अमन की आशा

-प्रीती करमरकर

 

'शेतीत रसायनांच्या जादा वापरामुळे पंजाबमध्ये स्वास्थ्य समस्या, पंजाबमधून बिकानेरसाठी खास रेलगाड्या जातात, त्या म्हणजे Cancer train च.' सत्यमेव जयतेचा भाग अमनजोत मन लावून पाहत होती, पंजाबचे बरेच संदर्भ येत होते. रासायनिक शेतीमुळे झालेली आजची स्थिती पाहताना अमनच्या डोळ्यापुढे आपल्या आयुष्याचा पट उभा राहिला. पंजाबच्या छोटया गावातलं ५०-५५ वर्षापूर्वीचं तिचं बालपण. मोठं एकत्र कुटुंब, घरात आठदहा पोरं, थोडी मोठी झाल्यावर सगळीच शेतीच्या कामावर जात. शेतीच्या हंगामात तर तिच्या बेबेची, चाचीची खूपच धावपळ होई. घर, गुराढोरांचं सारं करून शेतातलं काम. संध्याकाळी त्या अगदी दमून जात. मग अमनला मदतीला घेऊन तिची दादी संध्याकाळचं काम उरकून टाकी. घराजवळच्या परसबागेत बेबे भाज्या लावी, वेल असायचे. अमनला ती बगीची खूप आवडे. तिचे तासन् तास तिथे जात. शाळेत जाण्यासाठी तिला तिथून बाहेर काढावं लागे. तिथलं सारं काम अमन करत असे. नवीन रोपं लावणं किंवा पेरा करणं, रोपांची काळजी घेणं, बगीची साफसूफ ठेवणं सारं तिनी शिकून घेतलं होतं. अमनची बगीची टवटवीत दिसे. रसोईसाठी तिथल्या भाज्या तोडून आणताना अमन फुशारुन जाई.
   
१४-१५ व्या वर्षी अमनचं लग्न झालं. थोडया मोठया गावात, मोठया शेतकऱ्याच्या संपन्न घरात. शेतात मजूरच राबायचे. घरच्या बाया फारतर देखरेख करत, पण त्यांचा वेळ खरं तर घरकाम नि गुरं-दूधदुभतं यातच जाई. इथेही अमनने बगीची केली, तिथे थोडा भाजीपाला ती करत असे. तेव्हाच शेतीत जोरात सुधारणा सुरू झाल्या. हळूहळू शेती आधुनिक बनली म्हणजे यंत्रं आली, रासायनिक खतं आली, कीटकनाशकं आली. उत्पादन भरघोस वाढत होतं. शेतातच भाजीपाल्याची लागवड होऊ लागली, विक्रीसाठी. मग घरचा भाजीपालाही तिथूनच येऊ लागला. पोराबाळांचं करण्यात गुंतलेल्या अमनला बगीचीचा विसर पडला. शेतीत पैसा मिळू लागला तसं मोलाने माणसं लावून शेतीकाम करण्याचं प्रमाण वाढलं, शेती किरायाने देण्याचं प्रमाणही वाढलं. बायांचं शेतात जाणं कमी होत होत, कधी बंद झालं ते त्यांनाही कळलं नाही. आपण शेतीपासून कधी तुटलो, आपल्या लक्षात कसं आलं नाही? अमन विचार करत राहिली. 

अमनची मुलं मोठी झाली. थोरल्याने परदेशात जायचं नक्की केलं होतंच, तो गेलाही. त्याने परत यावं असं अमनला वाटे. पण नंतर परिस्थिती फारच बिघडू लागली. कुठे गोळीबार, बॉम्बस्फोट; वातावरण दहशतीने भरून जायला लागलं. थोरल्याच्या बरोबरीची काही मुलंही या कामात गुंतली होती म्हणे, अविश्वासाचा माहौल, कुणावर भरवसा ठेवायचा? अनेकजणांनी गाव सोडलं. अमनच्या कुटुंबाचं दिल्लीतही घर होतं. परिस्थिती निवळल्यावर परत येऊ या विचाराने ते तिथे गेले. थोरला तोपर्यंत दूरदेशी स्थिरावला होता, त्याने तिकडे यायचा धोशा लावला. त्याच दरम्यान अमनच्या पतीचं निधन झालं. मग अमनचा बेटा येऊन तिला आणि आपल्या भावंडाना घेऊन गेला. नवीन देश, हवामान, भाषा सगळ्याशी जुळवून घेताना तिची दमछाक झाली, सुरुवातीला खूप चिडचिड होई. पण आता हेच आपलं घर हे ओळखून अमनने स्वत:ला तिथे रूळवलं. मेस चालविली, बरंच काही केलं. सारी मुलं स्थिरावली. सुना नातवंडात मन रमलं. वैभवाचे, सुखाने बसून खाण्याचे दिवस आले. तरी आपलं घर-देश सोडल्याची जाणीव अमनला कधीकधी कुरतडत राही.    

पंजाबच्या रासायनिक शेतीच्या दुष्परिणामाबाबत अधूनमधून ती काही वाचे, ऐके तेव्हा खंतावत राही, पुन्हा आपल्या कामाला लागे. पण आज सत्यमेव जयते पाहताना ती विलक्षण गुंतून गेली होती, डोळे झरझर वाहायला लागले. कार्यक्रम संपला तरी त्या आवर्तात ती गरगरत राहिली. काय झालं हे सारं? या विपदेची चाहूल कोणालाच लागली नाही? आपण गावी होतो तेव्हा कसं होतं बरं? अमनला तिची बगीची आठवली. तरोताजा असायच्या त्या भाज्या. एकदम तिला जाणीव झाली; आपण कुठे खाद, कीटनाशक वगैरे वापरत होतो? जहरमुक्त अन्न होतं ते. सध्या आपण खातो त्यात काय काय असतं कोण जाणे? काय बरं करता येईल? एक विचार तिच्या मनात लकाकला. भराभर ती त्या प्रशस्त कोठीपुढच्या बागेत गेली. त्या देशीची रंगीत फुलं, मऊशार हिरवळ चमकत होती. कडेचा एक कोपरा जरा रिकामा होता. तिरमिरीत ती तिथे गेली नि कुदळ घेऊन जमीन साफ करायला लागली. तण उपटायला लागली. गार्डनर धावत आला. तिनी त्याला हाकून दिलं. तिच्या अंगात बळ संचारलं होतं. ती आता साठीची दादी नव्हती तर शाळकरी अमन झाली होती. हरवलेला फार मोलाचा ठेवा सापडल्यासारखी ती काम करत राहिली. 'जमीन थोडी तयार करायला लागेल, इथे भाज्या पिकवायच्या, organic certificate असलेलं बियाणं आणायचं, नक्की मिळेल इथे, इतके दिवस आपल्याला कसं सुचलं नाही?' मनातल्या मनात ती उत्साहाने फसफसत होती. मघाचं दु:ख, हताशा दूर जात होती. ती दूर ठेवण्याचा तिच्यापुरता मार्ग तिला दिसला होता. तिचंच संचित होतं ते, हरवून पुन्हा गवसलेलं......

About the Author

प्रीती's picture
प्रीती

समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण, Gender Studies मधे विशेष रस, स्त्री
अभ्यास केंद्र-पुणे विद्यापीठ, नारी समता मंच, यशदा येथे कामाचा अनुभव.
सध्या बाएफ मधे कार्यरत. 'Gender' संदर्भात अभ्यास, संशोधन व लिखाण,
ग्रामीण उपजीविका कार्यक्रम व त्यातील लिंगभाव आणि अन्य सामाजिक
मुद्द्यासाठी काम. कामा निमित्ताने देशभरात वा परदेशी प्रवास. वृत्तपत्रे
व मासिकातून लिखाण

इंटरनेटवरील active blogger. Pre-तरंग आणि my husband's recipes हे दोन ब्लॉग्ज