गर्द सभोवती………..

-प्रीती करमरकर

दिसत तर काही नव्हतंच. हातातली पांढरी काठी तिने चाचपली, काठी आपटत ती पुढे जाऊ लागली. मागून तिचा जोडीदार, तिचा सहचर येत होता. आठ जणांचा तो गट त्यांच्या गाईडच्या सूचनांची वाट पाहत होता. त्यात काही कॉलेजविद्यार्थी होते आणि हे दोघं. त्यांचा गाईड, रोहित बोलायला लागला तसे सगळे लक्षपूर्वक ऐकू लागले. त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या आवाजाच्या मागे चालू लागले. चालताना थोडे चढउतार आले. एक झुलता पूल आला. त्या दोघांनी हात घट्ट धरून काठीने अंदाज घेत पूल पार केला. मधेच गवताळ जमीन लागली तर कुठे थोडीशी खडकाळ. रानातला गारवा जाणवत होता, काही प्राण्यांचे आवाजही येत होते, पुढे कुठेतरी पाण्याचा खळखळाट. दगडी गुंफा असाव्यात असा गारवा जाणवत होता. ही बरीच मोकळी जागाही वाटत होती. मग रोहित म्हणाला, “आपण क्रिकेट खेळू”. बॅट आणि खुळखुळयाचा बॉल त्याने कुठून आणला कोण जाणे, इतका वेळ तर काही आवाज आला नव्हता. मग प्रत्येकाला एक चान्स देण्यात आला, चेंडू मारायचा. काही जणांचा लागला, काहींचा हुकला. तो काही खेळला नाही, तिला म्हणाला, तू खेळ मी ‘बघतो’. ती हसतच गेली, खेळली आणि अपेक्षेप्रमाणे फटका हुकलाच. मग रोहितने त्यांना नेलं, एका जनरल स्टोअरमध्ये. तिथे पुरुषांना त्याने धान्य-डाळी वगैरेच्या शेल्फपाशी नेलं आणि स्त्रियांना अन्य वस्तूंच्या. काही वस्तू/पदार्थ ओळखायचे होते. तिला काही गोष्टी ओळखता आल्या. तो उत्तम स्वयंपाक करत असल्याने त्याला डाळी वगैरे सहज ओळखता आल्या आणि सगळ्यांना त्याचं कौतुक वाटलं. चहा, कॉफी, लवंग, वेलदोडे यासारख्या गोष्टी वासावरून ओळखायच्या होत्या. त्या बहुतेकांनी ओळखल्या.

मग रोहित म्हणाला, “आता आपल्याला बोटिंग करायचंय”. तो सगळ्यांना बोटीकडे घेऊन गेला. काहीजण धडपडत होते, तत्परतेने रोहित त्यांना आधार देऊन पुढे नेत होता. चढताना बोट डुगडुगत होती, गार वारा येत होता. ती आपल्या जोडीदाराशेजारी बसली, त्याचा हात घट्ट धरून. रोहितचा आवाज येत होता. पण आता तिचं लक्ष त्या आवाजाकडे नव्हतं. जोडीदाराचा स्पर्श ती पुरेपूर अनुभवत होती. ती किंचित जवळ सरकली. “रोहित बघत असेल हं”, तो कुजबुजला. तिला लाजल्यासारखं झालं. पण त्याचा स्पर्श अनुभवत ती बसून राहिली. एक शांत-निवांतपण त्या दोघांमध्ये भरून राहिलं. आजूबाजूचे आवाज येत होते पण आता त्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. हाताच्या स्पर्शातून आपण एकमेकांना अधिक जाणून घेतोय, काही सांगू पाहतोय आणि ते पोचतंय, ही सुखद जाणीव दोघातही झरत राहिली. पाण्याचे तुषार त्या जाणिवेला अधिक सुखवत होते. असंच बसून राहावं असा विचार मनात येतोय तोच बोटीतून उतरायची वेळ झाली. पुन्हा काठ्या हातात आल्या. पुढचा थांबा होता, एक कॅफे. त्यांनी एक चॉकलेट बार विकत घेतला. बरोबर पैसे देऊन रोहितने सांगितलेल्या ठिकाणी तो अचूक जाऊन बसला. पण ती मात्र चुकली. वेगळ्याच बाजूला जाऊ लागली. रोहितने मग त्याला सांगितलं, तिला हाक मारायला. त्याची हाक ऐकून किती बरं वाटलं तिला! आवाजाच्या अनुरोधाने जाऊन ती त्याच्या शेजारी बसली. “शोधून काढलंसच ना मला” तो पुटपुटला. उत्तरादाखल तिनी पुन्हा त्याचा हात घट्ट धरला. मग त्यांनी चॉकलेट बार अर्धा अर्धा खाल्ला. फेरफटका झाला, बोटिंग झालं, रिफ्रेशमेंट झाली,

आता रोहितचा निरोप घ्यायची वेळ आली होती. प्रत्येकाला त्याने अचूक मार्गदर्शन केलं होतं, कुणी कुठे धडपडलं नव्हतं. अडचण यायच्या आतच ती जाणून तो तत्परतेने पुढे येत होता आणि सगळ्यांना योग्य मार्गावर आणत होता. त्याने बाहेर जायचा रस्ता समजून सांगितला. सगळ्यांनी एक रांग केली. ती रांगेत पहिली होती. थोडंसं पुढे गेल्यावर अंधुक प्रकाश दिसू लागला. मग ती आत्मविश्वासाने चालत झपाट्याने पुढे गेली आणि अंधारातून बाहेर प्रकाशात आली. कसं छान मोकळं वाटत होतं, सारं काही लख्ख दिसत होतं! एकामागोमाग आठही जण बाहेर आले. सर्वात शेवटी त्यांचा निरोप घ्यायला रोहित बाहेर आला. त्याला बघून हे दोघं नि:शब्द झाले. त्याच्याशी काय बोलावं ते कळेना. समोर आत्मविश्वासाने बोलत असलेला रोहित पूर्णपणे अंध होता. त्यांनी रोहितचा हात अलवार दाबून त्याला मनोमन धन्यवाद दिले. नि:शब्दपणे ते पुढे जात राहिले. त्या अंधारात लख्ख दिसलेल्या गोष्टीबाबत ते विचार करत राहिले. एकतर आपली श्रवणशक्ती उत्तम आहे हे त्यांना कळलंच. त्याहून महत्वाचं म्हणजे एकमेकांवरचा विश्वास त्यांना पुन्हा प्रतीत झाला होता. त्या ‘अंधारातल्या स्पर्श-संवादाने’ तो अधिक उजळ केला होता, कायमसाठी. 

(टीप: Dialogue in the Dark: Moving beyond sight! दृष्टीखेरीज अन्य संवेदनांबाबत जागरूकता आणि अंधांबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीचा हा प्रयोग आहे. यामध्ये अंध व्यक्ती मार्गदर्शन करतात. हैदराबादला गेलात तर हा अनुभव चुकवू नका. अधिक माहितीसाठी पुढील लिंक बघा - http://www.dialogue-in-the-dark.com)

photo credits- dialogue in the dark - website.

About the Author

प्रीती's picture
प्रीती

समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण, Gender Studies मधे विशेष रस, स्त्री
अभ्यास केंद्र-पुणे विद्यापीठ, नारी समता मंच, यशदा येथे कामाचा अनुभव.
सध्या बाएफ मधे कार्यरत. 'Gender' संदर्भात अभ्यास, संशोधन व लिखाण,
ग्रामीण उपजीविका कार्यक्रम व त्यातील लिंगभाव आणि अन्य सामाजिक
मुद्द्यासाठी काम. कामा निमित्ताने देशभरात वा परदेशी प्रवास. वृत्तपत्रे
व मासिकातून लिखाण

इंटरनेटवरील active blogger. Pre-तरंग आणि my husband's recipes हे दोन ब्लॉग्ज