Site Feed

सेनापती बापट यांना अभिवादन

आज सेनापती बापट यांची १३७ वी जयंती. त्यांचा सगळाच जीवनपट म्हणजे अक्षरशः थरारक आहे. 
स्वातंत्र्यवीर सावरकर ते लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी असा त्यांचा वैचारिक प्रवास झाला. बॉम्ब बनवण्याच्या माहितीपुस्तिका भारतात सगळ्यात पहिल्यांदा आणण्याचं श्रेय त्यांच्याकडे जसं जातं, तसंच देशातला किंवा बहुधा जगातला, पहिला विस्थापितांचा अहिंसक लढा उभारण्याचं श्रेयही त्यांच्याच नावावर आहे. मुळशी धरणाखाली ज्यांची जमीन गेली त्यांच्यासाठी १९२१ मध्ये सत्याग्रह त्यांनी उभारला आणि तेव्हापासून पांडुरंग महादेव बापट हे 'सेनापती बापट' झाले.

 

 त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी.ए.पर्यतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. अहमदनगरला मॅटिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. त्यांना बी.ए. परीक्षेत इ.स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुबंई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून त इंग्लंडला गेले एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

इ.स. १९२१ ते इ.स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकर्‍यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले या आंदोलनादरम्यान बापटांना सेनापती म्हणून ओळखले जाऊ लागले. या आंदोलनात त्यांना तीनदा कारागृहावासाची शिक्षा झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. संस्थानांतल्या प्रजांच्या हक्कांकरिता चालू असलेल्या आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी संस्थानच्या प्रवेशबंद्या मोडल्या त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

नोव्हेंबर १९१४मध्ये सेनापती बापटांना मुलगा झाला. त्याच्या बारशाच्या निमित्ताने बापटांनी पहिले भोजन हरिजनांना दिले. एप्रिल १९१५मधे ते पुण्यात वासूकाका जोशी यांच्या चित्रमयजगत या मासिकात नोकरी करू लागले. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात, दैनिक मराठातही नोकरी केली आहे. मराठा सोडल्यानंतर ते लोक-संग्रह नावाच्या दैनिकात राजकारणावर लिखाण करू लागले. त्याच बरोबर डॉ॰ श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाचे कामही ते बघत. बापटांच्या पत्‍नीचे ४ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. त्यानंतर सेनापती बापट मुंबईतीत झाडूवाल्यांचे नेतृत्व करू लागले. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या संदेश नावाच्या वृत्तपत्रात एक मोठे निवेदन दिले. झाडू-कामगार मित्रमंडळ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. सप्टेंबर १९२९मध्ये, झाडूवाल्यांशी मानवतेने वागण्याचा पुकारा करीत बापटांनी गळ्यात पेटी लटकावून भजन करीत शहरातून मुंबईच्या चौपाटीपर्यंत मोर्चा काढला. शेवटी त्यांनी पुकारलेल्या संपाची यशस्वी सांगता झाला.

अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना इन्द्रभूषण सेन यांनी आत्महत्या केली होती, उल्लासकर दत्त भयंकर यातना सहन करीत वेडे झाले होते. हे पाहून, सेनापती बापटांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची जन्मठ्प भोगणार्‍या कैद्यांच्या सुटकेसाठी डॉ॰ नारायण दामोदर सावरकर यांच्यासह एक सह्यांची मोहीम चालविली. त्यासाठी ते घरोघर फिरत, लेख लिहीत, सभा घेत. या प्रचारासाठी बापटांनी ’राजबंदी मुक्ती मंडळ स्थापन केले.होते

एनसीईराट ने केलेला सेनापती बापटांच्या जीवनावरील एक माहितीपट येथे यूट्यूबवर पाहता येईल.

 

 

 

 

About the Author

admin

फेसबुक आणि Unfriend करणे

फार ओळख नाही, प्रत्यक्ष काही संबंध नाही, त्या वक्तीपासून काही व्यावसायिक फायदा नाही अशा एखाद्या मित्र/ मैत्रिणीने सोशलमेडियावर/ फेसबुकवर अनफ्रेंड केले तर आपल्याला त्याबद्दल काय वाटते?
अनेकांना त्याचा काहीच त्रास होत नाही. आपल्या फ्रेंडलिस्टमधून काही माणसे कमी होणे/ काही जमा होणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यात धक्कादायक काही असू नये.

सात आठ वर्षे सोशल मिडिया आणि सोशल फोरम्सवर असणा-या अनुभवी व्यक्तीकरता तरी ही सवयीची बाब आहे. पण ज्या व्यक्तीला आपण महत्त्वाचे मानतो( कारण काही असू दे), महत्त्व देतो, त्या व्यक्तीचे आपल्या लिस्टमधे असणे आपल्याकरता मोठी बाब असते अशा व्यक्तीने अनफ्रेंड केले तर मानसिक त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या व्यक्तीला आपण काही त्रास दिला नाही असे असतांना आपण अनफ्रेंड केले गेले असेल तर त्याचा मनस्ताप होतो. शिवाय जास्त संवेदनशील असलेल्या व्यक्तीला अनफ्रेंड करण्याचा त्रास अधिक होऊ शकतो.

ब्लॉक करणे हा अनेकदा घाईघाईने वा रागाच्या भरात घेतलेला निर्णय असतो. ब्लॉक करणारी मंडळी एखाद्या सोशल सर्कलमध्ये त्याबद्दल प्रसिद्ध असतात. ही बाब आपल्याला माहिती असते. त्याउलट अनफ्रेंड करतांना ते विचारपूर्वक केले असण्याची शक्यता जास्त असू शकते. कदाचित म्हणून ब्लॉक करण्यापेक्षा अनफ्रेंड करणे जास्त जिव्हारी लागते असे आढळले आहे.

माणसे आहारविहारात बदल करतात, त्यांच्या आवडीनिवडी बदलतात. व्यवसाय नोकरी बदलतात. तसेच फ्रेंडलिस्टही बदलू शकतात. त्या बदलात कधी आपला पत्ता कटू शकतो. हे मनात ठेवायला हवे. शिवाय तो पत्ता कोण काटणार आहे ते आपल्याला साधारण माहिती असते ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे. आपली एखादी कृती / अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असू शकतात. आपले चुकले असे आपल्याला वाटत नसेल तर दुस-याला तसे वाटू शकते. ते वाटणे आपल्या हातात नसते. हीच खरी गोची आहे! समान आवडीनिवडीची लोक एकत्र येतात, आपल्या आवडीनिवडीबद्दल इतरांचा अंदाज चुकला की लोक दुरावतात हे इतकं सोप समीकरण आहे.

विरुद्ध मत असणारी माणसे आपल्या मित्रयादीत ठेवणारी माणसे तशीही कमी असतात. टोकाचे ध्रूवीकरण करण्याच्या जमान्यात मधला मार्ग घेणे हीच एक चूक झाली आहे. फ्रेंड्लिस्ट जेवढी मोठी तेवढा गुंता जास्त. धर्म, राजकारण, स्त्रीवाद या विषयांवर व्यक्त होतांना आपल्या मित्रयादीचे विभाजन गटात होते ते तटस्थपणे बघणेही कधी अशक्य होते अशी परिस्थिती आहे. कोणताही वाद, मतप्रवाह यावर व्यक्त होतांना एक बाजू घेतली तरी पंचाईत, काठावर बसून राहिलो तरी गोची! आपण दर वेळी प्रत्येकाला खूश करू शकत नाही हे ओघाने आलेच. त्यामुळे ब्लॉक वा अन्फ्रेंड करणे हे ओघाने येत जाते.

त्याशिवाय काही पर्याय आहेत का?अनफ्रेंड वा ब्लॉक करण्याआधी इतर काही वर्गवारी करता येते का याचा जरूर विचार करावा. ते शक्य नसेल तर हे दोन पर्याय आहेतच.व्यक्ती जवळची असेल तर आता एकत्र वावर शक्य नाही हे साध्या सोप्या शब्दात सांगून/ मेसेज पाठऊन मग अनफ्रेंड वा ब्लॉक करावे. हे सांगणे वा त्याचे स्पष्टीकरण देणे यापैकी दोन्ही/ एक गोष्ट आवश्यक आहे असे नाही. पण ते केले तर आपल्या कृतीची जबाबदारी आपण घेतो आहोत हे स्वच्छपणे समोर असते. ते मला अधिक योग्य वाटते. काही न बोलता काही न कळवता अनफ्रेंड / ब्लॉक करता येतेच. हे दोन्ही करता येत असतांना अनेक माणसे नकोश्या माणसांना/ माणसांच्या यादीत असतात ही वस्तुस्थिती आहे!

यासर्वांकडे आणखी एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघते आहे. इथे माणसे शक्तीप्रदर्शन करायला येत असतात. इतरांना जोखायला येत असतात. त्यामुळे मित्र नको आहेत, अनुयायी हवे आहेत हे लक्षात घ्या. त्याकरता मित्रगट हा फसवा शब्द आहे. फेसबुकाने मित्रांचे वर्गीकरण करण्याचे पर्याय दिले आहेत. एखाद्याला आपल्या पोस्ट दिसत नाहीत, ती व्यक्ती आपल्याला प्रतिसाद देत नाही यामागे अनेक कारणे असतात. फेसबुकचे बदलते अलोरिदम हे एक कारण आहे. पोस्ट पाहण्याची वर्गवारी, मित्रयादीची वर्गवारी ही सुद्धा त्यामागे कारणे आहेत. (मी रात्रभर फेसबुक बघत नाही. दूरदेशीचा मित्रयादीत भरणा आहे. अनेक गोष्टींवर माझे प्रतिसाद वरातीमागून घोडे असे असतात हे मी बघते आहे. अनेक उत्सवप्रिय , आनंदी पोस्टस सुद्धा मी १२ तासांनी पाहिल्या आहेत. अनेक संदर्भ मला माहिती नसतात. अशावेळी प्रतिसाद द्यायचा का? त्याचा अर्थ काय निघेल अशा विचारात मी अडकते. असे अनेकांचे होऊ शकते. त्यामुळे गैरसमज होतात.त्यापलिकडे जाऊन किती लोक तुमच्या तुमच्या वावराकडे
पाहू शकतात? )अशी माणसे यादीत नसतील तर ब्लॉक / अनफ्रेंड पासून सुटका नाहीच.

फेसबुकाने स्पर्धक, विरोधक अशी प्रकारची वर्गवारी दयायला हवी. ती दिली नसली तरी ती आपण करू शकतो. मित्रयादी एकदा अशा चश्म्याने तपासा. एखाद्याने अनफ्रेंड करण्याचे दु:ख वा त्रास काही क्षणात कमी होईल. प्रत्यक्ष जगात स्पर्धक टाळता येत नाहीत, व्यवसायात स्पर्धा टाळता येत नाही. त्याकडे अधिक प्रगल्भतेने पहावे लागते. तेच इथे अनफ्रेंड करणे/ होणे याला लागू आहे.

टीनएजर्स पासून जेष्ठ नागरिक असा आपल्या मित्रयादीचा आवाका असतो. त्यात प्रत्येकाची आवडनिवड बदलणार हे गॄहित धरू या
अनफ्रेंड करण्यात अनफ्रेंड+घटस्फोट/ प्रेमभंग असे पॅकेज नसेल तर या अनफेंडला फार महत्त्व देऊ नये. आणि तेच पॅकेज असेल तर घरातल्या गोष्टी घरात राहिलेल्या उत्तम.

आज सोशलमिडियावर वावरणारे टीनएजर्स एकूणात याबाबत घरातील वडिलधा-यांपेक्षा जास्त खमके आहेत. आपण हे बघतो पण ते मान्य करत नाही. अगदी जवळच्या/ महत्त्वाच्या मानलेल्या व्यक्तींकडून अनफ्रेंड होण्याचा अनुभव मी घेतला आहे/ घेते. हा अनुभव आज सोशलमिडियावरील वावराचा एक अविभाज्य घटक झाला आहे. आपला स्वत:चा अजेंडा राबवतांना अशी थोडीफार दुखापत होणारच. आपले रॅगिंग झाले म्हणून पुढच्या बॅचचे रॅगिंग केलेच पाहिजे का?
सिनिकल होणे टाळता आले तर उत्तमच. तुच्छतावादाला मला काहीच पर्याय देता येत नाही. थोडी तटस्थता , विसंवाद मान्य करता यावा. डिजिटल मिडिया/सोशल मिडियात वावरतांना आज मानसिक आरोग्य चांगले राहण्याकरता ब्लॉक / अनफ्रेंड याशिवाय अनेक गोष्टींना खंबीरपणे तोंड देता येणे आवश्यक झाले आहे.

इथे राहून सगळं सहन करायचं असही मला म्हणायचं नाही.मित्रयादीतील कोणीही प्रमाणाबाहेर टिंगळटवाळी करणे, खाजगी आयुष्य़ाचे संदर्भ देऊन नावासकट सोशल मिडियावर मानहानी करणे, जीवे मारण्याच्या वा इतर कोणत्याही धमक्या या / इत्यादी गोष्टी थेट कायदा/ पोलीस यांच्याकडे घेऊन जाण्याच्या आहेत. आभासी विश्वात वा डिजिटल मिडियात आपण एखाद्याबद्दल किती गरळ ओकतो आहोत, किती गलिच्छ भाषा वापरतो आहोतो याचा धरबंध राहिला आहे असे दिसत नाही.एखाद्याचे खाजगी आयुष्य़ चघळणे कुणाचा टाईमपास असतो, ठरवलेला एक अजेंडा असतो हे दुर्दैव आहे. जगभरात कुठेही त्या घडत असतील तरी त्याला अपवाद नसावेत. त्याकरता ब्लॉक वा अनफ्रेंड पर्याय पुरेसे नाहीत. हे दोन्ही पर्याय वापरले तरी या गोष्टी सुरू राहू शकतात हे ध्यानात असू द्या. त्यानुसार त्याला तोंड द्यायला वेळीच कायद्याची मदत घ्या.
(ब्लॉक आणि अन्फ्रेंड फार किरकोळ वाटू लागतील अशी माझी खात्री आहे.)
#Block #Unfriend #SocialMediaHarassment

About the Author

सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह

कभी अलविदा ना कहेना

कभी अलविदा ना कहेना 

घरी आलेले पाहुणे जायला लागले की रडणारे, हट्ट करून लक्ष वेधणारे मूल तुम्ही पाहिले आहे का? माझी गणना त्या मुलांमध्ये होते. मोठे झाले तरी एकंदर कुणी दूर जाणार या भावनेनं मला कसंस होत. एकंदरीत निरोप घेणे वा देणे या दोन्ही गोष्टी माझ्याकरता तितकया सोप्या नसतात. प्रवासाच्या निमित्त्याने भेटणारी माणसे, मित्रमंडळी, नातेवाईक अशा कोणत्याही निरोपाच्या वेळी मला कमी अधिक अस्वस्थता जाणवली आहे. आज मात्र एकंदर या भेटीगाठींनी समृध्द केले आहे याबाबत दुमत नाही. टोकाची संवेदनशीलता आता बोचत नाही.

अमेरिकेतून येत असतांना जेव्हा मुंबई एअरपोर्टवर विमान उतरते तेव्हा डोळे भरून येतात. भारतातून परततांना नेहमी एक विचित्र उदासवाणं वाटत. या दोन्ही गोष्टींची तीव्रता जरी कमी झाली असली तरी मी या दोन्ही गोष्टी टाळू शकलेले नाही. भारतातला मुक्काम कसा होता यावर बरंच काही अवलंबून असतं. फक्त नातेवाईकांना भेटण्यासाठी केलेल्या वा-या अर्थातच जास्त हळवे करतात या शंका नाही. नातेवाईकांना आणि मला दोघांनाही होणारा हा भावनिक त्रास कमी व्हावा म्ह्णून एअरपोर्टवर म्ह्णून आताशा मी एकटीच एअरपोर्टवरून जाणे येणे करते. त्यामुळे काही तास आधीपासूनच मनाची दूरच्या प्रवासाची तयारी झालेली असते. गेल्या दोन तीन ट्रीप्स मात्र वेगळ्या होत्या. अगदी निघेपर्यंत मित्रमैत्रिणींच्या गाठीभेठी सुरु होत्या. त्यामुळे ऐनवेळेवर बॅग भरणे असा नवा अनुभव घेता आला. त्याचा उलट परिणाम मात्र असा झाला की एअरपोर्टवर एकदमच एकटे वाटायला लागले.

 माझ्या भोवती असलेली माणसे भारतीय असतात त्यामुळे नकळत एक सहजता वागण्यात येते हे मी अनेकदा पाहिले आहे. मुंबईत आणि पुण्याला टॅक्सी किंवा रिक्षाने शहरात भटकंती करणे मला स्वत: ड्राईव्ह करण्यापेक्षा सोयीचे वाटते. माझ्या बोलण्यामुळे वा उच्चारामुळे मी भारताबाहेर असते हे समजत नाही.पण बदलत गेलेल्या वस्तीच्या, जागेच्या खुणा परिसर अनोळखी असल्याचे माझ्या चेह-यावरून सहज दाखवत असाव्यात. अशावेळी गप्प राहण्यापेक्षा ड्रायव्हरशी बोलणे मी पसंत करते. 
एक स्त्री आपल्याशी बोलते याचा आश्चर्यापेक्षा इतर कोणताही अर्थ सुदैवाने अजून कुणी घेतला नाही. अमेरिकेत मात्र असे बोलणे व्हायला वेळ लागतो.  अमेरिकेत असतांना कितीही उत्सुकता आणि आगाऊपणा अंगात असला तरी त्याला मुरड घालून मी चारचौघात वावरते. या भारतभेटीमधले तीन चार किस्से सांगण्यासारखे आहेत. पुण्यात एका ड्रायव्हर ला दोन तीनदा सारखा फोन आला. त्याने तो बंद केला. शेवटी मी
म्हणाले घे अर्जंट असेल काही. आवाज स्त्रीचा असावा. त्याने तिला काय करायचे ते सांगितले.
  आई की .. मी प्रश्न केला.
बायकोच आहे, लग्न झालं आहे माझं.
"एवढ्यात झालेलं दिसत आहे?" मी विचारलं
नाही.वर्ष झालं.
तुझ्या आणि तिच्या बोलण्यावरून असं वाटलं नाही मला,.
तो हसला. पळवून आणलं तिला. मग लग्न केल,.
मी चटकन दोघांची वयं विचारली.
 " जातीबाहेर लग्न केल का?" माझा पुढचा प्रश्न 
"नाही. माझा धंदा पसंत नाही तिच्या घरच्यांना "
"काय चुकलं त्यांचं? रात्री बेरात्री येणार जाणार तू, किती कमवतोस, किती खर्च करतोस, शिवाय नशापाणी .तिच्या घरच्यांना काळजी वाटेल ना?" मी उगाच मुलीकडच्यांची बाजू घेत म्हणाले.
"तिला माहिती आहे की . नशापाणी काही नाही. प्रेम करतो तिच्यावर. "
माझी बोलती बंद. भारतीय समाजात विशेषत: शहरातच एका वर्गात एकीकडे विचारपूर्वक लग्न न करणारे, लग्नाशिवाय एकत्र राहणारे, वेगळे होणारे अशी उदाहरणे वाढीस लागली आहेत असे वाटते तर दुसरीकडे हे असे एकमेकांसाठी जीव देईन वगैरेची भाषा करणारे..अजूनही आहेत. 
--

मुंबईत असतांनाची गोष्ट. आधी एकही टॅक्सीवाला तयार होईना. मग शेवटी एकजण यायला तयार झाला.  संध्याकाळची वेळ असल्याने ट्रॅफिकमध्ये सापडले. दादरहून गोरेगावला जाईपर्यंत दीड तास की दोन तास किती लागतील ते फक्त बघत बसायचे. ड्रायव्हर मुसलमान असावा. वयाने साठीच्या आसपासचा. कधीपासून टेक्सी चालवता? मी प्रश्न केला. अर्थात हिंदीत.
"१९७६."
 ड्रायव्हर म्हणून याचे वय आणि माझे वय एकच.
 बोलता बोलता तो म्हणाला तुमचा विश्वास बसणार नाही. पण मला खूप प्रसिद्ध माणसे भेटली आहेत. इंदिरा गांधी, धिरूभाई अंबानी आणि अमिताभ बच्चन यांच्याशी त्याची भेट कशी झाली याच्य़ा कहाण्या त्याने सांगितल्या. त्याने मोजून सहा वेळा विमानाचा प्रवास कसा केला , तेव्हा त्याला काय वाटले होते ते सुद्धा सांगितले. मी त्याला एकदाही उलटा प्रश्न केला नाही तेव्हा तोच म्हणाला ,’मी खोटे बोलतो असे वाटत का? काय मिळवेन मी असं सांगून? "
तरीही मी गप्पच होते त्यावर तो म्हणाला,’ कोण केव्हा कुणाला भेटेल ते सांगता येत नाही. एखाद्याची भेट झाली म्हणून काय फरक पडतो ?मोठी माणसे तर विसरून जातात माझ्यासारख्या सामान्य माणसाला भेटलो ते. आपल्याला असं होईल हे माहितीच असत, म्हणून  आपणही  फार मनावर घ्यायच नाही की झालं. मी हसले. किती सहजतेने मह्त्त्वाची गोष्ट सांगून गेला होता तो.
गोष्ट सांगण्याचं त्याच कसब वाखाणण्यासारखं होत. विमान कसं उडत, विमान आकाशात जात तेव्हा नेमकं काय वाटत हे त्यानं त्याच्या अनुभवविश्वाशी जोडून घेत सांगितलं. एवढ्या वेळा विमान प्रवास केल्या अशा सगळ्या थापा असतील तरी विश्वास बसावा अशी मांडणी. भाषा, लहेजा आणि त्यामधील काळाचा हिशोब अगदी पक्का. कोणत्याही कथेत एखाद्या पात्राची ओळख, त्याची भाषा आणि एकंदर मांडणी कशी असावी याचे जिवंत उदाहरण. काय कटकट असे म्हणून टॅक्सीत बसले असतांना, अगदी अचानक हे सर्व त्याच्यामुळे उलगडलं गेल. तुम्ही गुजराथी आहात की पंजाबी अशा त्याच्या शंकेच निरसन मात्र मी केलं. मी महाराष्ट्रीयन आहे यावर त्याचा विश्वास बसायला जरा वेळ लागला. 
----

मी ऑकलोहोमा या राज्यातल्या नॉर्मन गावी राहते. माझ्याबरोबर एक जोडप  आहे. माझ्याच गावातल ओळखीच. खरं हे गाव सोडून मी फार कुठे गेले नाही. ती सांगत होती., चर्चच्या कामाकरता जगभर आताशा प्रवास सुरु केला आहे. 
एखादी व्यक्ती एकाच गावात जवळ जवळ सहा दशकांहून अधिक काळ राहते हे आमच्यासारख्या संगणक क्षेत्रात जगभर जाऊन नोकरी करणा-यांना जवळजवळ अशक्य वाटतं.
 त्या गावातल्या तीन पिढ्या पाहिल्या आहेस तू? काय बदल झाले आहेत असं तुला वाटत? 
"स्पर्धा वाढली.  लोकांकडे मोबाईल आहे, इंटरनेट आले. आता लोक त्यांच्या फोनवर असतात. प्रत्यक्ष माणसे भेट्णे कमी होते आहे. मला कागदावर लिहायला वाचायला आवडते. माझ्या बहिणीच्या नातवंडांचे असे नाही. ती आजची पिढी आहे. आमच्या गावात कृष्णा नावाची भारतीय बाई आहे. तिच्या मुलीबरोबर राह्ते. गेली वीस वर्षे. ती भारतीय जेवण करते. तू पण करतेस का?
कुठल्याही प्रवासात सहप्रवासी कसा आहे यामुळे अनेक कडूगोड अनुभव येतात. परतीच्या प्रवासात माझ्याशेजारची एक सीट मोकळी आणि त्याशेजारच्या सीटवर एक गोरी अमेरिकन स्त्री होती. तिचे वय ७० तरी नक्की असावे. चेह-यावरूनच अनेकदा काही अंदाज बांधता येतात आणि ते थोड्याबहुत प्रमाणात बरोबरही असतात.काही स्त्रिया बिलकूलच दाद देणार नाही अशा वाटतात आणि त्या असतातही तशाच. ही मात्र थोडेफार संभाषण करेल असं वाटलं होतं.
आणि झालंही तसंच.
मी मध्येमध्ये डोळे मिटून चक्क झोपत होते. उठले की आमच्या गप्पा सुरु होत्या. एकदा तर तिने चक्क हलवून मला जागे केले आणि मी काही खावे अशी सूचनाही केली.
झोपमोड झाल्याने मी गोंधळले होते. तशी ती म्ह्णला मी तुझ्या अंगाला हात लावणार नाही. फक्त उठवायचे होते तुला. मी हसले. इतक औपचारिक वागू नकोस असे तिला म्हणाले. त्यावर तिने तुला भेटून मला आनंद झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मग काय तुला राग येणार नाही ना अस म्हणत मी तिला अनेक प्रश्न विचारले. 
"एकटं वाटत नाही का?"
"नाही. लग्न केले नाही पण मला मित्र मंडळी आहेत खूप. माझ्या वडिलांना जरा राग आला होता तेव्हा पण तेवढंच. दोनदा डेटींग केले आणि मग तर खात्रीच झाली की लग्नाचा विषय नकोच."
ती म्हणाली लग्न केल की नव-यात अडकायंच, मुले आणि नातवंडातही..
रिटायरमेंट नाही असच ना? मी तिचे वाक्य पुर्ण केले होते.
त्यावर ती खळखळून हसली. 

---
सहप्रवासी बदलणार असतात. तशीच काही वेळा जिवाभावाची मित्रमंडळी, नातेवाईकही दूर जातात. कधी कधी कायमचेच. निरोप घेणे ही सोपे गोष्ट नाही. लवकर माणसांत गुंतणा-या लोकांकरता जास्तच जड.
पण प्रवासात अशी विविध पर्याय स्वीकारणारी, कठीण प्रसंगांना सामोरं जाणारी माणसे भेट्णे नशीबच म्हणायला हवे. त्यांचे जगणे मला नवीन दिशा देत आले आहे. समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली आपण मिळवायची असते हे मनापासून पटले आहे. मनमोकळा संवाद करणे ही त्याची एक पायरी आहे असे मी मानते. कभी अलविदा ना कहेना असे मनात म्हणत निरोप घेणे त्यामुळे सुकर होते हे खरेच आहे, नाही का? 

-सोनाली

About the Author

सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह

असीमा चॅटर्जी यांच्या गौरवार्थ गुगल डूडल

असीमा चॅटर्जी यांच्या गौरवार्थ गुगल डूडल
२३ सप्टेंबर १९१७ रोजी असलेले गुगल डूडल असीमा यांचा गौरव करणारे आहे. 
असीमा चॅटर्जी भारतातल्या पहिल्या डॉक्टरेट महिला होत्या.असीमा चॅटर्जी यांनी कोलकाता विद्यापीठातून रौप्य पदकासह सेंद्रिय रसायनशास्त्रातील एम. एस्सी. पदवी १९३८ साली संपादन केली व तेथूनच १९४४ साली त्या डी. एस्सी. झाल्या. ही पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या! पुढे कोलकाता विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम करत असतानाच १९४७ साली त्या संशोधनासाठी अमेरिकेला रवाना झाल्या. तेथे त्यांनी एल. एम. पार्कस्, एल्. झेक मैस्टर या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. तिथून त्या युरोपला गेल्या आणि झुरिक विद्यापीठातील १९३७ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ पॉल करीट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संश्लेषणात्मक सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ (सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्री) या विषयात संशोधन केले. १९५० मध्ये त्या भारतात परतल्या. भारतीय औषधी वनस्पतींवर त्यांनी विपुल संशोधन केले. वनस्पतींपासून मिळणाऱ्या अल्कालॉईड्स व कौमारीन्स या रासायनिक पदार्थाच्या संशोधनावर त्यांचा विशेष भर होता. सजीवांपासून वेगळे केले जाणाऱ्या रासायनिक पदार्थाना ‘नॅचरल प्रॉडक्ट्स’ (नैसर्गिक उत्पादने) असे म्हणतात. त्यांनी नॅचरल प्रॉडक्ट्सविषयी संशोधन केले. त्यासाठीच त्यांना ‘पहिल्या भारतीय महिला रसायनशास्त्रज्ञ’ असे संबोधले जाते.

About the Author

साहित्यसंस्कृती

एअरबीऍन्डबी (Airbnb) आणि विश्वचि माझे घर...

 

यंदाची इटलीची ट्रीप पूर्णपणे Airbnb मध्ये राहून केली. या आधी कामासाठी केलेल्या प्रवासात Airbnb खूप वेळा वापरलं होतं, यंदा पर्सनल ट्रिपसाठी पहिल्यांदाच वापरलं आणि मी (आम्ही) अफाट हॅपी आहोत!

तीनेक वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा Airbnb बद्दल ऐकलं. माझी सध्याच्या कंपनीसाठीची पहिली US ट्रिप होती, बाराएक वर्षांनी US ला येणार होतो आणि माझ्या अमेरिकन सहकाऱ्यांनी Airbnb बुक करायला सांगितलं. तो पहिला अनुभवच भन्नाट होता! बॉस्टनच्या डाऊनटाऊनमधल्या एका उंच इमारतीतला २५व्या मजल्यावरच्या फ्लॅट भाड्यानी मिळाला, जवळपासच्या हॉटेल्सपेक्षा अत्यंत कमी किंमतीत. लै म्हणजे लैच भारी वाटलं तेंव्हा.

मग तेंव्हापासून सर्व प्रवासांसाठी Airbnbच वापरायला लागलो आणि गेल्या तीन वर्षांत वीस-तीस वेळा वापरलं असेल. प्रत्येक वेळचा अनुभव वेगळा होता, पण तरीही यापुढेही कोणत्याही प्रवासासाठी शक्य असेल तिथे Airbnbच वापरीन मी! Airbnb ही फक्त मध्यस्त कंपनी कम वेबसाईट आहे. 'Bed and Breakfast (BnB) ह्या युरोपातल्या लोकप्रिय प्रकारातून ती सुरु झाली. प्रवासाला गेल्यावर खर्चिक हॉटेलमध्ये रहाण्याऐवजी अत्यंत कमी खर्चात कोणाच्यातरी घरी रहाणं ही प्रवाशांची गरज आणि आपल्या घरची एखादी जादाची खोली (किंवा आपलं रिकामं असलेलं सेकंड होम) प्रवाशांना भाड्यानं देऊन थोडे पैसे कमावणं ही घरमालकांची गरज या दोन्हीतून युरोपात BnB कल्पनेचा जन्म झाला. ह्या BnB चं आधुनिक इंटरनेट युगातलं रूप म्हणजे AirBnB.

Airbnb च्या साईटवर घरमालक आपली घरं किंवा घरातल्या खोल्या 'लिस्ट' करतात. (म्हणजे उपलब्ध आहेत असं सांगतात) आणि प्रवासी आपल्या सोयी नुसारच्या खोल्या किंवा घरं शोधून ती बुक करतात. घरमालकांना भाडं मिळतं आणि प्रवाशांना घरापासून दूर आपलं घर मिळतं, तेही हॉटेलपेक्षा अत्यंत कमी किमतीत. Win-win situation!

****

गेल्या तीन वर्षांत चार-पाच देशांमधल्या वीस-तीस AirBnB च्या घरांमध्ये राहिलो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे घरमालक भेटले. काही अगदी बोलघेवडे, फ्रेंडली खूप मदत करणारे, काही अबोल, खडूस, काटेकोर वागणारे. खूप घरांमध्ये राहिलो. काही अत्याधुनिक, शहराच्या मध्यातली, सर्व सोयी सुविधा असलेली काही जुनीपुराणी, शहरापासून दूर असलेली, बेसिक सुविधाही नसलेली. पण प्रत्येक वेळी मी जितके दिवस रहात होतो तेंव्हा एकदाही घरमालक मला डिस्टर्ब करायला आला नाही. पूर्णवेळ मी त्या देशा-शहरा-गावातलं 'माझं घर' म्हणूनच तिथे रहात होतो!

****

हे विलक्षण भन्नाट आहे! AirBnB मुळे जगातल्या कोणत्याही शहरा-गावात आपल्याला, तात्पुरतं का होईना, पण जसं हवं तसं 'स्वतःचं घर' घेता येणं शक्य झालं आहे... आणि तिथे जाऊन आपलंच घर असल्यासारखं मनसोक्त रहाणंही शक्य झालं आहे...

'जो जे वांच्छिल तो ते लाहो' हेही अनुभवणं शक्य झालं आहे... आणि 'विश्वचि माझे घर' हेही....

अनुभवुन बघा!

-प्रसाद शिरगांवकर

About the Author

प्रसाद शिरगांवकर

Writer, Poet, Photographer, Drupaler!!

फ्रोझन सिनेमातले गीत- गायिका एक लहान मुलगी!

 

फ्रोझन सिनेमातले गीत- गायिका एक लहान मुलगी!
लेट इट गो.. हे शब्द नुसते उच्चारले तरी लहान त्याने प्रभावित झालेल्या अनेक मुलंमुली आपल्याला दिसतील. लहान मुलांच्या आवाजात अनेक लोकप्रिय गाणी आणि त्यांचे व्हिडियो अपलोड होतात. अनेकदा ही मुले अतिशय छान गातात, खूप चांगला प्रयत्न करतात. काही वेळा मुले त्यांना वाटेल आणि गाता येईल अशाप्रकारे गातात. दोन्ही प्रकारचे व्हिडियो लक्षवेधी ठरतात. पहा या छोट्या मुलीने काय केले आहे .

 

About the Author

साहित्यसंस्कृती

कॉफी शॉप प्रॅंक

 

कॉफी शॉप प्रॅंक
न्यूयोर्कमधील एका कॉफी शॉपने आपल्या गि-हाईकांना आश्चर्यचकित करण्याकरता एक बेत रचला. त्यानुसार त्यांनी दुकानात काही बदल केले. ठरल्याप्रमाणे त्यांनी तो बेत प्रत्यक्षात आणला. बघा लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या ते. हा आतापर्यंतच्या व्हिडियो व्हारल व्हिडियोमधील एक महत्त्वाचा व्हिडियो आहे.

 

 

 

 

 

 

About the Author

साहित्यसंस्कृती

Pages