सोपी नाही ती स्वच्छता

-प्रीती करमरकर

ग्रामसभेची दवंडी दिली जात होती. नेहमी सभा कधी व्हायची कुणाला पत्ताच नसायचा. कधीतरी पंचायतीचं कोणीतरी येऊन, हजेरी रजिष्टरवर सही घेऊन जायचं. याबारीला घरोघरी निरोप, गावभर दवंडी दिली होती. घरोघरी जाऊन ग्रामसभेची माहिती कळली म्हणून सह्या घेतल्या गेल्या. बायाबापड्यांना तर पानवठाच काय, झाड्याच्या वक्ताला बी ग्रामसभेचा निरोप मिळाला नि त्यांनी माना डोलावल्या. सरपंच बाईला विसावाच नव्हता. रातदिन बाई राबत होती, फिरून फिरून लोकांना ग्रामसभेला यायला सांगत होती. गावकऱ्यांच्या कानावर सारखे शब्द पडत होते, पाणी पुरवठा नि स्वच्छता, पाणी पुरवठा नि स्वच्छता. गोजाबाईच्या गवऱ्याच मसणात जायच्या बाकी होत्या पण तिने आजवर हे नवल पाहिलं नव्हतं. तिची सून कायबाय सांगत होती, गावात पान्याची योजना येनारे, काय सांगावा नळ आगदी घरात बी येईल. पर संडास बांदाया लागंल. शेजारी आबाकडे हेच बोलणं चालू होतं. त्याची नात सांगत होती की त्यांना शाळेत संडासाचं गानं शिकवलंय. आबाला ऐकूनच मळमळाया लागलं. “एकतर आदी बंद खोलीत जायचं झाड्याला अनि आता गानी बी गात्यात त्याच्यावर. मास्तरांना काय कामं न्हाय का? लेकरांना चांगलं शानं करायचं सोडून काय बी करतात.” त्यानी नातीला हाकललंच. तेवढ्यात त्यांची लेक ताई आली. ही अंगणवाडीची बी ताई. ती साऱ्यांना हेच तर सांगे. आबा मुकाट बसला. ताईनी तिच्या वावरात सोपा संडास उभारला होता, एका खड्ड्याचा. घरची सारी माणसं तिथंच जायची. सुरुवातीला नवल वाटायचं साऱ्यांना. माणसं संडास बघायला यायची. पण घरच्यांना म्हणायची जाऊन दाखवा. आता कधीबी, कुणीबी येऊन असं म्हणायला लागल्यावर ताईचा नवरा, सहदेव चिडला. तुमच्यासाठी संडासाच्याच फेऱ्या करू का दिवसभर, म्हणून विचारू लागला. पण येणारी मानसं लई पक्की. ती झाड्याच्या टायमालाच येऊ लागली. आत घानघून काही नाही बघून चकित होऊ लागली. 

आता खड्डा भरल्यावर ही लोकं काय करणार असा त्यांना प्रश्न पडायचा. ताईने एकदा अंगणवाडीतल्या लेकरांच्या आयांना बोलावलं नि संडास दाखवला. त्याची काय गरज ते समजून सांगितलं. एक खड्डा भरला तर तो गाडून टाकून दुसरीकडे खड्डा करून आडोसा करायचा ते सांगितलं. त्या घाणीतून चांगलं खत मिळतं, त्याला सोनखत म्हणतात हे बायांना कळलं. मग हे त्यांनी त्यांच्या बाप्यांना सांगितलं. काहींनी नवल करत ऐकून घेतलं. काहींना वाटलं, असंल बुवा हल्ली कायकाय शोध लागतील सांगता येत नाही. काहींनी सोनखत मधल्या सोन्याची लई टवाळी केली. ज्ञाना शेजारच्या रघूला म्हणाला, “लेका इतकं सोनं रोज घेऊन फिरतो आपन, आपन म्हणजे सोन्याचं अंडं देनारी कोंबडीच जनू.” रघ्या म्हणला, “चल आता सोनंच पेरू नि सोनंच काडू वावरातून. सहदेवला इचारू, एकरी किती लागंल?” ताईच्या कानी टवाळी जायची पण ती दुर्लक्ष करायची. तिनी अंगणवाडीजवळ एक सोपा संडास केला, लेकरांसाठी. त्यांनाच सवय लावायला हवी हे तिनं ओळखलं. संडास केला तशी अंगणवाडीचा परिसर स्वच्छ झाला. नाहीतर लेकरं कुठंही बसायची. ताईनी त्यांना हळूहळू संडासाची सवय लावली. त्या संडासाची फार प्रसिद्धी झाली. अंगणवाडी पर्यवेक्षकांनी तिला शाबासकी दिली. उत्कृष्ट अंगणवाडीच्या बक्षिसासाठी शिफारसही केली. जे तिला ओळखत नव्हते ते तिला संडासवाली बाई म्हणूनच ओळखायला लागले. एकदा गावच्या दूर असलेल्या वाडीवरचा पावणा सत्यनारायणाचं बोलावणं करायला आला होता. त्याच्या बायकोने संडास पाहिला. जाताना ताईला म्हणाली, येताना तुझा संडास घेऊन ये, आमच्या वाडीवरल्या साऱ्यांना दाखवू. तिची पाठ वळल्यावर ते जोडपं फिदीफिदी हसत वाटेला लागलं. तर असं ते गाव. 

ग्रामसभेची वेळ झाली तशी बरीचजण चावडीपुढे जमायला लागली. सुरुवातीला ते शाळेतलं गाणं सुरु झालं. त्यात शौचालय, स्वच्छता सारखे शब्द होते, जे उच्चारणे मुलांना आणि मास्तरांना कठीण जात होतं. मग हा शब्द आला की कोणी स्वच्छालय म्हणायचं, कोणी शच्चालय म्हणायचं, तर काहीजण त्यावेळी गप्प राहायचे. अशी कसरत करत गाणं संपलं. सरपंचबाई उभ्या राहिल्या. बाई तशा धडाडीच्या होत्या, त्यांना योजना, निधी, सरकारी खाती हे बऱ्यापैकी कळत होतं. पण सभेपुढे बोलणं अवघड होतं. त्यांनी पाणीपुरवठा खात्याच्या साहेबांचं स्वागत केलं. त्यानंतर उपसरपंच बोलायला उभे राहिले. ते योजनेविषयी समजून देत होते. पाण्याचा स्तोत्र शोधून तो बळकट करायला हवा. त्यासाठी लोकांचा सहभाग हवा असं काहीतरी सांगत होते. लोकात चुळबुळ, ते स्तोत्र वगैरे मास्तरमंडळींना सांगा, आमचं काय काम? पाणी मिळणार की नाही ते बोला अशी खुसफुस सुरु झाली. साहेब बोलायला उभे राहिले तसे सगळे शांत झाले. योजनेच्या खर्चापैकी १०% रक्कम आणि विजेचं थकीत बिल भरलं तरच गावाला योजना मिळेल असं त्यांनी साफ सांगून टाकलं आणि लोकांची बोलतीच बंद झाली. उपसरपंचानी स्रोतचं स्तोत्र केल्याने ते लोकांना समजावून देणे ही त्यांना आपली नैतिक जबाबदारी वाटत होती, ती त्यांनी खूप वेळ तांत्रिक भाषेत बोलून पार पडली. आधीच गप्प झालेले लोक आता पूर्ण गारद झाले. मग साहेबांनी इंग्लिशचा आधार घेतला. ‘Open Defeecation’ मुळे होणारे आरोग्यावरचे परिणाम, गावकऱ्यांचं मागासलेपण यावर ते बोलत होते. मराठीतले शब्द त्यांना सभ्य वाटत नसावेत. 

त्यांचं भाषण संपलं आणि उपसरपंचाच्या पाठीराख्यांनी जोरदार घोषणा दिली, ‘हागणदारी मुक्ती झालीच पाहिजे’ साहेब शहारले. कार्यक्रम संपला. पाणी योजनेवर निर्णय घेण्यासाठी अजून एका महिन्याने सभा बोलवायचा निर्णय घेण्यात आला. पण आता लोकांचा उत्साह मावळायला लागला. सगळ्यांच्या डोक्याला आता भुंगा लागला पैशाचा. यावर चावडीत, पानटपरीवर, बाजारात, पाणवठ्यावर सगळीकडे चर्चा रंगू लागल्या. काहीबी असलं तरी पैसे आपलेच जातात, कधी टेबलाखालून तर कधी असं उघडपणे, यावर लोकांचं एकमत होतं. पंचायतीत चिंता होती, पैसे गोळा नाही झाले म्हणजे लोकसहभाग नाही मग योजनाही नाही. एक महिन्यानी साहेब आल्यावर काय करायचं, पाणीही हवं होतंच की. आता झालेच काही इतर फायदे तर कुणाला नको होते का? मग सरपंच, उपसरपंचानी ठरवलं की जिल्हा परिषदेत जाऊन या योजनेची नीट माहिती काढायची. ग्रामसेवकाला घेऊन ते गेले. योजना अंमलबाजावणीत पंचायतीला नेमके काय अधिकार आहेत, त्यात काय पाचर तर मारलेली नाही ना ह्याची माहिती ते घेऊन आले. कोण अधिकारी मऊ, कोण कडक इथपासून ते बिल कोण पास करणार असं सारं जाणून घेतलं. कामाचं कंत्राट द्यायचा अधिकार ग्रामसभेला आहे हे त्यांनी पक्कं ध्यानात ठेवलं. इतर गावातल्या योजना, त्यांचं बजेट, कंत्राटदार अशी सारी माहिती काढली. इतर गावांत लोकसहभाग कसा मिळाला ते पाहायला दोनचार गावात ते गेले. मग हळूहळू यातली गोम त्यांच्या लक्षात आली. बहुतेक सगळ्या ठिकाणी लोकसहभाग दाखवून ते पैसे कंत्राटदाराकडून घेतले होते, बिलातून वळते करून घेण्याच्या आश्वासनासह.

सारे समाधानाने माघारी आले. ठरलेली ग्रामसभा होण्याआधी एक अनौपचारिक ग्रामसभा बोलावण्यात आली, लोकांना या मार्गाचे फायदे समजावून देण्यासाठी आणि मुख्य म्हणजे त्यांनी तोंड बंद ठेवण्यासाठी. एक महिन्यानी ठरलेली ग्रामसभा पार पडली. आज गावचा उत्साह ओसंडत होता. साहेबांचे ओवाळून स्वागत झाले. ओवाळणाऱ्या बायांमधे ताई हरवून गेली होती. सरपंचानीही आज उत्साहाने थोडे भाषण केले, त्यात गावची भूमी आणि साहेबांचे पाय याचा उल्लेख सारखा सारखा येत होता. उपसरपंचानी तर गावच्या लोकांचं एवढं कौतुक केलं की गावकरी चक्रावून गेले. सकाळी सकाळी हा मारून तर नाही ना आला अशी शंका काहींनी व्यक्त केली. ठरावावरच्या भाषणात काही गावकऱ्यांनी लोकसहभागाची ग्वाही दिली. त्यानंतर लोकसहभागाच्या मान्यतेचा ठराव झाला. साहेब खुश झाले. लोकही खुश. पडद्यामागे असणारा कंत्राटदारही खुश, आत्ता खिशातून रक्कम गेली तरी नंतर ती मिळणार होतीच. फायदा जास्त कसा काढायचा यासाठी जरा डोकं शिणवायला लागणार होतं तेवढंच. खरा लोकसहभाग त्याच्याच कामात तर मिळणार होता. आपल्याविरोधात बोलायला कुणाची माय व्यायलीय ते आता तो नीटच बघणार होता.

(Photo Credits- Ovee Thorat) 

About the Author

प्रीती's picture
प्रीती

समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण, Gender Studies मधे विशेष रस, स्त्री
अभ्यास केंद्र-पुणे विद्यापीठ, नारी समता मंच, यशदा येथे कामाचा अनुभव.
सध्या बाएफ मधे कार्यरत. 'Gender' संदर्भात अभ्यास, संशोधन व लिखाण,
ग्रामीण उपजीविका कार्यक्रम व त्यातील लिंगभाव आणि अन्य सामाजिक
मुद्द्यासाठी काम. कामा निमित्ताने देशभरात वा परदेशी प्रवास. वृत्तपत्रे
व मासिकातून लिखाण

इंटरनेटवरील active blogger. Pre-तरंग आणि my husband's recipes हे दोन ब्लॉग्ज