
भारताचे अभिजात संगीत संपन्न आणि आगळेवेगळे आहे. संगीत साधना हा मोक्षप्राप्तीचा एक मार्ग मानला जातो आणि भारतात तरी तिला ईश्वरी मानले जाते. जसे हिंदीत म्हटले आहे, 'एक सुर साधे तो सब सुर साधे!' अनेक पुरातन कथांमध्ये म्हंटले आहे की स्वतः ब्रह्मदेव भगवान शंकराला संगीत शिकवतात आणि त्यानंतर शंकर सरस्वतीला ही विद्या देतो. सरस्वती म्हणजे स्वतः विद्येची देवता. ह्यावरूनही एक गोष्ट लक्षात येते की भारतीय अभिजात संगीताचा उगम ईश्वरी आहे. संगीत हे तन, मन आणि वाचाशुद्धीचे माध्यम आहे.
ओंकार म्ह्णजे नादब्रह्म आणि हा नाद देखील ईश्वराचीच अभिव्यक्ती मानली गेली आहे. प्राचीन काळापासून असं मानतात की नादयुक्त ध्वनी हे बोटांनी, हवेने, चामडयावर, धातूंवर आणि माणसाच्या वाचायन्त्रातून उत्पन् होतात. भारतीय अभिजात संगीतात, एका ठराविक स्वर समूहातून एक 'राग' तयार होतो. प्रत्येक रागात क्रमाक्रमाने वर जाणाऱ्या स्वरांना त्या रागाचा 'आरोह' असे म्हणतात आणि वरून खाली येणाऱ्या स्वरांना 'अवरोह' असे म्हणतात. खालून वर प्रत्येक गाण्याच्या पट्टीत एकूण बारा शुद्ध, कोमल आणि तीव्र स्वर असतात: सा = षड्ज (शुद्ध), रे = रिषभ (शुद्ध), रे् (कोमल), ग = गंधार (शुद्ध) ग् (कोमल), म = मध्यम (शुद्ध) म् (तीव्र), प = पंचम (शुद्ध), ध = धैवत (शुद्ध) ध् (कोमल), आणि नि = निषाद (शुद्ध) नि् (कोमल). अमिनाल सान्याल त्यांच्या संशोधनात असं म्हणतात की प्रत्येक रागाच्या स्वर समूहामुळे तो राग पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे हे ठरवता येतं. उदाहरणार्थ, राग भैरव (आरोह: सा रे् ग म प ध् नि सो, अवरोह: सो नि ध् प म ग रे सा)( सो- वरचा सा)हा पुल्लिंगी आहे तर राग भैरवी (आरोह: सा रे् ग् म प ध् नि् सो, अवरोह: सो नि् ध् प म ग् रे् सा) हा स्त्रीलिंगी आहे. गणिताच्या दृष्टीकोनातून विचार केला तर बारा स्वरांचे वेगवेगळे समूह करता ४८४ प्रकार होऊ शकतात. सर्व रागांची एकूण १० थाटांमध्ये विभागणी केली गेली आहे. ते थाट म्हणजे तोडी, भैरव, खमाज, आसावरी, काफी, कल्याण, पूर्वी, मारवा आणि भैरवी. हा प्रत्येक थाट स्वतःमध्ये एक राग आहे आणि प्रत्येक राग त्या त्या थाटाचा मूलाधार आहे. वरील ४८४ प्रकारांना १० थाटांनी गुणले तर ४८४० प्रकार होऊ शकतात. प्रत्येक राग गाण्याची एक ठराविक वेळ आहे, त्या त्या रागाच्या स्वरांवर आणि भावावर आधारलेली. एका तत्त्वप्रणालीनुसार एका दिवसाच्या दोन विभागण्या केल्या आहेत. दुपारी १२ ते मध्यरात्री बारा अशी एक आणि मध्यरात्री बारा ते दुसऱ्या दिवशीचे दुपारचे १२ अशी दुसरी. पहिल्या विभागणीत गायल्या जाणाऱ्या रागांना 'पूर्व राग' आणि दुसऱ्या विभागणीत गायल्या जाणाऱ्या रागांना 'उत्तर राग' असे म्हटले आहे. प्रत्येक रागातील प्रमुख स्वराला 'वादी' आणि त्याखालोखाल लागणाऱ्या स्वराला 'संवादी' असे म्हंटले आहे. जर एखाद्या रागाचा वादी स्वर मध्यम किंवा पंचम असेल तर तो राग कुठल्याही वेळेला गाता येतो. वरील दोन विभागण्यांची अजून फूट पाडली जाते ती पुढीलप्रमाणे: सकाळी ४ ते ७, ७ ते १०, १० ते दुपारी ४, ४ ते संध्याकाळी ७, ७ ते रात्री १० आणि रात्री १० ते पहाटे ४. ज्या रागांमध्ये रिषभ आणि धैवत स्वर कोमल आहेत ते राग पहाटे ४ ते ७ किंव्हा संध्याकाळी ४ ते ७ ह्या वेळांमध्ये गायले जाऊ शकतात. ज्या रागांमध्ये रिषभ आणि धैवत स्वर शुद्ध आहेत ते सकाळी ७ ते १० किंव्हा संध्याकाळी ७ ते रात्री १० हया वेळांमध्ये गायले जाऊ शकतात. ज्या रागांमध्ये गंधार आणि निषाद स्वर कोमल आहेत ते राग सकाळी १० ते दुपारी ४ किंवा रात्री १० ते पहाटे ४ या वेळांमध्ये गायले जाऊ शकतात. प्रत्येक रागाचा एक स्थायी भाव असतो आणि नवरसांमधील एक रसात तो उत्तुंग असतो. उदाहरणार्थ, राग भूप आणि कल्याण भक्तीरसप्रधान आहेत, राग सोहोनी आणि बागेश्री शृंगाररसप्रधान आहेत, राग भैरवी शांतरसप्रधान आहे. भारतीय अभिजात संगीत हे प्राचीन काळापासून 'गुरुमुखी' विद्या म्हणून मानले गेले आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळात शिष्य गुरुकुलात वर्षानुवर्षे राहून, गुरुसमोर बसून ही विद्या आत्मसात करत असे. केवळ पुस्तकात वाचून, जे गळ्यातून निघते ते ऐकल्याशिवाय प्रत्येक रागाचे बारकावे कळणं आणि ते पुनः गाणं फार अवघड आहे. त्यामुळे गुरुची सेवा करणं आणि ही विद्या आत्मसात करणं हाच गुरुकुलातील दिनक्रम असे.
आजकालच्या घाईगडबडीच्या आयुष्यात हे बहुतेकवेळा शक्य नसल्यामुळे 'स्काईप' वगैरे टेक्नॉलॉजीचा लोक वापर करतात. कुठलाही राग मांडताना ताल सुरु होण्यापूर्वी एखाद-दोन आलाप घेतले जातात. मग 'ख्याल' म्हणजे विलंबित तालात गायली जाणारी 'बंदिश' सुरू होते. त्याच्या अंतर्गत 'आलापी' केली जाते ज्याद्वारे एक एक स्वर करत पूर्ण राग श्रोत्यांसमोर मांडला जातो. नंतर 'लय' वाढते आणि हया लयीत 'बोल आलाप' आणि त्यानंतर 'बोल ताना' गायल्या जातात. कधीकधी रंजकता वाढवण्याकरिता आलापी करत असतानादेखील मधेच एखादी 'छूट तान' किंवा 'बोल तान' घेतली जाते. त्यातूनच मग गायक तानांकडे वळतो. एक व दोन आवर्तनाच्या ताना गायल्यानंतर ख्याल संपतो आणि लगेचच मध्यलयीतील किंवा द्रुत लयीतील बंदिश सुरु होते. ह्यात पुन्हा बोल अंगाने 'लयकारी' आणि 'ताना' घेतल्या जातात. ह्यानंतर राग संपतो किंवा कधीकधी शेवटी 'तराणा' गायला जातो ज्याची लय द्रुत असते. तराण्याचे शब्द हे उर्दू आणि फारसी श्लोकांवर आधारलेले असतात असं म्हणतात. वेगवेगळ्या उस्तादांच्या गायनशैलीनुसार आणि त्यांच्या राहत्या शहरावरून परम्पराबद्ध 'घराणी' अस्तित्वात आली. अभिजात संगीतातील सहा प्राचीन घराणी म्हणजे आग्रा, जयपूर, ग्वाल्हेर, दिल्ली, किराणा आणि पतियाळा. प्रत्येक घराण्याची गानपद्धत, शैली, आलापी, बोल आलाप, बोल तान, तानप्रकार, स्वर लगाव, ठहराव, लयकारी ठरलेली आहे आणि त्यामुळेच प्रत्येक घराण्याचे अस्तित्व आणि वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. पूर्वी असा दंडक असे की कोणीही आपल्या घराण्याबाहेर गायचे नाही अथवा शिकायचेही नाही. आता ह्याबाबतीत बरीच सूट आहे आणि टेक्नॉलॉजीमुळे खूप मिश्रण शक्यही आहे. पुढील लेखांमध्ये आपण रागांच्या घटकांवर, घराण्यांच्या खासियतींवर आणि एकूणच भारतीय अभिजात संगीताचा अजून खोलवर आढावा घेणार आहोत. तोपर्यंत एवढेच!