
भारतीय अभिजात संगीतातील रागांचे घटक हया लेखात मी मागील लेखातील काही राग-मांडणीच्या व्याख्यांचा खुलासा करणार आहे. मागे म्हटल्याप्रमाणे राग मांडताना त्याची सुरुवात आलापीने होते. 'आलाप' म्हणजे संथ (विलंबित) लयीत केलेले स्वरकाम; स्वरांची सृजनतेने केलेली मांडणी ज्यातून रागाचे चलन आणि स्थायी-भाव लक्षात येऊ शकेल. त्यात स्वरांवर थांबून, 'मींड' अंगाने स्वरावर येऊन किंवा एक एक स्वर 'अधिखंडीत' पद्धतीने लावून आलापीत विविधता आणता येते. असा एक समज आहे की आलापी म्हणजे कंटाळवाणे काम; गाणाऱ्यालाही आणि ऐकणाऱ्याला त्याहून! पण रागाचा आत्मा आलापीतच आहे.
रागाचे सविस्तर स्वरूप दाखवायची सुवर्ण संधी म्हणजे आलापी. आलापी वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने करतात. त्यात वाखाणण्यासारखी आलापी म्हणजे किशोरी अमोणकरांची. खालच्या लिंकवर टिचकी मारून तुम्ही त्यांचा राग रागेश्री ऐकू शकता. पहिल्या अर्ध्या तासात त्यांची आलापी ऐकण्यासारखी आहे. राग कसा हळूहळू, एखादा शालू उलगडावा, तसा उलगडत जातो ह्याचा अनुभव घेता येईल. रागाचा एकेक पैलू कसा प्रकट होतो ते ऐकता येईल. राग रागेश्री पुढील लेखांमध्ये आपण काही रागांचे सविस्तर स्वरूप बघणार आहोत पण तोपर्यंत स्वरांचा आस्वाद वाचकांनी घ्यावा आणि सुरवाटी ओळखायचा प्रयत्न करावा हीच इच्छा. आलापीमध्ये कधी आकाराने ('आ' म्हणून) स्वर गायले जातात तर कधी बंदिशीतील शब्द वापरून आलापी केली जाते. कधी कधी बंदिशीच्या ओळीतील शेवटचा शब्द ज्या बाराखडीत संपेल तो आकार/इकार/उकार लांबवून पुढचा आलाप गायला जातो. वरच्या षड्जापर्यंत जाऊन मग तारसप्तकातील स्वर घेवून आलापी पुढे जाते. तारसप्तकातील स्वरांची मांडणी झाली की ख्यालाचा 'अंतरा' गाऊन गायक परत ख्यालाच्या 'स्थायी' कडे वळतो. इथे लय वाढते आणि बोल आलापी सुरु होते. आता लयीच्या अंगाने आणि बंदिशीतील शब्दांचा उपयोग करून बोलआलाप केले जातात. लयकारी ही सहजासाहजी जमणारी गोष्ट नव्हे. ह्यासाठी तालावर हुकूमत लागते. माझ्या गुरु डॉ. अलका देव मारुलकर म्हणतात तसं, “अचूक अंदाजाने समेवर आलं पाहिजे!” हा अचूक अंदाज थोडासा उपजत लागतो आणि रियाजाने तो अजून प्रगल्भ करता येतो.
आजकाल इलेक्ट्रॉ निक तानपुरा आणि तबल्याचे यंत्र किंवा “Itabla Pro” सारखे आय्-फोन applications असल्यामुळे रियाज करणं सोपं झालं आहे पण अर्थात डोळस रियाज करणं तितकंच महत्वाच आहे. बोल आलापांवरून त्याच लयीत ताना चालू होतात. ताना म्हणजे द्रुत लयीत घेतलेले स्वर समूह ज्यावरून पुन्हा एकदा रागाचे स्वरूप कळू शकत. ताना घेतानादेखील 'ख्याल' चालू असल्यामुळे आणि ख्याल हे १२, १४, १६ मात्रांमध्ये बांधलेले असल्यामुळे हया ताना एक आवर्तानाच्याच असतात. जर ख्याल ७ मात्रांमध्ये बांधलेला असेल तर तान २-३ आवर्तनांची असू शकते. पुढील लिंक वर टिचकी मारून तुम्ही उस्ताद रशीद खान ह्यांचा राग बागेश्री ऐकू शकता. पहिली ३७ मिनिटे आलापी आणि आणि नंतर ताना आणि काही बोलताना आहेत. सुरेलपणाने गाणं किती सुश्राव्य वाटतं याचा प्रत्यय या सादरीकरणात येतो. उस्ताद रशीद खान ह्यांचा राग बागेश्री तानांच्या बरसातीनंतर ख्याल संपतो. त्यानंतर मध्यलयीतील एखादी बंदिश किंवा द्रुत बंदिश चालू होते. बहुतेक वेळेला ही बंदिश त्रितालात, अद्धा त्रितालात किंवा एकतालात बांधलेली असते. पण गाण्याच्या या भागाबद्दल बोलण्याअगोदर ह्याच लेखात काही परिभाषा वापरल्या गेल्या आहेत त्यांचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. भारतीय अभिजात संगीतात एखाद्या ख्यालाचे किंव्हा बंदिशीचे दोन भाग असतात. पहिल्या दोन ते तीन ओळींना 'स्थायी' असे म्हणतात. 'स्थायी'त रागाच्या पूर्वांगाची कल्पना येते. नंतरच्या दोन ते तीन ओळींना 'अंतरा' असे म्हणतात. 'अंतरा' रागाच्या उत्तरअंगाचं स्वरूप दाखवतो. पारंपरिक ख्याल आणि बंदिशी प्रेम, विरह, श्रीकृष्ण, राम, देव, भक्ती या विषयांवर रचलेल्या असतात. रागांच्या रसांवरदेखील या ख्याल आणि बंदिशींचे विषय अवलंबून असतात. उदाहरणार्थ राग भैरव हा भक्तीरसप्रधान असून त्यातील बहुतेक ख्याल आणि बंदिशी भगवान शंकरावर आधारलेल्या आहेत. तसंच राग बागेश्री हा शृंगाररसप्रधान असून त्यातील बंदिशी प्रेयसीच्या विरहाबद्दल किंवा तिला तिच्या साजणाला तिच्या पैजणांच्या आवाजामुळे कसं भेटायला जाता येत नाही आहे, याबद्दल आहेत.
पारंपरिक बंदिशींमध्ये सासू आणि नणंदेचा छळवाद, पैंजणांचा (बिछुवा) आवाज, सजणाला होळीच्या दिवशी रंग न लावण्याची विनंती, स्त्रियांचे सौंदर्य, डोळे (नैन), सवत (सौतन), रात्र, नदीवर घागर घेऊन पाणी भरायला जाणं, असे विषय प्रामुख्याने हाताळले गेले आहेत. काही ख्याल आणि बंदिशी ब्रिज भाषेतून, राजस्थानच्या रंजक परंपरेतूनही उगम पावल्या आहेत. या लेखाच्या सुरुवातीला 'मींड' अंगाने आलापी करण्याचा उल्लेख केला आहे. 'मींड' म्हणजे एका स्वराला खेचून दुसरा स्वर लावणे. सतारीच्या तारेला खेचल्याने जसा लावलेल्या स्वराच्या पुढचा स्वर तिथूनच वाजवता येतो तसंच स्वरयंत्रातून एक स्वर लावून, तो खेचून त्याच्या पुढच्या स्वरावर जावून मग तिथे स्थिर होता येते. ह्याला मींड अंग म्हणतात. हे अंग बहुदा वाद्यसंगीतातूनच आलं असाव. तसंच 'अधिखंडीत' स्वर म्हणजे अचानक स्वरांच्या प्रवाहामध्ये व्यत्यय आणून, दोन-तीन स्वरांवर अकल्पितपणे, एकापाठोपाठ एक थांबणे आणि पुन्हा स्वरांचा ओघ सुरु करणे. असे केल्याने आलापीत वैविध्य उत्पन्न होते आणि गाण्याची रंजकता वाढते.
'ख्याल' म्हणजे फारसी भाषेत 'विचार'. म्हणून रागाच्या पूर्वार्धाला 'ख्याल' असे म्हणतात. यात संपूर्ण रागावर केलेला विचार मांडायची गायकाला संधी मिळते. उत्तरार्धात विचारांपेक्षा लय वाढलेली असल्यामुळे, ताना आणि बोलतानांद्वारे गायकाला स्वतःची तयारी दाखवायची ही वेळ असते. बंदिशीच्या शब्दांशी खेळ करत, त्यांना लयीच्या अंगाने खुलवत राग पुढे सरकतो. काही वेळेला बंदिशीच्या पहिल्या ओळीऐवजी दुसऱ्या ओळीला विविध पद्धतीने गात गायक तानांकडे वळतो. काही गायक फक्त 'स्थायी' च्या ताना घेतात. काही अंतर्याची पहिली ओळ गाऊन खालून वरती जाणाऱ्या, अंतर्याला साजेशा ताना घेतात. काही गायक अशा ताना घेत नाहीत कारण त्यांचं म्हणणं आहे की असे केल्याने पुन्हा तेच तेच गायल्यासारखे होते. त्यापेक्षा 'स्थायी' गाऊनच ते सगळ्या ताना घेतात आणि रागाचा द्रुत भाग संपवतात.
पुढील लेखांमध्ये प्रत्येक घराण्याच्या खासियती, तानांचे स्वरूप इत्यादी आपण वाचणार आहोत. कधी कधी द्रुत बंदिशी नंतर 'तराणा' गायला जातो. 'तराणा' म्हणजे फारसी किंव्हा अरेबिक भाषेत 'गाणं. हा गानप्रकार प्रथम अमीर खुस्रो यांनी प्रचलित केला. त्यानंतर उस्ताद आमीर खानसाहेबांनी तो प्रसिद्धीस आणला. तराण्यात 'ओदानी', 'तोम', 'तननन', अशी एकाक्षरे वापरली जातात ज्यांचा उगम सूफी कवितेतून झाला आहे. ही एकाक्षरे लयीच्या अंगाने गायल्यामुळे खूप मनोरंजक वाटतात पण कधीकधी त्याची रचना अशी काही असते की गायकाची बोबडी वळायची भीती वाटते. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही मंजुषा कुलकर्णी पाटील चा राग सोहोनी मधील तराणा ऐकू शकता. त्यावरून तुम्हाला तराणा गायकीची आणि स्वरूपाची कल्पना येईल. राग सोहोनी तर असे आहे भारतीय अभिजात संगीत! वैविध्यपूर्ण, रंजक, अभ्यासपूर्ण रचलेले, मंत्रमुग्ध करणारे, कुठल्याही संगीताप्रमाणे भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमांना न जुमानणारे!