
लेखन मालिकेतील पहिल्या लेखात म्हणल्याप्रमाणे, वेगवेगळ्या उस्तादांच्या गायनशैलीनुसार आणि त्यांच्या राहत्या शहरावरून परम्पराबद्ध “घराणी” अस्तित्वात आली. अभिजात संगीतातील सहा प्राचीन घराणी म्हणजे ग्वालीअर, किराणा, जयपूर, आग्रा, दिल्ली, आणि पतियाळा. प्रत्येक घराण्याची गानपद्धत, शैली, आलापी, बोलआलाप, बोलतान, तानप्रकार, स्वर लगाव, ठहराव, लयकारीची पद्धत ठरलेली आहे आणि त्यामुळेच प्रत्येक घराण्याचे अस्तित्व आणि वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. प्रत्येक घराण्याचे खास असे रागही परीभाषित आहेत.
ग्वालीअर घराणे सर्वात प्राचीन आहे. पंधराव्या शतकात राजा मानसिंग तोमर ह्यांनी ग्वालीअर येथे धृपद गायनशाळा प्रस्थापित केली. त्यानंतर अकबर बादशहाच्या दरबारात मिया तानसेनने हे घराणे प्रसिद्धीस आणले. ग्वालीअर घराण्याचे गायक खुला स्वर लावतात आणि स्पष्ट सुरवटींनी नटलेलं त्याचं गाणं असतं. त्यांच्या गायकीतला साधेपणा आणि सुगमपणा हे दोन गुण वाखाणण्यासारखे आहेत. ग्वालीअर गायकीत अतिशय ठाय लयीत गायन करतात आणि गंभीर भावमुद्रा ठेवून हे गायन केले जाते. सर्वसाधारण माहितीतले राग हे गायक गातात, जसे अल्लैय्याबिलावल, सारंग, मुलतानी, भूप, यमन, हमीर, कामोद, बसंत. त्यांच्या बंदिशीही पारंपारिक असतात. सरळ, सोप्या ताना, “मींड” आणि “गमक” ह्याचा उपयोग ही ह्या घराण्याची प्रमाण-चिन्हे आहेत. हे घराणं नावारूपाला आणलं बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, आणि पंडित ओंकारनाथ ठाकूर ह्यांनी. ह्या घराण्यातील अलीकडच्या सुप्रसिध्द गायिका म्हणजे विणा सहस्त्रबुद्धे आणि मालिनी राजूरकर. पारंपारिक ग्वालीअर गायकीचे पुरुस्कर्ते म्हणजे पंडित गजाननबुवा जोशी. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही त्यांनी गायलेला राग भूप ऐकू शकता. त्यात सुरुवातीला तुम्हाला त्यांनी केलेले स्पष्ट बोल आलाप ऐकता येतील.
किराणा घराण्याला त्याचे नाव अब्दुल करीम खानसाहेब (सवाई गंधर्वांचे गुरु) ह्यांच्या किराणा ह्या जन्मास्थानावरून प्राप्त झाले. ह्या घराण्यावर बीन वादनाचा खूप प्रभाव आहे त्यामुळे स्वरांचे अनुकंपन, “मींड” आणि “गमकेच्या” उपयोगाने स्वरावर टिकून राहणे, ही लक्षणं ह्या गायकीत दिसतात. किराणा घराण्याचे गायक सृजनशील आलापी करतात आणि आपल्या गायकीत भावगर्भ तादात्म्य आणतात. स्वर-साधनेवर त्यांचा खूप भर असतो. कण-स्वरांनी आणि स्वर लांबवून त्यातील भावात्मियता प्रदर्शित केली जाते. “आकारात” आलापी करण्यापेक्षा बोल आलापी करून रागाची बढत केली जाते. शुद्ध-कल्याण, दरबारी, मालकौंस, भीमपलास, तोडी हे राग ह्या घराण्याचे आवडते आहेत. ह्या घराण्यातील ख्यातनाम गायक/गायिका म्हणजे उस्ताद अब्दुल करीम खान, सवाई गंधर्व, हिराबाई बडोदेकर, बेगम अख्तर. अलीकडच्या काळातील गायक म्हणजे गंगुबाई हनगळ आणि प्रभा अत्रे. पंडित भीमसेन जोशी आणि किराणा घराणे हे एक समीकरणच आहे. त्यांचा स्वरच इतका सच्चा आहे की त्याला सृजनतेची जोड मिळाल्यावर “सोने पे सुहागा” म्हणायला हरकत नाही. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही पंडितजींनी गायलेला राग बिहाग ऐकू शकता. त्यात नुसती “ग म ग” अशी स्वर संगती न घेता त्यांनी “प म ग” अशी स्वर संगती घेऊन किती मजा आणली आहे ते ऐका!
जयपूर घराणे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात होवून गेलेले प्रसिद्ध गायक उस्ताद अल्लादिया खानसाहेब ह्यांच्याशी जोडले जाते. जयपूर घराण्याचे गायक अनवट आणि अवघड राग गाण्यात पटाईत असतात आणि त्यांचा दमश्वास उत्तम असतो; त्यामुळे त्यांची आलापी अतिशय रंजक आणि हृद्याचा ठाव घेणारी असते. ही गायकी, तिच्या वक्र पण सुस्वरित बहलाव्यांमुळे क्लिष्ट वाटते. अशी एक समजूत आहे की जयपूर गायकी ही “आम” नसून “खास” आहे. म्हणजे ती साधारण माणसाला भावणारी गायकी नव्हे! केवळ जाणकारच ती पचवू आणि समजू शकतो आणि मुख्य म्हणजे तिचा आनंद लुटू शकतो. रागाची बढत अतिशय शिस्तशीररित्या, छोट्या-छोट्या पटबंधांनी, एकेका अवर्तानातून केली जाते. त्यामुळे संपूर्ण राग एखाद्या सूक्ष्म जरीकाम केलेल्या शेल्यासारखा रसिकांसमोर उभा राहतो. प्रत्येक स्वर विचारपूर्वक, वेगवेगळ्या जोडकामातून मांडला जातो जेणेकरून स्वराचा व्यक्तिवाद एकसंध राहतो पण सृजनतेने रागाची बढत होते. ह्या घराण्याच्या ताना देखील अवघड, वक्र, सर्पिल रूपाच्या असतात. बहुतेक वेळेला “ख्याल” मांडताना गायक “स्थाई” आणि “अंतरा” एकामागोमाग एक असा मांडून मगच रागाच्या बढतीला सुरुवात केली जाते. खूपदा विलंबित तीनतालात “ख्याल” बांधलेला असतो. भाव हा ह्या घराण्याचा अविभाज्य घटक असल्यामुळे ठुमरी गायनही ह्या घराण्यात परिपूर्ण आहे. संपूर्ण-मालकौंस, बसंती-केदार, बसंत-बहार, कौशी-कानडा आणि नट-कामोद सारखे अनवट आणि जोड-राग ह्या घराण्याचे वैशिष्ठ्य आहे. जयपूर घराणे श्रीमती किशोरी आमोणकर, श्रीमती अश्विनी भिडे-देशपांडे आणि त्याही आधी उस्ताद अल्लादिया खानसाहेब, श्रीमती मोगुबाई कुर्डीकर आणि श्रीमती केसरबाई केरकर ह्यांनी प्रसिद्धीस आणले आहे. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही किशोरी आमोणकरांनी गायलेला राग बसंती-केदार ऐकू शकता.
आग्रा घराणं फैयाझ खान साहेबांशी जोडलं जातं. आग्रा घराण्याचा उगम देखील धृपद गायकीतच आहे. “धमार” आणि “ख्याल” गायकी नंतर ह्या घराण्याचा एक घटक बनली. ह्या घराण्याचे गायक आवाजाच्या बुलान्दिकडे आणि प्रबळतेकडे लक्ष देतात. त्यामुळे त्यांचे स्वर जोशपूर्ण आणि संस्पन्दक लागतात. रागाचे स्वरूप प्रत्येक स्वरातून न दाखवता, त्याची एकूण संरचना वैशिष्टपूर्ण स्वरसमूहांमधून मांडली जाते. “बंदिशी” ला आणि तिच्या शुद्धतेला खूप महत्व दिले जाते. “बंदिश” ही ह्या घराण्याच्या गायकीचा केंद्र बिंदू मानली जाते. “मींडेचा”, गायकीचा प्रभाव वाढवण्याकरिता उपयोग केला जातो. धृपद गायनासारखेच आग्रा घराण्यात “मींड” आणि “गमाकेचा” जास्त उपयोग केला जातो. ह्या घराण्याचा कल शुद्धतेकडे असल्यामुळे “मुरकी” सारख्या अलंकारिक घटकाला इथे स्थान नाही. “लयकारी” ही ह्या घराण्याची खासियत आहे. रागाच्या बढतीत सर्व ठिकाणी लयीला खूप महत्व आहे. मेघ आणि दरबारीकानडा सारखे राग ह्या घराण्याचे गायक जास्त गातात. आग्रा घराण्याचे नावाजलेले गायक म्हणजे सी. आर. व्यास, पंडित श्रीकृष्ण नारायण रतंजनकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि संगीत रिसर्च अकादमीचे विजय किचलू. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही पंडित रतंजनकर ह्यांनी गायलेला राग अडाणा ऐकू शकता. त्याच्या सुरुवातीलाच मींडेचा उपयोग तुम्ही ऐकू शकाल.
दिल्ली घराणं उस्ताद मम्मन खान ह्यांनी प्रस्थापित केलं. पुढे ते तानरस खान आणि शब्बू खान ह्यांनी चालवलं. दिल्ली घराण्याची खासियत म्हणजे त्यांच्या क्लिष्ट ताना, कानांना सुमधुर वाटणारा विस्तार, आणि अप्रतिम “ख्याल” आणि “बंदीश” रचना. ह्या घराण्याचे नावाजलेले गायक म्हणजे चांद खान, नसीर अहमद खान, उस्मान खान, इक़्बाल अहमद खान आणि विदुषी कृष्णा बिश्त. पुढील लिंक वर टिचकी मारून तुम्ही विदुषी बिश्त ह्यांनी गायलेला राग कलावती ऐकू शकता. बंदिशीचे शब्द पहा किती सुंदर आहेत ते!
पटीयाला घराणं हे दिल्ली घराण्याचीच एक उपशाखा आहे अस मानतात. “आलू-फट्टू” (अली बक्ष आणि फते अली खान) ह्यांनी हे घराणे नावारूपास आणले. उस्ताद बडे गुलाम अली खानसाहेबांनी हे घराणं जास्त प्रसिद्ध केलं. त्यांच्या तीन सप्तकात फिरणाऱ्या आवाजाचा ह्या घराण्याच्या शैलीवर खूप प्रभाव आहे. जबरदस्त सुसाट ताना आणि खालून वर जावून परत विजेच्या वेगाने खाली येणारी “सपाट तान” हे ह्या घराण्याचे वैशिष्ठ्य आहे. तसच कमी लयीत “गमाकेच्या” अंगाने ताना घेतल्या जातात. पुन्हा एकदा ह्याही घराण्यात बोल-तानांच्या आधारे लयकारीला महत्व आहे. भावसंपन्न गायन हा ही ह्या घराण्याचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे ठुमरी गायनाला ह्या घराण्यात महत्व आहे. खूपदा ह्या घराण्याच्या गायकीत अधिष्ठान आणि सौदर्यानुभव कमी आहे अशी टीका होते. मालकौंस, भूप, गुणकली, मेघ-मल्हार सारखे राग ह्या घराण्याशी जोडले जातात. बडे गुलाम अली खानसाहेब, अजोय चक्रवर्ती, परवीन सुल्ताना हे ह्या घराण्याचे प्रसिद्ध गायक. पुढील लिंकवर टिचकी मारून तुम्ही बडे गुलाम अली खान साहेबांचा राग बागेश्रीतील तराणा ऐकू शकता. कसबदार तानांचा प्रत्यय ह्या गाण्यातून येतो.
पुढील काळात अनेक अजून घराणी तयार झाली जशी मेवाती, रामदासी-सहस्वान, भेंडी-बझार. आजकालच्या काळात घराण्यांची बंधने एवढी राहिलेली नाहीत. प्रत्येकजण सगळ्या गुरुजनांचे जे जे चांगले आहे ते उचलतो आणि आपली गायकी प्रस्थापित करतो. शेवटी कानांना सुश्राव्य वाटेल आणि हृदयाला भिडेल ते उच्च गायन मग घराणं कुठलं का असेना!