भारतीय अभिजात संगीतातील कोमल रिषभ

प्रत्येक माणसाचा स्वभाव कसा ठरलेला असतो. सहसा त्यात बदल होत नाही. अमुक एक माणूस म्हंटला की लगेच त्याच्या प्रकृती, स्थायी भाव लक्षात येतो. तसंच प्रत्येक स्वराचा एक स्थायी भाव असतो, त्या स्वराचं अमुक एक रागातील स्थान ठरलेलं असतं आणि तो स्वर त्या रागाचा स्थायी भाव कायम करत असतो! नाटकात जशी प्रत्येक पात्राची भूमिका असते, तसंच काहीसं ह्या स्वरांचं असतं! ह्या लेखात आपण वाचणार आहोत विविध रागांमधील कोमल रिषभ आणि हा स्वर त्या रागांना काय देतो किंव्हा स्वतःचे अस्तित्व त्या रागात कसं निर्माण करतो. गम्मत अशी की कोमल रिषभ (रे) हा स्वर सकाळी गायल्या जाणाऱ्या रागांमध्येही उद्भवतो आणि संध्याकाळच्या रागांमध्येही! भारतीय अभिजात संगीतात प्रत्येक स्वराच्या २२ श्रुती (मायक्रो-टोनस्) असतात. पाश्च्यात संगीतात प्रत्येक स्वराचे फक्त अर्धे-स्वर (शार्प आणि फ्लॅट नोटस्) असतात त्यामुळे श्रुतिंमुळे प्रकट होणारे रस आणि भाव आणि त्यातील मजा पाश्चात्त्य संगीतात नाही. कोमल रिषभ असलेले सकाळी गायले जाणारे राग म्हंटलं तर भैरव, भटियार, अहिरभैरव, बिभास, गुणकली, रामकली हे राग डोळ्यासमोर येतात.

सकाळची शांत वेळ, मंद, मधुर अगरबत्तीचा दरवळणारा सुगंध, पूर्वेला उधळलेले उषेचे रंग, नदीचा शांत काठ, देवळातील घंटांचा लांबवर ऐकू येणारा सुमधुर नाद आणि त्यात तो भारदस्त भैरवातील कोमल 'रे्'; भक्तिरसात चिंब झालेला, एक धीर-गंभीर वातावरण निर्माण करणारा. 'ग म रे सा' हा स्वर-समूह एखाद्या भक्कम आधार-स्तंभासारखा उभा. सगळया स्वरांचा आनंद घेत घेत, स्वरांची शिडी हळूहळू चढताना: 'सा रे् ग, रे् ग म पS, ग म ध् ध् पS, ध् ध् प म प' त्यानंतर 'ग म रे् सा' जणू वाट बघत, भेटीच्या उत्कंठेने आतुर झालेला! भटियार रागातील कोमल रिषभ बघितला तर भैरवासारखा स्वतःची ओढ लावणारा नसून, हळूच नकळत प्रकट होणारा आहे: 'सा म, म प ग, पगरे्सा| सारेसासाम, मपग, म् धप, धs प धs म, पगरे्सा|' असा लपत-छपत, धैवताच्या अवती-भवती फिरून झाल्यानंतर, नेहमी पंचम आणि गांधाराच्या आसऱ्यातून हळूच उमलणारा कोमल रिषभ. राग अहिरभैरवात देखील भैरवासारखाच कोमल रिषभ येतो पण त्यात त्याला कोमल धैवताची साथ नसते. बरोबर असतो तो शुद्ध धैवत(ध) आणि त्याच्या जोडीला कोमल निषाद (नि्). ह्या दोन स्वरांचा अल्हडपणा आणि त्यानंतर कोमल रिषभाचे गांभीर्य ह्याचं एक खास रसायन तयार होतं. त्यामुळे अहिरभैरव रागाचा रस जरी करूण असला तरी “सेा नि् ध नि् रै्| नि रै् रै् सेा नि्धप|पध, पधनि्, धनि्सेा, नि्सेानि्रैरैसेा” हा अहिरभैरवातील स्वर-समूह जास्त वीर-रस प्रकट करतो. हे स्वर गाताना एखादा धबधबा उंचीवरून खळाळत खाली यावा आणि भूमीला त्याने कडकडून मिठीत घ्यावं असा भास होतो. 

राग रामकली आणि गुणकली हे राग देखील भैरव थाटातलेच. पण रामकलीमध्ये भैरवसारखाच “रे् ग म प” अशा प्रकारे कोमल रिषभ घेतला जातो पण ह्या रागात “ग म् प (नि) ध् प” हा स्वर-समूह त्या कोमल रिषभाच्या गांभीर्यावर हलकीशी फुंकर घालतो आणि त्याचे स्वत्व कमी करतो. राग गुणकलीमध्ये गांधार आणि निषाद वर्ज्य असल्यामुळे कोमल रिषभ घेताना, “प म रे् सा”, “म प ध् प, ध्S ध् प म प, रे् सा” अशा प्रकारे घेतला जातो ज्यात कोमल रिषभाचे अस्तित्व ठळकपणे दिसते. त्याला “मी आहे” असं वेगळं सांगायची गरज भासत नाही. इतर स्वरांबरोबर लपंडाव खेळून एकदम प्रकट होतो तो गुणकली मधला कोमल रिषभ. त्यातील इतर स्वर जर जाई-जुईची फुले तर कोमल रिषभ त्यात शोभून दिसणारा गडद लाल गुलाब! तर असा हा कोमल रिषभ सकाळच्या रागांचा आत्मा आहे; त्यांना खुलवणारा, त्यांचा अविभाज्य घटक बनणारा, प्रत्येक रागाच्या स्वर-समूहांमध्ये चपखल बसणारा आणि वेळीच आपले सौंदर्य, स्वत्व, आणि सत्ता दाखवून देणारा! संध्याकाळच्या रागांमाधल्या कोमल रिषभाकडे वळण्याअगोदर एक गमतीची गोष्ट आहे जी भारतीय अभिजात संगिताची शक्ती, नाविन्य, आणि सृजनशीलता नमूद करते. तोडी हा सकाळी गायला जाणारा राग आहे. त्याचे स्वर आणि दुपारी चार नंतर गायला जाणारा राग मुलतानी ह्याचे स्वर एकसारखेच आहे तरी सुद्धा त्या दोन्हीमधील कोमल रिषभ किती वेगळा आहे! तोडीमध्ये कोमल रिषभ “रे् ग् रे् सा| ध़् नि़ सा रे्, ग् रे् सा| अशा प्रकारे गायला जातो. त्याला कोमल गांधाराचा न्यास असतो त्यामुळे तो कोमल रिषभ खूपच मवाळ आणि हळवा वाटतो; सोबतीसाठी गांधाराचा हात धरून येणारा! राग मुलतानीमध्ये कोमल रिषभ “नि़ सा ग् रे् सा| म् ग् रे् सा|” अशा प्रकारे गायला जातो. त्याला गांधाराचा कण-स्वर असतो पण न्यास नसतो त्यामुळे तो जास्त मोकळेपणाने प्रकटतो आणि स्वतःचे स्थान निर्माण करतो. तीव्र मध्यमावरून येताना देखील कोमल रिषभाचे अस्तित्व निर्बंध असते. तर सांगायचे हे की त्याच स्वरांमधून दोन अतिशय वेगळ्या प्रकृतीचे राग जन्मास येतात. जरी दिसायला स्वर तेच असले तरी त्यातील सूक्ष्म फरक लक्षात घेण्यासारखे आहेत. 

सायंकाळची कातर वेळ. मन आठवणींच्या वेढयात. किनाऱ्याकडे येणाऱ्या फेसाळ लाटा आणि त्या चित्रकाराने रेखाटलेले पश्चिमेचे आकाश. अशा वेळेला सायंकाळी गायले जाणारे कोमल रिषभ असलेले राग म्हणजे श्री, गौरी, मारवा, पूरिया, पूरिया-धनश्री, पूरिया-कल्याण. असं म्हणतात की कुठलाही राग सुरु केल्या केल्या पहिल्या स्वराच्या श्रुतीवरून तो कुठला आहे ते अगदी उघड असतं. अर्थात त्यात गाणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचेही कौशल्य आहे. पण असाच हा राग श्री त्यातील कोमल रीषभावरून ओळखू येतो. ह्यातील सगळे स्वर जणू त्या कोमल रिषभाकडे खेचले जातात, तो एखादं लोहचुंबक असल्यासारखा! 'सा रे्, (ग)रे्, रे्,(ग)रे्, रे्पS, रे् गरे्, रे्सा|' श्री हा राग ठराविक स्वर-समूहांमध्ये बांधलेला आहे जसं, 'म प नि सेा रै्S, रे्, रे् प, रे् ग रे् सा|' त्यातील कोमल रिषभ अतिशय व्याकुळ करणारा, कशाची तरी नकळत ओढ लावणारा आहे. गौरी रागात देखील श्री प्रमाणेच पूर्वांगात कोमल रिषभ एक चिरणारी व्याकुळता घेऊन येतो आणि उत्तरांगात तोडीसारखा जीव लावून जातो. मारवा रागातील कोमल रिषभ म्हणजे उत्कंठा आणि तिच्या जोडीला एक अपूर्णतेची भावना शिगेला पोहोचवणारा असतो. कोमल रिषभ ह्या रागाचा वादी स्वर असल्यामुळेही आणि मारव्यात षड्ज अगदी अल्प स्वरूपात असल्यामुळे दर वेळेस, 'नि़ध़् नि़रे्S, रे्गरे्S, गम्(नि)ध् म् गरे्S' अशा स्वर-समूहांमध्ये कोमल रिषभच विश्रामाचे स्थान ठरते पण त्याला षड्जासारखी किंव्हा पंचमासारखी स्थिरता नसल्यामुळे तो फार अस्वस्थ करतो.

पूरिया राग देखील मारवा रागाप्रमाणे षड्जाला चुकवून शुद्ध निषादाकडे झुकतो. पण ह्या रागात गांधाराला आणि निषादाला जास्त महत्व दिले गेले आहे आणि धैवताला कमी महत्व दिले गेले आहे. ह्यात सगळे स्वर शुद्ध लागतात, फक्त रिषभ कोमल लागतो त्यामुळेही ह्या रागाची प्रकृती मारव्या एवढी धीर-गंभीर न होता जास्त खेळकर होते. पुन्हा एकदा, राग पूरिया आणि राग सोहोनीचे स्वर एकच आहेत पण सोहोनी उत्तरांग प्रधान असल्यामुळे आणि 'ध नि सो नि ध, ग म् ग, रे् सा' अशा स्वर-समूहांमुळे ह्यात धैवत आणि गांधाराला जास्त प्राधान्य आहे आणि कोमल रिषभ दुर्बळ आहे त्यामुळे हा राग गंभीर न वाटता आक्रमक वाटतो. पूरिया-धनश्री राग संध्याकाळच्या 'कातर' या वाख्येला सिद्ध करणारा आहे. 'गम् रे्ग रे्सा| नि़रे्गम् ध् प, गम् रे्ग' ही सुरावट सायंकाळच्या गुलाबी, तांबड्या, जांभळ्या छटांमध्ये हरवून टाकणारी आहे, मन हरपणारी आहे! 'दयाघना' हे सुप्रसिद्ध गाणं ह्या रागावरच आधारलेलं आहे. गुणगुणून पहा किती व्यापून टाकतं ते! आपलं सर्वस्वच कुठेतरी लुप्त झालंय असा आभास निर्माण करतात ह्या रागाचे सूर. त्या कोमल रिषभाला कोमल धैवताची जोड मिळाल्यामुळे देखील ही जादू निर्माण होते. पूरिया-कल्याण हा राग रक्तदबाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे असं म्हणतात. का? आत्तापर्यंत ह्या लेखात कोमल रिषभ बहुतेकदा व्याकुळता, अस्वस्थता अशा भावना प्रकट करणारा आहे तर मग ह्या रागात काय वेगळं आहे? 'गगग, प ग प ग, म् ग रे् सा' बहुतेक त्या सतत येणाऱ्या 'म् ग रे् सा' ह्या सुरवाटी मुळे कोमल रिषभाचा प्रभाव खूप कमी होतो आणि हा राग सुखदायी, मनाला आनंद देणारा वाटतो. तर अशा आहेत ह्या कोमल रिषभाचा विविध छटा! स्वर तोच असला तरी त्याच्या श्रुतींमुळे आणि वेगवेगळ्या रागांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने त्याचा वापर केला गेल्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी किती परिपूर्ण वाटतो आणि कितीतरी वेगवेगळ्या भावना आणि रस प्रकट करण्यात समर्थ ठरतो. कोमल रिषभ तो व्याकुळ कोमल रिषभ तो गंभीर किती रे रिषभा रूपे तुझी मनाला करिती अस्वस्थ, तृप्त, हळवे, मवाळ!

About the Author

पाऊस६९'s picture
पाऊस६९

I am an architect turned landscape architect by profession. I have a passion for writing poetry, fiction and non-fiction in Marathi, Hindi, Urdu and English. I am proficient in Indian Classical music and an ardent listener too. I love reading, playing tennis and badminton, going for long walks, contemplating, and making the most of life in every way!

I have recently published an e-book entitled "Poetry Plume" which is available on www.bookrix.comwww.amazon.com, andwww.bn.com