंच थोटूक घेऊन आला की. आता मी पडलो अन्वेषण विभागाचा प्रमुख. खरी गोष्ट त्याला सांगणं शक्य तरी आहे का? पुरावा असलेलं ते थोटूक मी चुकून अॅश-ट्रेमध्ये टाकलं आणि मग ते नेमकं कोणतं हे मला कळेना. वेळ मारून नेण्यासाठी उचललं त्यातलंच एक थोटूक आणि त्याची तपासणी करून दिला पाठवून पहिला रिपोर्ट!"

---
मूळ लेखक - जिरो अकागावा
अनुवाद - निसीम बेडेकर

Category: 

About the Author

निसीम बेडेकर's picture
निसीम बेडेकर